इंदिरा गांधींचे जन्मशताब्दी वर्ष

    21-Nov-2017
Total Views | 9

 
 
आधुनिक भारत घडविण्यात ज्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे, त्यात पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंनंतर त्यांची कन्या व भारताच्या तिसर्‍या पंतप्रधान इंदिरा गांधींचा नंबर लागतो. १९ नोव्हेंबरला त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. पंडित नेहरुंनंतर इंदिरा गांधीच जास्तीत जास्त वर्षं पंतप्रधानपदी होत्या. त्यांची कारकीर्द दोन भागात अभ्यासावी लागते. १९६६ ते १९७७ ही पहिली इनिंग तर १९८० ते १९८४ ही दुसरी.
 
 
इंदिरा गांधींचा जन्म१९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला होता. त्यांचा ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या राहत्या घरी खून झाला. त्यांच्यामागे आजोबा मोतीलाल नेहरू व वडील जवाहरलाल नेहरू यांचा राजकीय वारसा होता. त्यांनी यथावकाश राजकारणात प्रवेश केला. असे सहज म्हणता येईल की, पंडित नेहरूंचे एकुलते एक अपत्य म्हणून त्यांचा राजकारणातील प्रवेश सुकर झाला, पण आपल्या देशात हिंदी सिनेमा, क्रिकेट व राजकारण ही तीन अशी क्षेत्रे आहेत, जेथे फार काळ वाडवडिलांची पुण्याई कामाला येत नाही. या तीन क्षेत्रांतील प्रत्येकाला प्रत्येक टप्प्यावर धडपड करावी लागते व स्वतःला सिद्ध करावे लागते. इंदिरा गांधींनाही हेच करावे लागले. त्यांचे राजकीय चरित्र तर असे दाखवते की, त्यांना पक्षाबाहेरच्या विरोधकांपेक्षा पक्षांतर्गत विरोधकांशी जास्त लढावे लागले. इंदिरा गांधींचे राजकीय शिक्षण घरीच झाले. पंडित नेहरूंनी त्यांना लिहिलेली पत्रं पुस्तकरूपाने उपलब्ध आहेत. ही पत्रं वाचणे म्हणजे एक बौद्धिक मेजवानी आहे. यात पंडितजींची अफाट बुद्धिमत्ता तर दिसतेच, पण त्यांना उत्तरं देणारी इंदिरासुद्धा काही कमी दर्जाची नाही, हेही लक्षात येते.
 
 
ज्या काळी इंदिराजींच्या हाती देशाची सूत्रं आली तेव्हा कॉंग्रेसमध्ये ‘जुनी पिढी विरुद्ध नवी पिढी’ असा वाद सुरू झाला होता. लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूनंतर कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान होऊ नये, असे वाटत होते. त्यांनी इंदिरा गांधींना पंतप्रधानपदी बसवले. कामराज, स. का. पाटील, अतुल्य घोष वगैरे जुन्या खोडांची अपेक्षा होती की, ही अनुनभवी बाई आपल्या तालावर नाचेल. पण इंदिरा गांधींनी सत्ता हाती येताच धडाक्यात काम सुरू केले. याने देशाचे राजकारण तर बदललेच शिवाय कॉंग्रेस पक्षात जुलै १९६९ मध्ये उभी फूट पडली. इंदिराजींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले व संस्थानिकांचे तनखे बंद केले. यातून पुरेशी ताकद आल्यावर त्यांनी डिसेंबर १९७० मध्ये लोकसभा विसर्जित करून मार्च १९७१ मध्ये मध्यावधी निवडणुका घेतल्या. या निवडणुकांत कॉंग्रेसने दणदणीत यश मिळवले. त्यांच्या कर्तृत्वाचे दोन उत्कर्षबिंदू दाखवता येतात. एक म्हणजे, डिसेंबर १९७१ मध्ये झालेला बांगलादेशचा जन्मव दुसरा मे १९७४ मध्ये केलेला अणुस्फोट.
 
 
त्यानंतर त्यांचा आलेख झपाट्याने उताराला लागला. सरतेशेवटी त्यांनी जून १९७५ मध्ये अंतर्गत आणीबाणी लादली. सुमारे २२ महिने राहिलेल्या आणीबाणीत जनतेवर अमानुष अत्याचार झाले. शेवटी इंदिरा गांंधींनी मार्च १९७७ मध्ये आणीबाणी उठवली व निवडणुका घेतल्या. यात त्यांचा व्यक्तिशः व पक्षाचा दारूण पराभव झाला. त्यानंतर जनता पक्ष सत्तेत आला, पण जुलै १९७९ मध्ये जनता पक्षाचे सरकार कोसळले. परिणामी, जानेवारी १९८० मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. यात इंदिरा गांधी दणदणीत बहुमताने सत्तेवर आल्या. येथून त्यांची दुसरी इनिंग सुरू झाली.
 
