
भारतीय इतिहासाच्या भूतकाळात केले गेलेले अनेक प्रयोग पुन्हा नव्याने शोधून काढून मांडण्याचे प्रयोग सुरू आहेत. हे प्रयोग आजचे नाहीत. गेली अनेक वर्ष आपले म्हणून जे काही आहे त्याच्या मुळाशी जाऊन शोधण्याचा प्रयत्न करणे मनुष्यस्वभावाचा भागच आहे. जेव्हा भाकरीचा संघर्ष संपतो आणि अस्तित्वाविषयीचे प्रश्न पडायला सुरुवात होते त्यावेळी कुठल्याही मानवी संस्कृतीला स्वत:च्या भूतकाळाकडेच वळून पाहावे लागते. प्रारंभापासून काय काय घडत होते, याची जसजशी मीमांसा व्हायला सुरुवात होते तसतसे त्यातून भूतकाळाच्या कर्तृत्वाचे एक एक पट उलगडू लागतात. गौरवशाली भूतकाळातून वर्तमानाकडे पाहण्याची दृष्टी प्राप्त होतेच, मात्र भविष्याचा वेध घेण्याची वृत्तीदेखील निर्माण होते. विजयनगरच्या साम्राज्याचे, यादवांच्या समृद्ध राजवटीचे पडसाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावर पडले नाहीत, असे म्हणता येणार नाही. शहाजीराजांच्या दक्षिणेकडल्या विस्ताराचा छत्रपतींना मागमूसही नव्हता, असे म्हणता येणार नाही. शिवमुद्रेवर कोरलेल्या प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढणार्या आणि त्याचबरोबर सार्या विश्वाला वंद्य असलेल्या अशा हिंदू साम्राज्याची कल्पना याच इतिहासातून मिळाली आहे. रामायण आणि महाभारताच्या कथा ऐकूनच छत्रपती वाढले. इतिहासाच्या शिदोरीचा त्यांना पुरेपूर उपयोग झालाच. इतिहास हा असाच असतो. संदर्भापुरता घेता आला तर इतिहास उपयुक्त ठरतो. मात्र तोच आपला वर्तमान बनू लागला की, अहंगंडाकडे वाटचाल व्हायला लागते आणि त्यातून भविष्याकडे होणार्या वाटचालीचा मार्ग खुंटतो. जेव्हा या दोन्ही पलीकडे आकलन करण्याच्या क्षमता संपतात तेव्हा कुणावर तरी टीका करून किंवा त्यांच्या ज्ञानाचा बागुलबुवा दाखवून अस्मितेचे बुरुज उभे करावे लागतात. भारतासारख्या महाकाय देशात इथल्या वैविध्यासह इतिहासाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करायचा झाल्यास मोठ्या संशोधनाची गरज लागेल.
वसुधैव कुटुंबकमहे मानवी जीवनाच्या उत्कर्षाचे तत्त्व मानले की पाश्चात्त्यांच्या पुढे जाण्यामागचे रहस्य कुतूहलाने समजून घेतले पाहिजे. परदेशी आक्रमणांमुळे आपल्याकडे ज्ञानशाखांचा विकास अडला. ज्ञानाचे प्रमाणिकरण थांबले. वैविध्यतेसमोर समान पर्याय देऊ शकेल, अशा संसाधनांची निर्मिती आपण करू शकलो नाही. ब्रिटिशांच्या राजवटीने आपल्यातला आत्मविश्र्वास मोडला, मात्र काही नव्या शाखाही आणल्या. कुप्रथा कायद्याने नष्ट केल्या गेल्या. समाजाची सहज रचना म्हणून निर्माण झालेली जातीव्यवस्था समाजाच्या हितापेक्षा समाजात विषमता पसरविण्यासाठी कामकरू लागली. यातून ज्ञानशाखांचे अतोनात नुकसान झाले. ज्ञानाचे मार्ग आपापल्या जातीतच मर्यादित राहिले आणि काळाच्या ओघात नष्ट होऊन गेले. आयुर्वेदाचे ज्ञान आणि वनौषधीच्या मात्रा देणारे वैदू एका