आज भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांचा जन्मदिवस आहे. बऱ्याच वृत्तपत्रांतून त्यांचे गोडवे गाणारे लिखाण छापून आलेले आहे. समाजमाध्यमांमधूनही काही स्वघोषित नेहरू 'फ्यानबॉय' आणि 'फ्यानगर्ल' नेहरूंबद्दल साखरेत घोळलेले, तुपात तळलेले शब्द उधळण्यात दंग आहेत, पण वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. गेले दोनेक महिने मी ट्विटरवर 'नो युअर लेगसी' #KnowYourLegacy ह्या हॅशटॅगखाली एक ट्विटर पोल चालवतेय. काँग्रेस पक्षाची खरी परंपरा लोकांपर्यंत पोचावी हा ह्या ट्विटर पोल मालिकेचा हेतू आहे. ह्या ट्विटर पोल मालिकेसाठी प्रश्न काढताना मी काँग्रेस पक्षाविषयी, त्या पक्षाच्या बद्दल खूप वाचन केलंय, खूप लोकांशी ह्या विषयावर बोलले आहे आणि काँग्रेस पक्षाची जी लेगसी मला दिसली ती फार भयानक आहे. केवळ नेहरू, इंदिरा, राजीव आणि सोनिया ह्या चार काँग्रेस नेत्यांबद्दल थोडं संशोधन केलं तरी पीएचडीचे पन्नास प्रबंध होतील एवढी सामग्री सहज सापडेल.
नेहरूंची जी दिलदार, शत्रूंनाही मान देणारी, उदारमतवादी व्यक्ती अशी प्रतिमा जनमानसात काँग्रेस पक्षाने रंगवलेली आहे त्या प्रतिमेपेक्षा खरे नेहरू किती वेगळे होते हे भारताचे प्रथम राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसाद ह्यांच्याशी ते कसे वागले हे बघितले तरी कळते. बाबू राजेंद्रप्रसाद हे तळागाळातून वर आलेले काँग्रेसचे नेते. राजेंद्र प्रसाद ह्यांना आपल्या हिंदू असण्याचा अभिमान होता. पाश्चिमात्य शिक्षण, विचारपद्धती, मूल्यव्यवस्था ह्या सगळ्याविषयी बाबू राजेंद्रप्रसाद ह्यांच्या मनात आदर होता पण नेहरूंसारखे ते स्वतःला 'अपघाती भारतीय' म्हणवून घेऊ इच्छित नव्हते. नेहरू पडले पक्के 'सेकुलर'. बाबू राजेंद्र प्रसाद त्यांना जुनाट मतांचे वाटायचे. १९४९ मध्ये जेव्हा स्वतंत्र भारताची घटना तयार करण्यात येत होती तेव्हा राजधानी दिल्लीत स्वतंत्र भारतीय प्रजासत्ताकाचा पहिला वाहिला राष्ट्रपती कोण होणार ह्या विषयावरून पडद्यामागे जोरदार हालचाली सुरु होत्या. नेहरूंचा पाठिंबा तेव्हा गव्हर्नर जनरल म्हणून काम करणारे सी. राजगोपालाचारी ह्यांना होता, कारण राजाजी नेहरूंप्रमाणेच पाश्चात्य विचारांचा, शिक्षणाचा आदर करणारे नेते होते. पण काँग्रेसमधल्या इतर नेत्यांचा आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा मात्र बाबू राजेंद्र प्रसाद ह्यांनाच होता. सरदार पटेलही बाबू राजेंद्र प्रसाद ह्यांच्या बाजूने होते. ह्याआधी जेव्हाजेव्हा पटेल आणि नेहरू ह्यांच्यामध्ये मतभेद झाले होते तेव्हा तेव्हा महात्मा गांधी ठामपणे नेहरूंच्या बाजूने उभे राहिले होते. अगदी स्वतंत्र भारताचा पंतप्रधान कोण होणार हे ठरत असताना देखील १५ पैकी १२ प्रादेशिक काँग्रेस कार्यकारिणींचा ठाम पाठिंबा पटेल ह्यांना असून देखील गांधींनी आपले वजन वापरून पटेल ह्यांना माघार घ्यायला लावली होती. गांधींवर पटेलांची इतकी भक्ती होती की त्यांनी काहीही कुणकुण न करता गांधींच्या हट्टापुढे मान तुकवली होती. पण १९४९ मध्ये गांधी जिवंत नव्हते आणि पटेल कर्करोगाने आजारी होते.