 
ही दुसरी इनिंग जास्त खळबळजनक होती. यात आसाममधील विद्यार्थ्यांची चळवळ, तेलगू देसमसारख्या प्रादेशिक पक्षांची वाढत असलेली लोकप्रियता, खलिस्तानची चळवळ, रामजन्मभूमीची आकाराला येत असलेली चळवळ वगैरे जबरदस्त आव्हानं त्यांची वाट पाहत होती. याच काळात त्यांचा सुपुत्र संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू झाला. खलिस्तानी दहशतवाद संपविण्यासाठी त्यांना सुवर्ण मंदिरात लष्कर घुसवावे लागेल. शेवटी त्यांच्या शीख अंगरक्षकांनीच इंदिरा गांधींची हत्या केली. इंदिरा गांधी सर्व गुणसंपन्न नेत्या होत्या, असे म्हणता येणार नाही. त्यांची जशी चांगली बाजू होती तशीच काळी बाजू होती. त्यांच्या चांगल्या कामाचा जसा आजही प्रभाव जाणवतो तसाच त्यांच्या वाईट कामाचा आजही प्रभाव जाणवतो. त्यांनी कॉंग्रेस पक्षात घराणेशाही रूजवली, सत्तेचे कमालीचे केंद्रीकरण केले व व्यक्तिपूजेचे स्तोम माजवले. त्यांचे काही चांगले निर्णय म्हणजे बँकांचे राष्ट्रीयीकरण. यातून अर्थव्यवस्थेत भांडवल खेळायला लागले. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत बँकिंग क्षेत्राला महत्त्व असते. जगातील अनेक देशांत बँका जेव्हा बुडत होत्या, तेव्हा हा प्रकार भारतात होत नव्हता. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, भारतात बँकिंग क्षेत्रावर अतिशय कडक नियम आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने पूर्व पाकिस्तानचा अवघ्या १४ दिवसांत सपशेल पराभव केला. इंदिरा गांधींनी या संदर्भात लष्कराला पूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्याची मोकळीक दिली होती. उपलब्ध पुरावा असे दाखवतो की, इंदिरा गांधींना जून-जुलै १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानवर हल्ला करावा असे वाटत होते. पण तत्कालीन लष्करप्रमुख सॅम माणेकशॉं यांनी याला विरोध केला व डिसेंबर १९७१ च्या आधी लढाई सुरू करणे धोक्याचे ठरेल, असा स्पष्ट इशारा दिला होता. इंदिरा गांधींनी लष्करप्रमुखाचा सल्ला प्रमाण मानला.
 
 
पंडित नेहरूंप्रमाणेच इंदिरा गांधींना अणुशक्तीचे राजकारणातील महत्त्व माहिती होते. पंडित नेहरूंच्या मे १९६४ मध्ये मृत्यूनंतर चीनने १९६८ मध्ये पहिला अणुस्फोट केला. हा भारताला गर्भित इशारा होता. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय शास्त्रज्ञांनी अवघ्या सहा वर्षांतच म्हणजे मे १९७४ मध्ये अणुस्फोट केला. येथे सुद्धा इंदिराजींचे योगदान मान्य केले पाहिजे. या त्यांच्या सकारात्मक योगदानाची चर्चा करताना त्यांच्या नकारात्मक राजकारणाचीसुद्धा चर्चा करणे गरजेचे आहे. त्यांच्या काळात पक्षातील ‘हाय कमांड’चे (म्हणजे प्रत्यक्षात त्यांचे स्वतःचे) प्रस्थ फार वाढले होते. प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री त्या राज्यातील निवडून आलेले आमदार करत नसत तर दिल्लीहून याचा निर्णय होई. त्यांच्याच काळात भ्रष्टाचाराची काही प्रकरणे गाजली. दिल्लीतील स्टेट बँकेचा अधिकारी मल्होत्रा व नगरवाला यांनी बँकेतून काढलेले ३३ लाख रुपयांचे प्रकरण, अंतुल्यांचे सिमेंट वाटप प्रकरण, क्युओ ऑईल डिल वगैरे प्रकरणांत त्यांची प्रतिष्ठा कमी झाली.
 
