मोदी-करूणानिधी भेटीमागचा अन्वयार्थ

Total Views |


 

राजकारणातील प्रवाह भल्याभल्यांना चटकन समजत नाहीत. आज तर दक्षिण भारतातील तामिळनाडू या राज्यातील राजकारण इतकी विचित्र आणि अनाकलनीय वळणं घेत आहे की विचारता सोय नाही. सोमवार दि. ६ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा चेन्नईत होते, तेव्हा त्यांनी अचानक द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती व नरेंद्र मोदी वयोवृद्ध करुणानिधींच्या प्रकृतीची चौकशी करायला गेले होते, असे जरी सांगण्यात येत असले तरी यात काही तथ्य नाही. अशा भेटीत सहसा राजकीय चर्चा होत असते.


तसे पाहिले तर गेली अनेक दशके तामिळनाडूचे राजकारण एक प्रकारे स्थिर होते. तेथे एक तर द्रमुक सत्तेत असे किंवा अण्णाद्रमुक सत्तेत असे. यात डिसेंबर २०१६ पर्यंत काही बदल होण्याचे कारणच नव्हते. मात्र, जयललितांचे निधन झाले आणि तामिळनाडूचे राजकारण ढवळून निघाले. अजूनही तेथे काय होईल हे सांगता येत नाही. तामिळनाडूच्या राजकारणावर सिनेसृष्टीतील तार्‍यांचा प्रभाव असतो. यातील काही तारे तर प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय असतात. अण्णा दुराई, एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी, जयललिता वगैरे सर्व महत्त्वाचे नेते सिनेसृष्टीशी या ना त्या नात्याने संबंधित होते. आता तेथील आजचा सुपरस्टार रजनीकांतसुद्धा राजकारणात येईल, अशी जोरदार चर्चा आहे. हे कमी की काय म्हणून दुसरा सुपरस्टार कमल हसनसुद्धा राजकारणात उतरत आहे. या सर्व उलथापालथींच्या संदर्भात पंतप्रधान मोदी व करुणानिधी यांच्या भेटीकडे बघितले पाहिजे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रादेशिक पक्षांचे जोरदार राजकारण तामिळनाडूत द्रमुक पक्षाने केले. तेथे १९६७ सालापासून एक तर द्रमुक किंवा अण्णाद्रमुक हे प्रादेशिक पक्ष सत्तेत आहेत. त्यामुळे या राज्यात ना कॉंग्रेसला ना भाजपला पाय रोवता आले. द्रमुक किंवा अण्णाद्रमुक यांनी प्रादेशिक राजकारणाचे वेगळेच प्रारूप रूढ केलेले आहे. ते प्रारूप म्हणजे राज्यात द्रमुक किंवा अण्णाद्रमुक सत्तेत असतो व हा पक्ष केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाला/ आघाडीला पाठिंबा देतो. द्रमुकने अनेक वेळा केंद्रात सत्तेत असलेल्या कॉंगे्रसला पाठिंबा दिला होता. एवढेच नव्हे तर जेव्हा कॉंगे्रसने ’संयुक्त पुरोगामी आघाडी’ स्थापन केली, तेव्हासुद्धा द्रमुक या आघाडीचा घटक पक्ष होता. तसेच जयललितांचा अण्णाद्रमुक वाजपेयी सरकारमध्ये घटक पक्ष होता.


आता तामिळनाडूतील राजकारण विचित्र वळणावर उभे आहे. मंगळवार दि. ७ नोव्हेंबरला आलेल्या बातमीनुसार कमल हसनच्या राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत. अभिनेता दिग्दर्शक-लेखक-पटकथाकार वगैरे अनेक भूमिकांतून चाहतावर्ग निर्माण केलेल्या हसनने आपण लवकरच राजकीय पक्ष स्थापन करू, असे जाहीर केले आहे. कमल हसनने आजपर्यंत केलेल्या घोषणांवरून त्याचा पक्ष निधर्मी विचारधारा प्रमाण मानणारा असेल, असे मानावयास जागा आहे. याचाच अर्थ असा की, हसनचा पक्ष भाजपच्या विरोधात उभा ठाकू शकतो.


आज मात्र तामिळनाडूत विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांचे मागच्या वर्षी निधन झाले. असे नेते सहसा आपला उत्तराधिकारी तयार करत नाही. परिणामी, जयललितांच्या पक्षात फूट पडली व यथावकाश पक्ष फुटला. आज तर अशी परिस्थिती आहे की, अण्णाद्रमुकबरोबर चर्चा जर करायची असेल तर कोणाशी करायची हेच समजत नाही. तेथे कालपरवापर्यंत तीन गट होते. त्यातील दोन गटांनी समझोता करून सत्ता ताब्यात ठेवली आहे. पण, तिसर्‍या म्हणजे शशिकला यांना मानणार्‍या गटाकडे १८ आमदार आहेत. पण, तेथील राज्य सरकारने या १८ आमदारांना बडतर्फ करून सरकार तगवले आहे.


दुसरीकडे करुणानिधींचे वय आज (जन्मः १९२४) ९३ आहे. ते आता सक्रिय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावू शकणार नाही. त्यांच्या पक्षातही सर्व आलबेल आहे, असे नाही. त्यांचे दोन सुपुत्र स्टालिन व अलगेरी यांच्यातून विस्तव जात नाही. करुणानिधींनी जरी स्टालिन यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित केलेले असले तरी त्यांच्या नेतृत्वक्षमतेबद्दल अजून प्रश्नचिन्ह आहे.


