मेधाकाकू : अवंती... कालच्या अभ्यासातील शेवटचा तुझा प्रश्न आणि तुझे अनुमान, अगदी योग्य आहे बर कां...!!.. आपला दाम कुढा आणि वाण्याशी झगडा हा वाकप्रचार निश्चितपणे मूळ मुद्दा अतिशयोक्तीने ध्वनित करतो. यातील उपमेय आहे ‘आपला दाम कुढा’ म्हणजे त्या व्यक्तीला जाणवणारी पैशाची चणचण. या उपमेयातील विफलता किंवा त्या व्यक्तीची अस्वस्थ भावना आणि त्यातून निर्माण होणारा भयगंड किंवा न्यूनगंड स्पष्ट करण्यासाठी, त्या व्यक्तीची सामाजिक व्यक्त होणारी क्रिया म्हणजे ‘वाण्याशी झगडा’ या उपमांनाचा चपखल वापर या वाकप्रचारात केला गेलेला दिसतो. यात केलेल्या अतिशयोक्ती मुळे याची श्राव्य रंजकता वाढतेच आणि मूळ मुद्दा निश्चित लक्षात रहातो. ‘रसगंगाधर’ या मराठी व्याकरणासंदर्भातील ग्रंथात, लेखक पंडितराज जगन्नाथ यांनी या अतिशयोक्ती अलंकाराची सहा लक्षणे सांगितली आहेत. याच ग्रंथात, त्यांनी लिहिलेले अन्य ७१ भाषा अलंकारांचे उत्तम स्पष्टीकरण आपल्याला वाचायला मिळते.
अवंती : आहा. आहा, मेधाकाकू. मस्तय - मस्तय, गुरूने दिलेली पसंतीची पावती आता कायम माझ्या मनात मी कोरून ठेवणारे. मेधाकाकू... या अभ्यासाने खूप वेगळी दृष्टी नक्की दिल्ये मला... प्रत्येक गोष्टीकडे बघताना, आता मी प्रत्यक्ष न दिसणारे संदर्भ शोधायला शिकल्ये...!!
मेधाकाकू : व्वा अवंती... मला खूप छान वाटतंय, मात्र त्याचे कारण वेगळ आहे. आता तुला सांगायला हरकत नाही. गेल्या उन्हाळी सुट्टीत, तुझी दीपाली मावशी आली होती तुझ्या घरी आठवडाभर रहायला. तेंव्हा तिने मला गळ घातली आणि म्हणाली की, अवंती इंग्लिश माध्यमात शिकत्ये आहे पण, मी, तुझ्या मराठी भाषेवर थोडी मेहनत घ्यावी. कसे करायचे... काय करायचे ते मीच ठरवावे असे ती माझ्या कानात सांगून गेली आणि मग आपला हा अभ्यास सुरु झाला. इतकी तुझी काळजी आहे तिला, हे पाहून मलाही खूप छान वाटले त्या दिवशी...!!..आणि याला समर्पक वाकप्रचार सुद्धा फार मजेशीर सापडला.
सोने पहावे कसून माणूस पहावे बसून.
मेधाकाकू : इथे तुझ्या लक्षात येईल... कि आपल्या चतुर-विवेकी पूर्वजांनी सोन्यासारख्या मौल्यवान गोष्टीशी माणसाची तुलना केली आहे. एक वस्तू-एक व्यक्ती. दोन्ही अमूल्य आणि मग लक्षात येत कि विविध वस्तूच्या गुणवत्तेशी - प्राण्यांच्या स्वभावधर्माशी, मनुष्य स्वभावाची आणि प्रवृत्तींची तुलना का केली गेली असावी. या वाकप्रचारात, ‘सोने पहावे कसून’ याचा वेगळा अर्थ सांगायची आवश्यकता नाही कारण सोन्याची पारख-परीक्षा करायची ती योग्य पद्धत आहे. ’माणूस पहावे बसून’ याच्या अर्थला मात्र खूप परिमाणे आहेत. एखाद्या माणसाचा स्वभाव, प्रवृत्ती आणि एकूणच व्यक्तिमत्व समजून घ्यायला वेळ लागतो ती काही क्षणात होणारी क्रिया नाही. तुझा मोठा भाऊ आदित्य आणि त्याची बायको दीप्ती, दोघेही भेटले होते काही दिवसान पूर्वी, त्यावेळी ते मुंबई-लडाख-मुंबई अशी त्यांची चौथी बुलेट राईड करून आले होते. तेंव्हा त्यांच्या बोलण्यात आले कि महिनाभराच्या अशा बुलेट राईडच्या प्रवासात ग्रुपमधले सगळे सहकारी नीट ओळखता येतात. तर ’माणूस पहावे बसून’ ह्या तीन शब्दाना खूप सूक्ष्मार्थ आहे.
अवंती : कमाल आहे... मेधाकाकू तुझी किती ठिकाणी लक्ष असते तुझे. किती गोष्टी लक्षात राहतात तुझ्या आणि त्या योग्य वेळी-योग्य ठिकाणी वापरतासुद्धा येतात तुला. तू अवाक करतेस आम्हा मुलांच्या Awsome या आवडत्या शब्दाला मी मराठी प्रती शब्द वापरात्ये ’अवाक’... लक्षात आलें असेलच तुला.
मेधाकाकू : काय अवंती... आज फारच कौतुक सुरु आहे... मेधाकाकुच... काही विशेष प्रयोजन...?
अवंती : अग... असे काही नाहीये... मात्र माझ्या दोघी मैत्रिणी सॉलीड खूष असता माझ्यावर हल्ली. कारण आपल्या अभासातल्या चार गमती मी त्याना सांगते ना, तेंव्हा त्या मला ‘Awsome अवंती’ अशी दाद देतात. म्हणून मी तुला देत्ये.. इतकेच...!!..
मेधाकाकू : अरेच्या... काय मस्त जागा दिल्येस मला विशत पुढे न्यायला.. आता हे ऐक... वाच... काय म्हणतोय हा वाकप्रचार...
मोहोर सोडून घ्यावी चिंधी फेकून द्यावी.
मेधाकाकू : अवंती... यातली ‘मोहोर’ म्हणजे काहीही मौल्यवान गोष्ट. मग यात सोने आले, माणसे आली, ज्ञान आले आणि माहितीही आली, निसर्ग आणि त्यातील झाडे आणि अन्य सजीव सृष्टीही आलीच की. आता तूच बघ... आपल्या अभ्यासातल्या खूप गोष्टीपैकी नेमक्या चार-सहा गोष्टी तू मैत्रीणीना सांगितल्यास, आनंद निर्माण केलास... माहितीत, ज्ञानात थोडीशी भरच पडली त्यांच्या. या वाकप्रचारात नेमका हाच भावार्थ स्पष्ट झालाय. जे योग्य आहे तेच स्वीकारावे. आपला विवेक वापरून ठेवण्यासारखे काय आणि फेकण्या सारखे काय ते स्वतः च ठरवायला शिकायचे.
अवंती : Awsome आहेस... अवाक करतेस... आता हेच बघ.. माझेच एक वाक्य वापरून विषय पुढे कसा नेतेस... म्हणून अवाक करतेस. म्हणून तुझे आभाळा एवढे कौतुक मला आणि माझ्या मैत्रीणीना...!!
- अरुण फडके