वेगळ्या अर्थाने या दोन वेगळ्या शाखा झाल्या. पर्यायाने प्रमाणिकरणाची प्रक्रिया खुंटली. पाश्र्चात्त्यांचे ज्ञान प्रमाणिकरणावर अवलंबलेले होते. त्यामुळे ते जगभर पसरले. विज्ञानाचे शोध हे सार्वत्रिकरणाच्या प्रक्रियेमुळे लोकोपयोगी झाले. मानवी जीवन सुकर करण्यासाठी त्यांचा उपयोग केला गेला. वाफेच्या इंजिनाचा शोध आगगाडीपर्यंत येऊन पोहोचला. दळणवळणाची साधने निर्माण झाली. आर्थिक उलाढाली निर्माण झाल्या. फोनचा शोध लोकांच्या कामी येऊ शकला आणि दूरसंचाराच्या कामी आला. दूरदर्शन संच, रेडिओे यासारख्या उपकरणांनी प्रबोधनाच्या कामात बजावलेली भूमिका जनसंवादाच्या माध्यमात आजही शिकविली जाते. इस्त्रायलसारखा लहानसा देश इतिहासातून प्रेरणा घेऊनच मोठा झाला मात्र आज कुठल्याही इस्त्रायली नेत्याचे भाषण ऐकले तर त्याच्या भाषणात इतिहासातल्या संदर्भांपेक्षा भविष्यातील आकांक्षाच अधिक डोकावत असतात. ओबामांच्या पहिल्या निवडणुकीचे घोषवाक्यच ’होप’ म्हणजेच आशा असे होते. पाश्र्चिमात्त्यांचे सगळेच चूक किंवा सगळेच बरोबर असे मानण्याचे कारण नाही. मानवी संस्कृती समृद्ध होत जाते तीच मुळात निरनिराळे प्रवाह आपल्यात घेऊन. आज जगाच्या पाठीवर आपले अस्तित्व सिद्ध करीत आहेत त्यांचे नीट निरीक्षण केले तर लक्षात येते त्यांची प्रयोगशीलता व चलनी शब्दात सांगायचे तर आर ऍण्ड डी यात आपण बरेच मागे आहोत. फसलेले प्रयोगही कौतुकास्पद मानण्याची सामाजिक वृत्ती अजून आपल्यात आलेली नाही. स्टार्ट अपच्या निमित्ताने आपल्यात ती येईल असे मानायला हरकत नाही. आपली सगळी उदाहरणे ताडून पाहिली पाहिजे. आज १३० हून अधिक कोटींचा असलेला आपला देश त्याच्या विविधतेनुसार विविध समस्यांच्या समाधानासाठीही झगडत असतो. पंचतारांकित परिषदांपेक्षा लहान लहान समस्यांवर उत्तरे काढणार्यांची गरज आज मोठी आहे. साध्या गाईसारख्या प्राण्याचा विचार केला तर ज्या देशी गाईंचा पुरस्कार आज मोठ्या प्रमाणावर केला जातो त्यांच्या माध्यमातून लहान मुले, आजारी माणसे, कामावर जाणार्या स्त्रिया यांच्याबाबतची दुधाची गरज भागवता येणे आज तरी शक्य नाही. देशी गाईंच्या दुग्धोत्पादन क्षमता वाढविण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या आक्रमक वैज्ञानिक कार्यक्रमांची गरज आहे. चांगले दुग्धोत्पादन करणार्या गाई शेतकर्यांच्या गोठ्यापर्यंत जाऊन पोहोचण्यापर्यंत हा संघर्ष आहे. एकात्ममानव दर्शनाचे प्रणेते पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांचे फार सुंदर विवेचन आहे. इतिहासापासून प्रेरणा घ्यावी पण तोच आपल्या कर्तृत्वाचा सर्वोच्च बिंदू आहे, असे मानू नये. वर्तमानाचे भान ठेवावे पण त्याच्या मर्यादांनी स्वत:ला बांधून घेऊ नये. इतिहासापासून प्रेरणा घेत, वर्तमानाचे भान ठेवत, भविष्याच्या कालपटावर आपल्या कर्तृत्वाची पदचिन्हे उमटविण्याची जिद्द बाळगावी.
- किरण शेलार