देणार्‍याने देत जावे...

    22-Nov-2017   
Total Views | 4

 
 
       
असे म्हटले जाते की, पोटात अन्नाचा कण नसला तर जगातील कुठलेही तत्त्वज्ञान डोक्यात जात नाही. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरही असे म्हणायचे की, ‘‘तुमच्याकडे रुपया असले तर आठाण्याची भाकरी घ्या आणि आठाण्याचे पुस्तक घ्या.’’ अन्नदानाच्या बाबतीतही असेच काहीसे म्हणावेसे वाटते. आपल्याला भुकेची चाहूल लागली की, लगेचच मनसोक्त आपल्याला हवे असणारे पदार्थ खाऊन मोकळो होतो आणि भुकेने मन तृप्त झाले की मग आपल्याला समाधान मिळते. पण, आपली भूक भागल्यानंतर आपल्या आजूबाजूला वावरणार्‍या, भुकेने व्याकुळ झालेल्यांचा विचार आपल्या मनात सहसा येत नाही. खरंतर ’अन्नदान’ हे सर्वात श्रेष्ठदान आहे, असे शाळेमध्ये असताना आपण शिकलो खरं, पण ते मर्यादित राहिले फक्त अभ्यासपुरते, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचा अवलंब क्वचित मंडळींनी केला असेल, हे एवढं मात्र नक्की. परंतु, काही व्यक्तींच्या आयुष्यात काही घटना, प्रसंग घडतात आणि मग त्यांना आपल्या भोवताली एखादी समस्या, प्रश्न भेडसावत आहे, याची जाणीव होऊ लागते. २५ वर्षांच्या अंकित कवात्राच्या बाबतीत असंच काहीसं झालं आणि त्यातून त्याने वाया जाणार्‍या अन्नासाठी चळवळ उभी केली. अंकित कवात्रा महाविद्यालयामध्ये असताना एका श्रीमंत कुटुंबाच्या लग्नाला गेला होता. या लग्नामध्ये तब्बल ३५ प्रकारचे वेगवेगळे पदार्थ जेवणामध्ये होते. पोटभरून जेवण केल्यानंतर अंकित मंडपामध्ये फिरत असताना एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. ती म्हणजे लग्नामध्ये आमंत्रण दिलेल्या पाहुण्यांच्या तुलनेने जेवण बरेच शिल्लक राहिले होते. शेवटी जेवण बनविणार्‍या आचार्‍यांनी एका क्षणामध्ये ते सगळं उरलेले जेवण कचर्‍याच्या डब्यामध्ये फेकून दिले. हे सर्व चित्र पाहिल्यावर अंकितला खूप वाईट वाटले. त्याच क्षणाला अंकितच्या मनात असा विचार आला की, आपल्याकडे रोज असे अनेक समारंभ होतात आणि त्यामध्ये असेच शिल्लक राहिलेले अन्न फेकून दिले जात असेल. किंबहुना, कित्येकदा घरामध्ये काहीसा अन्नाचा अंदाज चुकल्याने ते कधी फ्रिजमध्ये ठेवून दुसर्‍या दिवशी खाल्ले जाते किंवा थेट फेकून दिले जाते.
 
 
यावरून रोज आपल्या देशामध्ये वाया जाणार्‍या अन्नाच्या समस्यांची असलेली व्याप्ती आणि रोज देशात अन्नापासून वंचित राहणार्‍यांचा विचार अंकितच्या मनात आला आणि मग तिथूनच ’फीडिंग इंडिया’ या संस्थेची २०१४ मध्ये स्थापना करण्यात आली. गेल्या तीन वर्षांमध्ये या संस्थेचे जाळे जयपूर, कानपूर, पटना, कोलकाता, भुवनेश्वर, मुंबई, चेन्नई व इतर शहरांमध्येही पसरले आहे. आजघडीला भारताच्या ४३ शहरांमध्ये त्यांच्या संघटनेशी सुमारे ४३ हजार स्वयंसेवक जोडले गेले आहेत. संस्थेतील सर्व स्वयंसेवक लग्न तसेच इतर समारंभामध्ये शिल्लक राहिलेले अन्न जमवतात आणि ते गरजूपर्यंत पोहोचवितात. यासाठी संस्थेने एक हेल्पलाईन सुरू केली आहे. गरजेपेक्षा जास्त अन्न शिल्लक राहिल्याची माहिती फक्त या संस्थेला द्यावी लागते. मग त्या संस्थेचे स्वयंसेवक त्या अन्नाचे गरजवंतांना वाटप करतात. एवढेच नव्हे तर या अभियानामध्ये कॅटरर्स, छोटे-मोठे रेस्टॉरंटस्‌देखील सहभागी झाले आहेत. तसेच जमविण्यात आलेले अन्न खराब झाले नसल्याची खबरदारी घेऊनच त्याचे वाटप केले जाते. अंकितने बजावलेल्या या योगदानाची दखल घेऊन त्याला संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये २०१७ चा ’यंग लीडर्स ऍवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले आहे. आज देशात कोट्यवधी लोक अन्नाला मुकतात, तर दुसरीकडे समारंभामध्ये होणारी अन्नाची नासाडी बघितल्यानंतर गेल्या तीन वर्षांत अंकित व त्याच्या सहकार्‍यांनीकेलेले काम कौतुकास्पद आहे.
 
 
देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्‍याचे हात घ्यावे
 
 
कवि विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे अंकितचा कामाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून येणार्‍या पुढच्या काळात असे अनेक अंकित गरजूंना मदतीचा हात देतील, अशी अपेक्षा करूया. 
 
 
 
- सोनाली रासकर 
 
 

सोनाली रासकर

समाजशास्त्र, इतिहास घेऊन बी.ए. पत्रकारिता व मास कम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा केला आहे. फिचर स्टोरी, तसेच  सामाजिक विषयावरील लिखाणाची आवड, गुन्हेगारीशी संबंधित मालिका बघण्यामध्ये रस. सध्या दै. ’मुंबई तरूणभारत’मध्ये उपसंपादक या पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121