अवंती : मेधाकाकू मला आजपर्यंत फक्त एकच गोष्ट करता येत होती. शाळेचे काही साहित्य हवे असले की बाबांकडे पैसे मागायचे. बाकी कुठल्याही कारणाने आई किंवा बाबांकडे मी कधीच पैसे मागितले नाहीत. बाबा आणि आईला पैसे कसे मिळतात-किती मिळतात, त्यासाठी काम काय करावे लागते. याचा विचार करण्याची आजपर्यंत जरुरीच वाटली नाही. मात्र आपल्या अभ्यासातील या म्हणी आणि वाकप्रचारांमुळे, हे समजून घेण्याची एक जाणीव मात्र निर्माण झाली.
मेधाकाकू : हं अवंती मलाही जाणवतोय, तुझ्या समजुतीत घडणारा बदल, व्यापक होणारे तुझे अवकाश. तुझे निरीक्षण अगदी योग्य आहे. पैसे योग्य मार्गाने-प्रामाणिकपणे-मेहनतीने मिळवणे महत्वाचे. यालाच ‘अर्थार्जन’ असे संबोधन वापरले गेले. या अर्थार्जनाला नीतिमत्तेचे योग्य कोंदण दिले गेले. फार प्राचीन काळापासून भारतीय समाजाने हे अर्थार्जनातील नीतिमत्तेचे नियम स्वीकारले आणि आचरणात आणले. या बरोबरच पैशाचा लोभ आणि त्यासाठी नीतिचे उल्लंघन, योग्य-अयोग्य असा विवेक विसरून पैशाच्या हव्यासापायी मूर्ख व्यवहार करणारे लोकही समाजात होतेच. आता ही म्हण कशी द्वयार्थी कसरत करते आहे ते बघुया...!!..
द्रव्याचे लालची पेंढीचे ढोर
मेधाकाकू : अवंती एक गोष्ट लक्षात घे, पारंपारिक भारतीय मुल्याधिष्टीत समाजात; अहंकार, लोभ, आसक्ती, आधाशीपणा, मत्सर, क्रोध आणि आळस या सात मानवी प्रवृत्ती अक्षम्य मानल्या गेल्या. या म्हणीतील ‘द्रव्याचे लालची’ हे उपमेय कुणालाही समजायला सहज आणि सोपे. पैशाचा हव्यास असलेल्या लोभी व्यक्तीचे हे वर्णन. ‘पेंढीचे ढोर’ उपमानाची योजना अशी की या दोन शब्दातील दिलेल्या उपमेने या व्यक्तीच्या स्वभावधर्माचा योग्य परिचय आपल्याला मिळतोय. पेंढ म्हणजे सुकलेले गवत, गुरांचे आवडते खाद्य. पेंढी म्हणजे अशा गवताचा भारा. एखादे गाय-बैल (ढोर) पेंढी दिसल्यावर जसे खाण्यासाठी त्यात तोंड घालतात तशीच ही लोभी व्यक्ती पैसा दिसला की ओरबाडण्यासाठी त्यात हात घालते. काहीही मार्गाने ते पैसे मिळवायचा प्रयत्न करते. या म्हणीचा थोड्या फरकाने दुसरा अर्थसुद्धा प्रचलित आहे. यातला लालची माणूस सधन आहे, त्याच्या मालकीची काही गुरे सुद्धा आहेत. आता यांच्या डोक्यात थोडा पैसा वाचवावा, कंजुषी कशी करावी त्याचा विचार सुरु आहे. हा लोभी माणूस आपल्या कळपातली एक गाय, एका पेंढीच्या मोबदल्यात शेतकऱ्याला देऊन टाकतो आणि गवताच्या भाऱ्यावरच्या खर्चात आज बचत झाली म्हणून खुश होतो. लोभी-लालची प्रवृत्तीचा परिचय काही शतकांपासून आपल्या चतुर पूर्वजांनी आपल्याला करून दिला आहे. शिवाजी महाराजांच्या तत्कालीन बखरकारांच्या दफ्तरात या म्हणीचा उल्लेख आढळतो. ’अर्थांतरन्यास’ अलंकाराचे हे उत्कृष्ट उदाहरण ज्यात पहिल्या दोन शब्दातील उपमेयाच्या विधानाला सिद्ध करण्यासाठी पुढच्या दोन शब्दातील उपमानाचे उदाहरण दिले गेले आहे.