नेहरूंची इच्छा होती की राजेंद्रप्रसादबाबूंनी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घ्यावी, पण तसे त्यांना स्पष्ट सांगण्याइतके नैतिक धैर्य नेहरूंच्याजवळ नव्हते. नेहरूंनी शेवटी पटेल ह्यांच्या खांद्यावरून शरसंधान केले. सप्टेंबर १०, १९४९ला राजेंद्रबाबूंना नेहरूंनी एक पत्र लिहिले ज्यात त्यांनी राजेंद्रबाबूंना चक्क खोटे सांगितले की पटेलांशी त्यांचे राष्ट्रपतिपदावरून बोलणे झाले आणि तेव्हा सरदार पटेल आणि नेहरू दोघांचेही असे मत पडले की राजाजी भारताचे पहिले राष्ट्रपती झाले तर ते देशासाठी उत्तम असेल. साहजिकच बाबू राजेंद्र प्रसाद ह्या पत्रामुळे खूपच दुखावले गेले. नेहरूंशी राजेंद्र प्रसादांचे मतभेद असले तरी सरदार पटेल आणि राजेंद्र प्रसाद ह्यांचे संबंध उत्तम मैत्रीचे होते. राजेंद्रबाबूंनी नेहरूंना उत्तर लिहिले की 'तुमच्या पत्रामुळे माझ्या संपूर्ण कारकिर्दीचा अपमान झाल्यासारखे मला वाटले'. ह्या पत्राची एक प्रत बाबूजींनी सरदार पटेलांनाही पाठवली व नेहरूंना तसे सांगितले. आता नेहरूंची थाप उघडकीला आली होती. नेहरूंनी लगोलग त्याच दिवशी बाबूजींची क्षमायाचना करणारे पत्र लिहिले ज्यात त्यांनी स्पष्ट कबूल केले की 'सरदारांना ह्यातले काहीही माहिती नाही आणि ही कल्पना केवळ नेहरूंचीच होती'. त्यानंतर पटेलांनीही त्यांच्या अंगच्या उपजत औदार्यामुळे नेहरूंच्या खोटारडेपणावर पांघरूण घालणारे पत्र राजेंद्र प्रसादांना लिहिले ज्यात त्यांनी लिहिलेय की 'जवाहर सध्या कामात आकंठ बुडालेला आहे त्यामुळे कदाचित त्याच्या हातून असे घडले असेल'. राजेंद्र प्रसादांनीही मोठ्या मनाने नेहरूंना माफ केले. पण नेहरूंनी मात्र आपला खोटारडेपणा उघडकीला आणल्याबद्दल कधीच राजेंद्र प्रसादांनाही माफ केले नाही आणि सरदार पटेलांनाही.
पुढे सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी सरदार पटेलांनी पुढाकार घेतला. नेहरूंनी त्याला कडाडून विरोध केला. दुर्दैवाने तो संकल्प पूर्णत्वाला जाण्याआधीच सरदार पटेलांचा मृत्यू झाला. नेहरू इतक्या कोत्या मनाचे होते की त्यांनी वटहुकूम काढून जाहीर केले की ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि मंत्र्यांना सरदार पटेलांच्या अंत्यसंस्काराला जायचे असेल त्यांनी बिनपगारी रजा घेऊन स्वखर्चाने जावे. पटेल भारताचे गृहमंत्री होते म्हणून नेहरूंना त्यांच्या अंत्ययात्रेला जाणं भागच होतं पण सुरक्षेचे कारण सांगून त्यांनी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद ह्यांना पटेल ह्यांच्या अंत्यसंस्काराला न जाण्याचा सल्ला दिला होता. अर्थातच राजेंद्र प्रसादांनी तो सल्ला मानला नाही असे नेहरूंच्याच मंत्री मंडळातले त्यांचे सहकारी के एम मुन्शी ह्यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. इतकेच नाही तर पटेलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या कन्या मणिबेन पटेल काँग्रेस पक्षाची वर्गणी ३५ लाख रुपये असलेली एक पिशवी आणि हिशेबाची खतावणी नेहरूंना द्यायला त्यांच्या कार्यालयात गेल्या तेव्हा नेहरूंनी त्यांची साधी विचारपूस देखील केली नाही. फक्त पैसे ठेवून घेतले. ही आठवण अमूल दूध चळवळीचे प्रणेते व्हर्गीज कुरियन ह्यांनी आपल्या 'आय टू हॅड अ ड्रीम' ह्या नावाच्या आत्मचरित्रात लिहिलेली आहे.
