पराभवाची चटक

    13-Nov-2017   
Total Views | 1
 


तसे बघायला गेल्यास दोन राज्यांच्या विधानसभा निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यापैकी हिमाचल प्रदेशचे मतदान उरकलेही आहे. पण माध्यमांना तिकडे बघायलाही सवड झालेली नाही. जणू काही प्रत्येकाने तिथे भाजपाचा विजय गृहीत धरलेला आहे. त्यामुळे असेल, कुठूनही मोर्चा गुजरातकडे वळवला जात असतो. त्याचा अर्थच असा आहे, की गुजरातमध्ये मोदींना मात दिली, तर २०१९ च्या लोकसभेत मोदी अवतार आटोपणार; याची प्रत्येकाला खात्री पटलेली आहे. म्हणून तर राहुल गांधींपासून कुठल्याही सेक्युलर पत्रकाराला गुजरातचे व्यापारी, पाटिदार वा अन्य कुठलेही समाजसमुह कसे नाराज आहेत, त्याची स्वप्ने पडत आहेत. हे सर्व समुह मिळून मोदींचा गुजरातमध्ये बोर्‍या वाजवणार, अशी खात्रीच आहे. सवाल फक्त तसे मतदान व्हायचा असून, त्याविषयी कुठलीच मतचाचणी हमी देत नाही, इतकाच आहे. कारण सतत भडीमार चालू आहे आणि त्यासाठीच चाचण्या घेऊन आकडे काढले जात आहेत. त्यात मग कोण कोण मोदी व भाजपावर नाराज आहेत, त्याचे हवालेही दिले जात आहेत. पण जेव्हा मतांची आकडेवारी वा टक्केवारी सादर केली जाते, तेव्हा त्यात भाजपा पराभूत होणारे कुठलेही समीकरण समोर येत नाही. त्यामुळे इतके खुळचट युक्तीवाद केले जात आहेत, की त्याचा प्रतिवादही तर्कट रितीने करणे भाग आहे. गेल्या आठवड्यातली एक गुजरातविषयक चर्चा ऐकली. त्यात एक दिल्लीकर महान पत्रकार भाजपा प्रवक्त्याला विचारत होते, गुजरात बालेकिल्ला असेल, तर तिथे मोदींना इतक्या सभा कशाला घ्याव्या लागत आहेत? याचा अर्थ पाकिस्तान वा अन्य कुठल्या संघाने भारताला प्रश्र्न विचारावा, की तुम्ही विश्र्वविजेते वा अजिंक्य आहात, तर विराट कोहली वा धोनी, रोहित शर्माला कशाला फलंदाजी करावी लागते आहे? मग काय, या भारतीय फलंदाज गोलंदाजांनी कॉमेन्ट्री बॉक्समध्ये बसून सामना जिंकायचा असतो?
 