अवंती : सही है... मेधाकाकू. आज तू थेट तीन-चार शतके मागे घेऊन गेलीस आणि मातृभाषेतला अजून एक दागिना गवसला आम्हाला. आजचा हा शिवकालीन संदर्भ मात्र खूप थरारक आहे...!
मेधाकाकू : कदाचित आता तुला वाटेल. या लोकश्रुती आणि लोकोक्तींमधे अशा नाकारात्मक प्रवृत्तीच नोंदवल्या असाव्या, मात्र पैसे या संदर्भांत अनेक व्यवस्था या लोकसाहित्यात नोंदवलेल्या दिसतात. अर्थप्राप्तीनंतर प्रथम येतो योग्य खर्च त्यानंतर बचत आणि त्यानंतर दानधर्म. अशा समाजाभिमुख व्यक्ती दानधर्म करतांना सुध्दा योग्य तो व्यवहार विवेक सांभाळूनच करतात.
निधन्या धन आणि निकण्या कण
दानधर्म करतांना कोणाला काय द्यायचे त्याचा विवेक सांभाळणे कसे असावे ते या वाकप्रचारात पहावे. सतपात्री दानाचे अनेक प्रकार...धनदान-ज्ञानदान-धान्यदान-वस्त्रदान-रक्तदान-नेत्रदान-अवयवदान-श्रमदान-भूदान. ’निधन्या धन’ म्हणजे ज्यांना पैसे देणे आवश्यक आहे त्यांनाच पारखून घेऊन धनदान करणे. ‘निकण्या कण’ म्हणजे. आश्रमात राहून शिक्षण घेणाऱ्या निराधार मुलाना रोजचे दोन घास मिळण्यासाठी धान्याची गरज आहे हे समजून घेऊन त्याना धान्यदान करावे. तुला सांगितले. त्याप्रमाणे हा दानधर्मातला विवेक आणि असे चातुर्य या लोकोक्तींमधून आपल्यापर्यंत पोहोचते.
अवंती : आता अशा प्रत्येक अभ्यासानंतर माझे विचार दररोज आठ-दहा पायऱ्या वरची उंची गाठायचा प्रयत्न करतात. रोज नवा कोन सापडत जातोय, प्रत्येक विषयातला. ऐकत्ये मी मन लाऊन.
मेधाकाकू : आता व्यवहार विवेक फक्त दाता किंवा दानशुराचाच असतो का ? तर उत्तर नाही असेच आहे. व्यापारी वृतीने केले जाणारे व्यवहार सुद्धा उत्तम विवेकाचेच असतात. आता आपण जाऊया बाजारपेठेतल्या तुझ्या सदूमामाच्या नारळाच्या दुकानात. घरी आला की भरपूर अघल-पघळ गप्पा मारणारा तुझा मामा... दुकानात बसला की पक्का व्यवहारी असतो. मामाचे नारळाचे दुकान आहे घाऊक व्यापाराचे केंद्र. गल्ल्यावर बसला की त्याचा मंत्रच आहे.
रोख ठोक भवानी चोख
मेधाकाकू : घाऊक बाजारात, सकाळी दुकानात आलेले पहिले ग्राहक कधीच उधारीचे नसते. अशा ग्राहकाकडून दिवसाच्या पहिल्या खरेदीचे मूल्य रोखीनेच घेतले जाते. हा व्यापारी जगताचा पारंपारिक नियम आहे. कधी आपल्या नाक्यावरच्या वाण्याच्या दुकानात डोकावून बघ... त्याच्या गल्ल्याच्या मागच्या भिंतीवर मोठ्या अक्षरांत लिहिलेले आहे...’आज रोख – उद्या उधार’. आता आपल्या लक्षात आलय. पैसे, अर्थार्जन, खर्च, बचत, दानधर्म. अशा अनेक आर्थिक विषयांचा निश्चित संदर्भ आपल्याला या लोकश्रुतीत मिळतोच.
अवंती : मेधाकाकू... अगदी खरेच सांगतीये, आता मी आठव्या इयत्तेत आलीये, पण तरीही आजपर्यंत अशा अर्थविषयक गोष्टींचा आणि त्यातल्या व्यवहार विवेकाचा मी विचारच कधी केला नव्हता. मात्र आता तो दरवाजा तू उघडलायस आणि मी त्यातून फेरी मारून येणारे आणि तू आहेसच की बरोबर...!
- अरुण फडके