राजेंद्र प्रसाद आणि नेहरू ह्यांच्यामधले संबंध पुढे चिघळतच गेले. सरदार पटेलांचे सोमनाथच्या मंदिराच्या मंदिराच्या पुनर्बांधणीचे स्वप्न के एम मुन्शी ह्यांनी पुढे नेले. ह्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला मुन्शीनी राष्ट्रपतींना आमंत्रण दिलं. राष्ट्रपतींनी आनंदाने आमंत्रण स्वीकारलं. पण नेहरूंनी राजेंद्र प्रसादांना कडाडून विरोध केला, आणि त्यांनी सोमनाथला जाऊ नये असा स्पष्ट सल्ला दिला. नेहरूंची ती सल्लावजा आज्ञा धुडकावून लावत बाबू राजेंद्र प्रसाद सोमनाथला गेले. ह्या प्रसंगाची डूख धरून नेहरू पुढे राजेंद्र प्रसाद गेल्यानंतर पाटणा येथे झालेल्या त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले नाहीत आणि तत्कालीन राष्ट्रपती राधाकृष्णन ह्यांना त्यांनीही अंत्यसंस्काराला जाऊ नये असा सल्ला नेहरूंनी दिला असे कन्हय्यालाल मुन्शीनी आपल्या पुस्तकात स्पष्ट नमूद केले आहे.
नेहरू अत्यंत असुरक्षित व्यक्तित्वाचे आणि कोत्या मनाचे नेते होते ह्याची कितीतरी उदाहरणे आपल्याला सापडतात. आपल्याहून हुशार किंवा कर्तृत्ववान व्यक्तींशी त्यांचे कधीच पटले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या मंत्रिमंडळात कायदामंत्री होते पण नेहरूंनी सदैव त्यांची उपेक्षाच केली. शेवटी नेहरूंच्या असहकाराला आणि हिंदू कोड बिल पास करण्याच्या मुद्द्यावरच्या त्यांच्या चालढकलीला कंटाळून आंबेडकरांनी १९५१ मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याच्या भाषणात त्यांनी नेहरूंच्या कार्यप्रणालीवर शेलके ताशेरे ओढले आहेत. आपल्या भाषणात डॉ. आंबेडकर म्हणतात, 'कायदा मंत्रालय तसे बिनमहत्वाचे मंत्रालय आहे. आम्ही त्याला रिकामी साबणाची पेटी म्हणतो. मला पंतप्रधानांनी दुसरा एखादं महत्वाचं खातं द्यायचं कबूल केलं होतं पण चार वर्षे झाली, इतर अनेक मंत्र्यांना दोन-दोन, तीन-तीन खात्यांचा कार्यभार दिला गेला पण मला मात्र दुसऱ्या खात्याचा कार्यभार कधीच मिळाला नाही, अगदी एखाद्या खात्याचा मंत्री कुठे गेलेला असला तरी त्याचा कार्यभार मला तात्पुरताही कधी दिला गेला नाही.... मंत्रीमंडळाचा विस्तार करताना पंतप्रधान नक्की कुठले निकष वापरतात, कार्यक्षमता, मैत्री, विश्वास की होयबागिरी हे मला अजून कळलेले नाही.'
अर्थात भर सभागृहात आपले असे वाभाडे काढलेले नेहरू कधीच विसरू शकले नाहीत. त्यानंतर लगेचच १९५२ मध्ये सार्वत्रिक निवडणूका होत्या. आंबेडकर आपल्या शेड्युल कास्ट फेडरेशन ह्या पक्षातर्फे मुंबईत राखीव मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले. त्यांना हरवायचेच हा चंग बांधून नेहरूंच्या काँग्रेस पक्षाने आंबेडकरांचेच एकेकाळचे सहकारी, नारायण काजरोलकर ह्यांना उमेदवारी दिली. काजरोलकर ह्यांच्या प्रचारासाठी स्वतः नेहरूनी मुंबईत प्रचारसभा घेतल्या. काँग्रेस पक्षाची पूर्ण यंत्रणा कामाला लावली आणि आंबेडकर निवडणूक हरले. इतक्या हलक्या मनाचे होते नेहरू. त्यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळूनच त्यांच्या मंत्रिमंडळातल्या शामाप्रसाद मुखर्जींनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भारतीय जनसंघाची स्थापना केली. आपली हयात काँग्रेस पक्षासाठी झिजवलेले आचार्य कृपलानी ह्यांनी काँग्रेस पक्षातून फुटून स्वतःचा किसान मजदूर पक्ष स्थापन केला. लोहिया आणि जयप्रकाश समाजवादाच्या दिशेला लागले.
नेहरूंना आपल्या कारभारावर कुणी टीका केलेली सहन होत नसे. इतके असूनही हाती असलेल्या सत्तेच्या जोरावर काँग्रेस पक्षाने इतकी वर्षे नेहरूंच्या मूळ असुरक्षित आणि कोत्या मनोवृत्तीवर उदारमतवादाचा गोंडस मुखवटा चिटकावयचा यशस्वी प्रयत्न केला, पण आता तरी लोकांना सत्य कळेलच पाहिजे की नेहरू खरे कसे होते.