आकाशाशी जडले नाते : जपानची सूर्यपूजा

    22-Nov-2017   
Total Views |

 

“आजी! आबा!”, सुमितने दारातूनच हाक मारली. आज सकाळीच सुमित जापानहून परत आला होता. शंकरराव आणि दुर्गाबाई तेंव्हापासून त्याची वाट पाहत होते.

सुमित आबांच्या पाया पडला, तेंव्हा डोळ्यातले आनंदाश्रू पुसत आबांनी त्याचे स्वागत केले.

सुमितने आजीला नमस्कार करून तिच्या हातात एक सुंदरसा जपानी पंखा ठेवला. दुर्गाबाईनी अलगद पंखा  उघडला त्याबरोबर त्यावर गुलाबी रंगाची चेरी फुले उमलली. आणि पूर्ण उघडल्यावर त्याचा एक मोठा गोल झाला. दुर्गाबाई त्यावरील बारीक नक्षी पाहून हरकून गेल्या, तसे आबा म्हणाले, “दुर्गे, तो पंखा अंबाड्यात खोचालास न, की तुला एक छानशी प्रभावळ येईल बघ! आणि तू खरोखरी दुर्गामाते सारखी दिसशील!”

आजी काही म्हणायच्या आत, सुमितने आबांच्या हातात एक लहानसे उपकरण दिले. “आबा, हे तुमच्यासाठी! सोलर सेलफोन चार्जर आहे.”

“अरे वाह! सुमित हे छानच आहे! आता माझा फोन सूर्याच्या शक्तीवर चालणार! आणि माझी जपानी सूर्याची गोष्ट?”, आबांनी उत्सुकतेने विचारले.

“हो! ती पण आणली आहे! आबा, जातांना तुम्हाला प्रॉमीस केले होते, त्यामुळे मी जपानला गेल्या पासूनच विचार करत होतो, की आता हे सूर्याचे मंदिर शोधायचे कसे? माझ्या जपानी मित्राला मला इथली मंदिरे पहायची आहेत असे सांगितले. आणि त्याने मला कित्येक शनिवार-रविवार वेगवेगळ्या मंदिरात नेऊन आणले.”, सुमितने त्याच्या पोतडीतून फोटोंचा अल्बम काढला.    

“आजी, पहिल्याच मंदिरात गेलो, तर समोर एका देवाची मोठी मूर्ती होती. तो देव हातात कागद घेऊन तो काहीतरी  लिहित बसला होता. माझ्या मित्राने सांगितले, हा गुशो जिन् देव (Gusho-jin), प्रत्येकाच्या पाप-पुण्याची नोंद करून ठेवतो.”

 


Gusho-jin, Inoji, Kyoto

 

फोटो पाहून आबा म्हणाले, “अरे! हा तर आपला चित्रगुप्त आहे. असा समज आहे की, हा गंधर्व, प्रत्येकाच्या पाप-पुण्याचा हिशोब ठेवतो आणि आपल्या पिक्चरचा ‘The End’ झाला की ते balance sheet यमाकडे देतो.”   

“असा चित्रगुप्त मी लहानपणी पहिला असता, तर घाबरून काही पाप केलं नसतं!”, दुर्गाबाई फोटो पाहून म्हणाल्या.

“तुला हा फोटो मी आधी दाखवला असता, तर मी जेंव्हा मागितला असता तेंव्हा मला चहा करून दिला असतास का ग?”, आबांनी हळूच विचारले.  

“पाहिलंस सुमित!”, दुर्गाबाई लटक्या रागात म्हणाल्या, “आता काय कमी आहे की काय चहाला? रोज लिटर लिटर चहा ओततेय घशात ते!”

“नरड्यात म्हणली नाहीस हेच पुष्कळ पुण्य आहे बाई तुझे!”, आबा मिश्किलपणे म्हणाले.  

“आजी तू म्हणालीस ते खरंय, हा चित्रगुप्त भीती घालणारा आहे. पण हा सरस्वतीचा फोटो पहा! इथली सरस्वती फारच सौम्य आणि सुंदर देवी आहे.”

 





“ही देवता सरस्वतीचे जपानी रूप आहे – बेनझैतेन. या नावाचा अर्थ आहे – वाद, संवाद, भाषण आणि कौशल्याची देवता. ती पाण्याची आणि संगीताची सुद्धा देवता आहे!”, सुमित म्हणाला.

“कसे आहे बघ सुमित, आपल्याकडे सरस्वती ही प्राचीन नदी होती. तिच्या काठावर वेदांची रचना झाली. तिच्या काठावरील आश्रमांमध्ये वेद शिकवले जात. त्यामुळे सरस्वती ही वाचेची, वेदांची, ज्ञानाची देवता आहे. सरस्वतीच्या चित्रांमध्ये, हमखास मागे वाहते पाणी आणि हातात वीणा दिसते.”, आबा म्हणाले.

“बरोबर आहे आबा, बेनझैतेनच्या मूर्तीच्या पायाशी पाणी दाखवतात! सरस्वती फारच लोकप्रिय देवता आहे. ठिकठिकाणी तिची मूर्ती दिसते, दुकानांची नावे, रस्त्यांची नावे पण सरस्वतीची दिसतात. तसच जपान मध्ये मी गणपतीच्या सुद्धा कितीतरी मूर्ती व चित्रे पहिली!”, सुमित सांगत होता.

