
समस्त मुंबईकर, तुम्ही जर दररोज लोकलने प्रवास करत असाल तर जरा सांभाळून प्रवास करण्याचा सल्ला द्यावासा वाटतो. आता तुम्ही म्हणाल, त्यात म्हणा नवीन ते काय? कारण, धावती लोकल पकडताना, रेल्वेचे रूळ ओलांडताना होणारे अपघात, महिला, तरुणींची होणारी छेडछाड, चेंगराचेंगरी अशा प्रकारच्या विविध घटनांमुळे प्रवाशांना नेहमीच जपून प्रवास करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, आता वेगळ्या कारणांसाठी रेल्वेचा प्रवास धोकादायक बनत चालला आहे. लोहमार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०१७ मध्ये विविध प्रकारच्या चोरीच्या तब्बल १३ हजार ५६५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यातील अवघ्या २,०२९ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे लोकलप्रवासादरम्यान प्रवाशांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. केवळ मुंबईमध्ये नव्हे, तर संपूर्ण राज्यामध्ये तसेच देशामध्ये रेल्वे प्रवासादरम्यान, चोरी, लूटमार, दरोड्याचे प्रकार आज वरचेवर ऐकायला मिळतात. दोनच दिवसांपूर्वी हावडा रेल्वे मार्गावर लूटपाट करणार्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. दिल्ली-हावडा रेल्वेमार्गावर धावणार्या रेल्वेमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत होती. याच पार्श्वभूमीवर सुरजपूर कोतवाली पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्त कारवाई करून लूटमार करणार्या टोळीला अटक केली. ही टोळी रेल्वेरुळांच्या मधोमध नाणं टाकून हिरवा सिग्नल लाल करत असत, ज्यामुळे रेल्वेचालक रेल्वे थांबवत असे आणि याचाच फायदा घेऊन दरोडेखोर प्रवाशांना लुटत होते. सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वे हा एक अविभाज्य घटक आहे. मुंबईपाठोपाठ इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये रेल्वेचे जाळे झपाट्याने विस्तारू लागले आहे. तीन ते चार तासाच्या अंतरापासून ते अगदी तीन ते चार दिवसांचा प्रवास करण्यासाठी रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य दिले जाते. यातून कोट्यवधींचा महसूल रेल्वेच्या खात्यात जमा होतो. इतकं सगळं असतानाही सुरक्षित रेल्वे प्रवासाची हमी मात्र आता देता येत नाही. लूटमारीच्या घटनांमध्ये अनेकदा प्रवाशांवर हल्ले केले जातात. त्यातून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य पाहाता सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी ठोस उपाययोजना करणे अपेक्षित आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा लूटमारीच्या घटनांमधून होणारी दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
केवळ प्रतीक्षा...
रायन इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी प्रद्युम्न ठाकूरच्या हत्येप्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या अकरावीच्या विद्यार्थ्याने आपण प्रद्युम्नची हत्या केल्याचे कबूल केले होते, पण याच विद्यार्थ्याने बालसंरक्षण अधिकार्यासमोर माज्ञ ‘आपण हत्या केली नाही,’ असे म्हटले आणि पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला. ’त्या’ निष्पाप चिमुरड्याला न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा तपासाची चक्रे वेगाने फिरतील, यात वाद नाही. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार, असा विचार प्रद्युम्नच्या कुटुंबीयांच्या मनात रात्रंदिवस येत असेल. त्यामुळे आता हे प्रकरणदेखील आता प्रलंबित खटल्यांमध्ये तर धूळखात पडणार नाही ना, अशी चिंता सतावू लागली आहे. आजघडीला संपूर्ण देशात जिल्हा न्यायालयांमध्ये २.८ कोटी खटले प्रलंबित असल्याचे वृत्त नुकतेच प्रकाशित झाले होते. या आकडेवारीवरून प्रलंबित खटल्याचे प्रकरण किती गंभीर आहे, याची प्रचिती येते. आज कित्येक गुन्हे घडले असून अजूनही संबंधित गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. अर्थात, यामागे अनेक कारणे आहेत. चोर सोडून संन्यासाला फाशी म्हणतात त्यातलाच काहीसा हा प्रकार आहे. खर्या आरोपीला सोडून भलत्याच आरोपीला उभे करून त्याच्याकडून बळजबरीने गुन्ह्याची कबुली वदवून घेतली जाते. आज अभिनेत्री जिया खान, आरूषी, पत्रकार गौरी रंकेश, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांसारखी अनेक उदाहरणे देता येतील. काही केसेसचा छडा सहज लावता येत असला तरी काही केसेस इतक्या गुंतागुतीच्या असल्यामुळे ती प्रकरणे सुटत नाही आणि यामध्ये बराच कालावधी निघून जातो. अर्थात पोलीस यंत्रणेसमोर ते एक प्रकारचे आव्हान असते, कारण आज गुन्ह्याचे स्वरूप इतके गुंतागुंतीचे झाले आहे की, ते सहजासहजी सुटत नाही. रोज त्या घटनेविषयी मिळणारी नवीन माहिती, त्या माहितीमधील असलेली सत्यता तपासणे, सतत बदलणारे जबाब, गुन्हेगाराची पार्श्वभूमी, लोकांची बदलत चालेली मानसिकता यामुळे अंदाज लावता येत नाही. अनेकदा घटनांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तींच्या जवळची व्यक्ती गुन्हेगार असतात. अर्थात, या प्रकरणामध्ये जीव गमावून बसणार्या व्यक्ती कधी दोषी असतात. त्यांनी केलेल्या गैरकृत्याची शिक्षा देण्यासाठी त्यांचा जीव घेतला जातो. त्यामुळे दोन्ही बाजूंनी विचार करून हे कोडे सोडवावे लागते. परंतु, या सर्वांमध्ये कोणतीच चूक नसताना न्यायाची प्रतीक्षा करणार्यांची मात्र कीव येते.
- सोनाली रासकर