 
त्यांनीच ग्यानी झैलसिंगांच्या मदतीने पंजाबातील अकाली दलाचा प्रभाव कमी करण्यासाठी संत जर्नेलसिंग भिंद्रनवालेसारखा राक्षस पोसला. शेवटी राक्षस त्यांच्यावरच उलटला. त्यांनी अनेक प्रसंगी लोकशाही मूल्यं परंपरा पायदळी तुडवल्या. त्यांनी १९७० च्या दशकात तर ’बांधिलकी मानणारी नोकरशाही’ व ’बांधिलकी मानणारी न्यायपालिका’ वगैरे संकल्पना चर्चेत आणून खळबळ माजवली होती. त्यांच्याच कारकिर्दीत न्यायाधीशांच्या नेमणुकांत सरकारचा हस्तक्षेप वाढला होता.
 
 
प्रत्येक मोठ्या नेत्याचा राजकीय प्रवास यशापयशाने भरलेला असतो. इंदिरा गांधी याला अपवाद नाहीत. आता त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. वर्षभर व त्यानंतरही त्यांच्या योगदानाची उलटसुलट चर्चा होत राहील. फक्त दोन गोष्टींबद्दल सतत कुतूहल उरले आहे व ती म्हणजे २२ महिने आणीबाणीदरम्यान गोरगरिबांवर जे अन्याय झाले ते त्यांना माहिती होते की नव्हते? दुसरी बाब म्हणजे, वरवर पाहता त्यांना आणीबाणी उठविण्याचे काहीही कारण नसताना त्यांनी अचानक मार्च १९७७ मध्ये आणीबाणी का उठवली? या संदर्भात दोन्ही बाजूंनी भरपूर पुरावे दिले जात असतात, पण अजूनही याबद्दल स्पष्टता नाही. प्रत्येक पिढीला नवे पुरावे मिळतात जे आधीच्या पिढीसमोर नव्हते. म्हणूनच मोठ्या व्यक्तींच्या योगदानाबद्दल सतत चर्चा होत असते. इंदिरा गांधीही याला अपवाद नाही. 
 
- प्रा. अविनाश कोल्हे
अग्रलेख
जरुर वाचा
इस्लामिक दहशतवादी संघटना हमासची वकीली करणाऱ्यांना कायदेशीर दणका

इस्लामिक दहशतवादी संघटना हमासची वकीली करणाऱ्यांना कायदेशीर दणका

काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालून मारण्यात आले. राष्ट्रीय माध्यमांवर पाक व्याप्त काश्मीर येथे हमास या दहशतवादी संघटनेचे कनेक्शन बाबत बातम्या आल्या. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ला हमास स्टाईल असल्याचे वृत्त झळकले. पुढे 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणे हवाई हल्ले करून उडवले. युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली. दि. १० मे २०२५ रोजी BDS movement नावाने काही संशयित लोकांनी कर्वेनगर भागात पॅलेस्टीन समर्थनार्थ ..

विनय ना मानत जलध जड़ गए तीन दिन बीति। बोले राम सकोप तब भय बिनु होय ना प्रीति

विनय ना मानत जलध जड़ गए तीन दिन बीति। बोले राम सकोप तब भय बिनु होय ना प्रीति'

काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'ने प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केलेच, तर पाकिस्तानी हवाई दलालाही हादरवून टाकले. सोमवार, दि. १२ मे रोजी तिन्ही लष्कर प्रमुखांनी दिल्ली येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत या कारवाईची संपूर्ण माहिती दिली. दरम्यान, भारतीय हवाई दलाचे डीजीएमओ, एअर मार्शल ए.के. भारती यांनी गोस्वामी तुलसीदास यांच्या 'रामचरितमानस' मधील "विनय न मानत जलधि जड़, गए तीन दिन बीत, बोले राम सकोप तब, भय बिनु ..

भारतानं हल्ला केल्याचं नाकारलं,

भारतानं हल्ला केल्याचं नाकारलं, 'त्या' पाकिस्तानच्या किराना टेकड्यांचं गुपित नेमकं काय?

(Pakistan Kirana Hills) पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतरही पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ले करण्याचे प्रयत्न केले जे भारतीय हवाई दलाने परतवून लावले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानचे ११ हवाई तळ उद्ध्वस्त केले. यानंतर अश्या चर्चा सुरु होत्या की, भारताने फक्त हवाई तळच नव्हे तर पाकिस्तानची अणुभट्टी 'किराणा हिल्स'वर ही लक्ष्य केले. मात्र भारतीय हवाई दलाचे डीजीएओ ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121