घरात आल्या आल्या बंड्याने पायातले बूट आणि मोजे काढून दाराच्या दिशेने भिरकावले. आतल्या खोलीकडे जातांना शाळेचे दप्तर, डब्याची पिशवी, पाण्याची बाटली लीलया टाकून दिली. आतल्या खोलीत गणवेशाची खाकी चड्डी, पांढरा शर्ट, मळकट रुमाल, २-४ चुरगळलेले कागदाचे बोळे, इत्यादी ऐवज अस्ताव्यस्त फेकला. कपडे बदलतांना कपाटातून ३-४ शर्ट इकडे तिकडे विखुरले. शाळेच्या गणवेशाचे बोळे एका बाजूला फेकले. आणि मग तोंड विसळून युवराजांनी स्वयंपाकघरा कडे मोर्चा वळवला. "आई, भूक!" अशी आरोळी कानावर आली!
शाळेतल्या बारिक सारिक घडामोडी, म्हणजे दिवसभरातील भांडणे, कुणाला कुणाला झालेली शिक्षा, कुठलीशी मारामारी – असा तपशील ताशी सदतीस हजार शब्दांच्या वेगाने आईला सांगितला. टेबलावर दुधाच्या कपाची रिंगणं आणि ब्रेड-बिस्किटाचा चुरा सांडून स्वारी गृहपाठ संपवायला निघाली.
२३ वह्या दप्तरातून, कपाटातून, टेबलावरून भराभर खोलीभर ठाण मांडून बसल्या. कंपास आ वासून पडला. ७ पेन्सिली कम्पासाच्या कैदेतून मुक्त होताच चौफेर पळल्या. ३ खोडरबरं आणि २ गीरगीटे उताणी पडली. ३७ रंगीत खडू खुर्ची खाली, दिवाणा खाली, टेबला खाली, पलीकडच्या खोलीत, जमेल तिथे घरंगळत गेले.
अर्ध्या तासाच्या एकपात्री नाटकात – १३ मिनिटे खाडाखोड करण्यात आणि ७ मिनिटे पेंसिलींना टोक करून कचरा करण्यात गेली. उरलेल्या १० मिनिटात कसातरी गृहपाठ संपवला. आणि आपल्या पसाऱ्याची एक लांबच लांब शेपूट मागे ठेवून बेटा खेळायला पसार झाला!
नंतर आई ज्या ज्या खोलीत गेली, तिथे तिथे तिने इतस्त पडलेल्या वस्तू गोळा केल्या. बंड्या दुसऱ्या दिवशी शाळेतून घरी आला तरी आदल्या दिवशीचा पसारा गोळा करून झालाच नव्हता!
आईने लेकराच्या धान्दरटपणाचा कित्ती उद्धार केला तरी तिचा राग वरवरचा होता. रागावेल तरी कशी ती? बंड्या म्हणजे घरातला उत्साहाचा झरा होता! तिच्या जीवनाचा स्रोत होता!
बंड्या सारखीच तऱ्हा धूमकेतूंची. हे धुमकेतू, दिसायला छोटे दिसले तरी पसारा करण्यात एक नंबर मिळवणार!
आता आपला हेलेचाच धुमकेतू घ्या. साधारण १०० अब्ज किलोचा (2.2×1014 kg) बर्फ, धूळ आणि दगडांचा गोळा. सूर्या पासून ४.५ अब्ज किलोमीटर दूर असलेल्या Kuiper Belt चा रहिवासी. त्याला सूर्या भोवती एक प्रदक्षिणा घालायला ७५ वर्ष लागतात. प्रदक्षिणा घालतांना धुमकेतू जसा सूर्याच्या जवळ येतो, तशी त्याच्या बर्फाची वाफ होते. धुळीचे कण सैल होतात. गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे लहान दगड, गोटे, धूळ निखळते. धुमकेतू पासून अलग होते. Solar-winds मुळे हे धुलीकण सूर्याच्या विरुद्ध दिशेला फेकले जातात. धुमकेतूच्या मागे लाखो किलोमीटर लांबीची धूलीकणांची शेपूट पसरते. धूमकेतूच्या शेपटीतील हा धुराळा धुमकेतूच्या कक्षेतून सूर्याची परिक्रमा करतो.
हेलेचा धुमकेतू साधारण १० कोटी किलो धूळ त्याच्या रस्त्यात इतस्त टाकून जातो. प्रत्येक फेरीत धूमकेतूचे वजन कमी होत होत त्याचा शेवट होतो. काही धुमकेतू ग्रहांवर आदळून नष्ट होतात. पृथ्वीच्या बालपणी आकाशात सर्रास धुमकेतू दिसत. अनेक धुमकेतू पृथ्वीवर आदळले. शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर जे पाण्याचे महासागर आहेत, ते या बर्फमय धुमकेतूंनी आणलेल्या बर्फाचे आहेत. जीवनाचे बीज पण धुमकेतू घेऊन आले असा एक कयास आहे.
काही धूमकेतूची कक्षा पृथ्वीच्या कक्षेस छेदते. जेंव्हा जेंव्हा पृथ्वी या छेदबिंदू वर येते तेव्हा या धुलीमय प्रदेशातून जमेल तेवढा पसारा गोळा करते. पृथ्वीच्या वातावरणात हे धूलीकण अती वेगाने प्रवेश करतात. पृथ्वीतील वातावरणाशी धूलीकणांचे घर्षण होऊन त्यांचे तापमान वाढत जाऊन ते पेट घेतात. चांदणी निखळल्या सारखी एक उल्का आकाशातून उतरतांना दिसते. धुमेतूच्या धूरळ्यामुळे आपल्याला एका मागोमाग एका अशा अनेक उल्का येताना दिसतात. या उल्का वर्षावात आपल्याला मिनिटाला १ ते ६ उल्का दिसू शकतात.
जो धुमकेतू पृथ्वीच्या कक्षेला छेदून जातो, तो त्याचा स्वतंत्र पसारा सोडून जातो. त्या पसाऱ्याचा स्वतःचा असा एक उल्का वर्षाव होतो. सूर्या भोवती ठराविक ठिकाणी हे धुलीकण असल्यामुळे, दर वर्षी ठराविक दिवसांना उल्का वर्षाव होतात. हेलेचा धुमकेतू पृथ्वीच्या कक्षेला दोन ठिकाणी छेदतो. या दोन बिंदूंवर पृथ्वी एकदा मे महीन्यात आणि एकदा ऑक्टोबर महीन्यात येते. मे महीन्यातील या उल्का कुंभ तारका समुहाच्या तर ऑक्टोबर मधील उल्का मृग तारका समुहाच्या दिशेने येताना दिसतात. टेम्पल – टटल धुमकेतूची कक्षा पृथ्वीच्या कक्षेला एका ठिकाणी छेदते. वर्षातून एकदा नोव्हेंबर मध्ये सिंहराशीतून या धूमकेतूचा उल्का वर्षाव दिसतो.
उल्का वर्षावाने रात्रीचे आकाश आतिषबाजीने सजते, पेटत्या तेजस्वी कणांचा हा वर्षाव जणु रत्न वर्षाव भासतो!
- दिपाली पाटवदकर