“पण हे भारतीय देव, जपान मध्ये पोचले कसे आणि कधी?”, दुर्गाबाईनी विचारले.  

“भारतीय देवांना तिथे पाहून सुरवातीला मला पण फारच आश्चर्य वाटले. मग शोधाशोध केल्यावर कळले, की – ‘सिल्क रोड’ या प्राचीन व्यापारी मार्गाने बौद्ध धर्म अफगाणिस्तान मधून चीन मध्ये, आणि मग कोरिया मध्ये पोचला. सहाव्या शतकात कोरिया मार्गे बौद्ध धर्म जपान मध्ये अवतरला. चीन मधून आलेल्या महायान बौद्ध पंथाबरोबर अनेक भारतीय देवतांचे जपान मध्ये आगमन झाले. जपान मधील शिंतो देवांबरोबरच, तेथील लोक भारतीय देव सुद्धा पुजू लागले. या देवतांनी तिथे जपानी नावे धारण केली, आणि तिथेच रमल्या.

“केवळ देवताच नाही, तर हिंदू पूजा पद्धती सुद्धा तिथे दिसल्या. तिथे एका शिन्गोन् मंदिरात, मी ‘गोम’ नावाचा एक अतिशय सुंदर विधी पहिला. या मध्ये अग्नी प्रस्थापित करून, संथ लयीत मंत्र म्हणत, त्यामध्ये समिधा  अर्पण केल्या जातात. या मंदिरांतून रोज सकाळी किंवा दुपारी हा विधी केला जातो. हा पहा त्याचा विडीयो–

Embeded Object

 

“सुमित, अरे हा तर एखाद्या वैदिक यज्ञासारखा विधी आहे. अगदी सामगान, वैदिक मंत्र आणि अग्नीला हवी अर्पण केलेला दिसत आहे. वज्रयान या बौद्ध पंथाबरोबर हा जपान मध्ये गेला असणार!”, आबा म्हणाले.   

“हो! शिन्गोन हा वज्रयानाचा उपपंथ आहे, असे माझा मित्र म्हणाला. आबा, तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. आपल्या १२ आदित्यांप्रमाणे, जपान मध्ये पण १२ देवता आहेत! तिथे या देवतांच्या समूहाला ‘जुनितेन’ म्हणतात. ‘जुनी’ म्हणजे १२ आणि ‘तेन’ म्हणजे देव. या बारा देवता आहेत -

  • Bonten – ब्रह्मदेव. बॉनतेनचे वाहन हंस आहे.
  • Taishakuten – इंद्र देव. हा देवांचा राजा आहे.
  • Katen – अग्नी देव. यज्ञात स्थापन करून हवी अर्पण करतात.
  • Suiten – वरुण देव.
  • Bishamon – वैश्रवण, कुबेर. हा संपत्तीचा देव आहे.  
  • Ishanaten – इशान किंवा शंकर. त्रिशूल धारण केलेली ईशानतेनची मूर्ती इथे पाहायला मिळाली.
  • Futen – वायू देव.
  • Rasetsuten – राक्षस. नैऋत्य दिशेचा देव. रक्षण करणारा.  
  • Enmaten – मृत्यूची देवता - यम देव. दक्षिण दिशेची देवता.
  • Jiten – पृथ्वी देवता.
  • Gatten – चंद्र देव. याच्या हातात सस्याचे चित्र असलेला अर्धचंद्र दाखवतात.
  • Nitten – सूर्य देवता. निततेन देव पाच किंवा आठ अश्वांवरील कमळावर विराजमान असतो. आणि त्याच्या उजव्या हातात सूर्याचा तेजस्वी गोळा असतो.

“जपानचे मूळ नाव निप्पोन आहे. ‘उगवत्या सूर्याचा देश’ या अर्थाने. आपल्यासारखेच हे पण राजांना सूर्याचे वंशज समजतात.

“निततेनची अनेक जुनी चित्रे मला मुसियमस् मधून पाहायला मिळाली. हे १५ व्या शतकातील, सिल्कच्या कापडावरील चित्रे. ”, सुमितने आजी-आबांकडे फोटो दिले.


 

 

“वाह! सुमित फारच झक्कास आहे ही जपानची गोष्ट.”, आबा म्हणाले

“आबा, तुम्ही मागे सूर्याच्या गोष्टी सांगितल्या, त्यामध्ये आपण कुठला यज्ञ पहिला नाही?”, सुमितने विचारले.  

“आता जपानी यज्ञ पहिलाच आहे, तर पुढच्या वेळी एक वैदिक यज्ञ आणि सूर्याची गोष्ट सांगेन.”, आबा म्हणाले.

 

References -

  1. A to Z Photo Dictionary, Japanese Buddhist Statuary
  2. Hindu Gods and Goddesses in Japan - Saroj Kumar Chaudhuri
  3. BENZAITEN-Japanese Gods and Goddesses - Barbara Lazar
  4. The Roots of Tantra, edited by Katherine Anne Harper, Robert L. Brown
  5. Sun painting from – Kyoto National Museum

- दीपाली पाटवदकर 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.