उडुपी (कर्नाटक) : सर्व संत महंतांनी समाजाच्या सर्व वर्गांत जावे, त्यांना समानता, समरसता व एकतेचा संदेश आपल्या आचरणातून द्यावा याची आज आवश्यकता आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. कर्नाटकातील उडुपी येथे विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धर्म संसदेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. पेजावर मठाचे श्री विश्वेशतीर्थ स्वामी, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव डॉ. प्रवीण तोगडिया, स्वामी गोविंद देव गिरी यांच्यासह देशभरातून आलेले विविध संत महंत या संसदेला उपस्थित होते.
सामाजिक समरसता आचरणातून दिसायला हवी -
शतकांपासून विषमता झेलणारा आपला हा जो बांधव आहे, आपल्या समाजातीलच सहोदर वर्ग आहे तोही आता विभिन्न उपायांनी सुखी संपन्न बनला असला तरीही अजूनही त्या समाजाची सन्मानाची आणि प्रेमाची भूक शिल्लक आहे. कारण शास्त्राने तर्क दिला, निर्णय दिला, अनेकांच्या बुद्धीत व मनात ते उतरलेही आहे, पण त्याची सवय लागली नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. हा जो सामाजिक समरसतेचा विषय आहे तो निवेदन, प्रतिपादनापेक्षाही अधिक आचरणाचा विषय आहे. प्रत्यक्ष जमिनीवर नित्य व्यवहारात समाजात आमच्या प्रती प्रेम, वात्सल्य आणि सन्मानाची भावना आहे याची अनुभूती त्या समाजाच्या अनुभवातून गावागावात, वस्तीवस्तीत मिळायला हवी व सर्वत्र मिळायला हवी असे भागवत यावेळी म्हणाले. त्यामुळे आपल्या समाजात फिरताना व प्रवचन करताना संत महात्मांनी योजना करून सर्व वर्गांकडे जावे, सर्व वर्गांना समानता, समरसता, एकतेचा संदेश द्यावा, तसे त्यांचे उदाहरण समाजाने पाहावे व त्याचे अनुकरण करावे याचे प्रमाण वाढवण्याची अधिक आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
राम मंदिर निर्माणाचा निर्धार -
आपल्या याच भाषणात भागवत यांनी बहुचर्चित व बहुप्रतीक्षित राम मंदिर निर्माणाचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला. इतक्या वर्षांच्या प्रयत्नांनी, इतक्या बलिदानांनंतर, सातत्याने विषय लावून धरल्यानंतर आज अशी स्थिती आहे की वेळ जवळ आली आहे असे वाटते असे भागवत म्हणाले. मात्र हे सांगत असतानाच त्यांनी हे प्रकरण अद्याप न्यायालयात सुरु असल्याचेही सांगितले. आम्ही काही बोललो नाही तरीही तरीही सामान्य लोक देखील 'अरे हे राम मंदिरवाले आहेत' असे म्हणतील इतके आम्ही त्या विषयाशी एकरूप आहोत असे त्यांनी सांगितले. राम जन्मभूमीवर राम मंदिरच बनेल, बाकी काही बनणार नाही. तिथे मंदिरच होईल, त्याच प्रारुपात होईल. त्याच दगडांपासून बनेल, आणि त्यांच्याच पुढाकारात बनेल जे हा ध्वज घेऊन गेल्या २०-२५ वर्षांपासून चालत आहेत असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच ही आमची लोकप्रिय घोषणा नाही, ही आमच्या मनाची श्रद्धा आहे. ही श्रद्धा कधीही बदलणार नाही तर ही पक्की राहणार आहे व असेच प्राप्त करून आम्ही राहणार अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. आज हे होण्याचा क्षण जवळ आलेला आहे त्यामुळे हे व्हावे यासाठीही आपल्याला जनजागरण करावे लागणार आहे असे भागवत यावेळी म्हणाले. भागवत यांनी राम मंदिर निर्माणाचा निर्धार व्यक्त केल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. 'जय श्रीराम', 'भारत माता की जय' अशा घोषणा उपस्थितांनी दिल्या.
हिंदू समाजाच्या उदासीनतेमुळे गोरक्षकांची बदनामी -
भागवत यांनी यावेळी गोरक्षकांच्या मुद्द्यालाही हात घातला. साऱ्या देशात हिंदुत्त्वाचा थोडासाही अभिमान बाळगणारा कोणीही व्यक्ती असो तो गायीविषयी बोलतो व शक्य ते करतोही पण समाज त्याप्रती उदासीन होतो आणि फलस्वरूप गायी विकल्या जातात, कापण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातात असे ते म्हणाले. त्यातून जो संघर्ष उत्पन्न होतो त्याचा फायदा घेऊन गोरक्षकांना बदनाम करण्याची संधीही लोकांना मिळते. त्यामुळे गोरक्षणाचे काम आपण अधिकाधिक करण्याची आवश्यकता आहेच आहे. गायीचे रक्षण करण्यासाठी 'जोश' आवश्यक आहे पण गायीचे रक्षण हिंदू समाज करेल यासाठी 'होश' आवश्यक आहे असे भागवत यांनी यावेळी उपस्थितांना आवाहन केले.
विजय सुनिश्चित आहे -
देशात सुरु असलेल्या धर्मांतराच्या घटनांवर सरसंघचालकांनी आपल्या भाषणात चिंता व्यक्त केली. परंतु त्याचवेळी परावर्तनाचेही प्रयत्न योग्य प्रमाणात सुरु असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सध्या सुरु असलेल्या धर्मपरिवर्तनाच्या तुलनेत उलट्या दिशेने परावर्तनही पुरेशा प्रमाणात सुरु आहे असे भागवत म्हणाले. धर्मांतरणाचे हे प्रयत्न खूप वर्षांपासून सुरु आहेत. अन्य देशांमध्ये असेच प्रयत्न झाले तेव्हा तिथला संपूर्ण समाज बदलून गेला. पण आमच्याकडे सत्ताधीश बनून शेकडो वर्षे राहीले व हे प्रयत्न चालले पण तेवढे फळ मिळाले नाही. आजही त्यांना ते अवघड जात आहे. कारण ज्यांना आम्ही स्पर्श केला नाही, ज्यांच्याकडे आम्ही वर्षानुवर्षे गेलो नाही तो समाज एकटाच आपल्या श्रद्धेच्या बळावर लढत राहीला, हारला नाही अशा शब्दांत भागवत यांनी हिंदू धर्म वाचवण्यासाठी तथाकथित दलित समाजाच्या योगदानाचे महत्त्व विषद केले. धर्म बदललेल्यांनी अजूनही आपल्या पूर्वजांची स्मृती जपून ठेवली आहे, ती पुन्हा जागवली पाहिजे आणि सारा समाज तुमच्या सोबत आहे, तुमच्या सुख-दुःखात तुमच्या सोबत चालत राहील हा विश्वास उत्पन्न केला पाहिजे म्हणजे बाकी सर्व आपले आपण होईल असे त्यांनी सांगितले. परंतु हे करताना शांततापूर्ण पणे काम केले पाहिजे असे सांगायलाही भागवत विसरले नाही. जोपर्यंत भारतमातेचे अखंड स्वरूप परमवैभवसंपन्न व विश्वगुरु बनून जगाच्या मंचावर पदारूढ होत नाही तोपर्यंत आपल्याला खूप जोराने जयजयकार करण्याची आवश्यकता नाही. आपण लढाया जिंकत चाललो आहोत. आपला विजय सुनिश्चित आहे, आपण आणखी पुढे जाणार आहोत, पूर्ण विजय प्राप्त करणार आहोत असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.