अशा स्थितीत मोदी व करुणानिधी यांच्या भेटीकडे बघितले पाहिजे. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजप तामिळनाडूत शिरकाव करण्यास उत्सुक आहे. द्रमुक व अण्णाद्रमुक या दोन पर्यायांचा विचार केला, तर भाजपला आज द्रमुकशी संवाद साधण्यात रस आहे. भाजप ज्या राज्यांत स्वबळावर सत्ता मिळवू शकत नाही, तेथे तो स्थानिक पक्षांशी युती करून सत्तेत येतो. याचे उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील शिवसेनेबरोबरच्या आघाडीचा उल्लेख करावा लागेल. १९८९ साली भाजप व शिवसेना यांची युती झाली. ही युती जेव्हा १९९६ साली प्रथमच महाराष्ट्रात सत्तेत आली, तेव्हा यात भाजप कनिष्ठ भागीदार होता. ऑक्टोबर २०१४ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपने शिवसेनेपेक्षा जवळपास दुप्पट जागा जिंकल्या व आज महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री आहे. अर्थात, या रणनीतीबद्दल भाजपला दोष देण्यात अर्थ नाही. कारण, प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःची ताकद वाढविण्याचे सतत प्रयत्न करत असतो, जे राजकारणात दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी अपरिहार्य आहे.


यापेक्षा थोडा वेगळा समझोता इंदिरा गांधींनी द्रमुकबद्दल १९६७ च्या निवडणुकांनंतर केला होता. द्रमुक कॉंगे्रसला केंद्रात पाठिंबा देईल व त्या बदल्यात कॉंगे्रस द्रमुकला तामिळनाडूतील सत्ता उपभोगू देईल. तो काळ वेगळा होता व आजचा काळ वेगळा आहे. आज कोणताही राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षाला वाढू देण्याच्या स्थितीत नाही. म्हणूनच मोदींनी वेळात वेळ काढून करुणानिधींची सदिच्छा भेट घेतली. या भेटीचे निमित्त साधून द्रमुकने राज्यात नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पुकारलेले राज्यव्यापी आंदोलन स्थगित केले. यातील संकेत स्पष्ट आहेत. भाजपने अण्णाद्रमुकबरोबर मैत्री करून वाढण्याचे प्रयत्न केले, पण यात फारसे यश मिळाले नाही. म्हणून आता भाजप द्रमुककडे मैत्रीचा हात करत आहे.


आज अण्णाद्रमुक जरी तामिळनाडूत सत्तेत असला तरी या पक्षाचे भविष्य तितकेसे चांगले नाही. त्यापेक्षा द्रमुककडे चांगले नेतृत्व तर आहेच, शिवाय कार्यकर्त्यांचे जाळे आहे. आजच्या राजकीय परिस्थितीत भाजप व द्रमुक या दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे. भाजपला तामिळनाडूतील ३९ लोकसभेच्या जागांचा मोह आहे, तर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना गाजलेल्या ’२ जी’ घोटाळ्याचा निकाल लवकरच लागणार आहे. यात द्रमुकचे ए. राजा व करुणानिधींची कन्या कनिमोळी आरोपी आहेत. भाजपच्या व्यापक व्यूहात दक्षिण भारताला व खासकरून तामिळनाडूबद्दल भाजपला अपेक्षा आहेत. तेथे जरी ब्राह्मणेतर समाज मोठ्या प्रमाणात असला तरी ब्राह्मण समाजही बरीच ताकद बाळगून आहे. उत्तर प्रदेशात जसा ब्राह्मणवर्ग हा महत्त्वाचा सामाजिक घटक ठरतो, तसेच जवळपास तामिळनाडूत आहे. १९५०च्या दशकात कामराज नाडर यांचा उदय होईपर्यंत त्या राज्यांतील राजकारणात ब्राह्मणवर्गाचा वरचष्मा होता. त्यानंतर जरी राजकीय सत्तेच्या जागा हातातून गेल्या असल्या तरी ब्राह्मणांनी सत्तेच्या इतर जागांवरील पकड कमी होऊ दिली नाही. एकविसाव्या शतकाच्या या टप्प्यावर तामिळनाडूत कोणत्या समाजघटकाकडे सत्तेची सूत्रं जातील याबद्दल भाकीत करणे अवघड आहे.

-प्रा. अविनाश कोल्हे

 

प्रा. अविनाश कोल्हे

 
 एम.ए., एल.एल.बी केले असून गेली दोन दशकं मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयात राज्यशास्त्र विषय शिकवत आहेत. गेली अनेक वर्षे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयांवर विविध वृत्तपत्रांतून स्तंभलेखन. शिवाय त्यांनी मुंबईतील अमराठी रंगभूमीवर सादर होत असलेल्या नाटकांची परिक्षणं केलेली आहेत. ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांच्या निवडक परिक्षणांचे पुस्तक ’रंगदेवतेचे आंग्लरूप - मुंबईतील अमराठी रंगभूमी’ प्रकाशित झाले आहे. ते ’चीनमधील मुस्लीम समाजातील फुटीरतेची भावना’ या विषयांवर पी.एचडी. करत आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121