गुजरात हा भाजपा वा मोदींचा बालेकिल्ला असेल, तर तिथे भाजपाने कसे लढावे व किती प्रचार करावा, हे विरोधकांनी ठरवायचे असते, असा हा नवा युक्तीवाद आहे. यापैकी कितीजणांना राजकारणाचा खरा अभ्यास आहे आणि कितीजणांना जगण्यातली स्पर्धा कळू शकते, याचीच शंका येते. कारण कुठल्याही स्पर्धेत सहभागी होणारा खेळाडू आपली सर्व शक्ती पणाला लावून उतरत असतो. मग समोर कितीही नवखा वा दुबळा प्रतिस्पर्धी का असेना? मागल्या विधानसभा निवडणूकीत मोदींनी गुजरात राज्यात किती व कसा प्रचार केला होता, त्याचे तरी अशा शहाण्यांना स्मरण आहे काय? मोदी हा आजोबा-पणजोबा यांचा वारसा व पुण्याई घेऊन राजकारणात आलेला कोणी राजपुत्र नाही. त्याला तळागाळातून झगडत इथवर यावे लागलेले आहे. त्यामुळेच अखंड मेहनत, हीच त्याची पुण्याई आहे. कुठल्याही शर्यतीत उतरले, मग क्षणाचीही उसंत घ्यायची नाही, हे त्याचे युद्धतंत्र आहे. मध्येच उठून आजीला भेटायला इटलीला जायचे किंवा विश्रांतीसाठी युरोपच्या दौर्‍यावर जायची श्रीमंती, मोदींना अजून लाभलेली नाही. मागल्या विधानसभेत त्यांना निर्णायक मतांनी विजय संपादन करायचा होता, तर मोदींनी तब्बल महिनाभर सलग राज्यव्यापी सद्भावना यात्रा काढलेली होती. त्यात त्यांनी किती सभांमध्ये भाषणे केली होती, त्याचा हिशेब कोणी ठेवला आहे काय? ज्यांना तेच ठाऊक नाही, त्यांना विधानसभेसाठी मोदी राज्यात ६०-७० सभा कशाला घेणार, हे कसे समजावे? पक्षाला मते देतानाही आपल्यालाच मते मिळवता येतील, याची खात्री असल्यानेच त्यांना तसे करणे भाग आहे. मग लागतील तितक्या सभांतून बोलण्याला पर्याय कुठे उरतो? ज्याला गुजरातबाहेर कोणी विचारत नाही, असे दावे केले जात होते, तोच आता गुजरातमध्ये कशाला प्रचार करतोय, असे प्रश्र्न विचारणार्‍यांची म्हणूनच कीव कराविशी वाटते.
 
अमेठी-रायबरेली हे बालेकिल्ले असतानाही तिथे प्रियंका गांधी निवडणूक काळात कशाला ठाण मांडून बसतात? असा प्रश्र्न यापैकी एका तरी शहाण्याने गांधी कुटुंबाला विचारण्याची अक्कल दाखवली आहे काय? पिढ्यानुपिढ्या तिथे याच खानदानाचे लोक कुठल्याही परिस्थितीत निवडून येत आहेत. मग अजूनही तिथे मतदानाच्या आधी घरातल्या कोणाला तरी साडी नेसून प्रदर्शन कशाला करावे लागते? कारण तीच कसोटीची वेळ असते आणि बालेकिल्ला असाच लढवला जात असतो. बालेकिल्ला गमावला तर सर्व काही गेले, हेच युद्धातले समीकरण असते. म्हणूनच पंतप्रधान आपल्या बालेकिल्ल्यात अधिकची मेहनत घेत असतील, तर त्याला रणनिती म्हणतात. पण असले काही समजण्यासाठी बुद्धी शाबुत असली पाहिजे. आणखी एक नवा युक्तीवाद गुरूवारी एका वाहिनीवर ऐकला. गुजरातमध्ये भाजपाने आपल्या असलेल्या जागा टिकवल्या तरी त्याला मोदींचा नैतिक पराभवच म्हणावा लागेल. काय अक्कल आहे बघा. एका बाजूला म्हणायचे, की तब्बल २२ वर्षे भाजपाची सत्ता असल्यामुळे लोक त्या पक्षाला वैतागलेले आहेत. मग वैतागलेले लोक त्या पक्षाला सत्ताभ्रष्ट कशाला करत नाहीत? तसे मतदार करीत नाही, हा आव्हानवीराचा नैतिक पराभव आहे. म्हणजेच पुन्हा एकदा कॉंग्रेस तिथे पराभूतच होणार असेल, तर तो नुसता मतदानातला पराभव नाही, तर नैतिक दिवाळखोरीचेही प्रमाणपत्र आहे. पण यातले तारतम्य नसेल तर मग विजयातही विजेत्याचा नैतिक पराभव दिसू लागतो. २००२ साली सोनियांनी मोदींची ‘मौत का सौदागर’ अशी संभावना केलेली होती. तिथून लागोपाठ तीनदा त्यांचा पराभव करून मोदींनी निवडणूका जिंकलेल्या आहेत. मग त्या प्रत्येक विजयात त्यांचा नैतिक पराभवच झालेला असणार ना? आणि पर्यायाने सोनियांसह कॉंग्रेसचा नैतिक विजयच झालेला असणार ना?
 
थोडक्यात आता एक नवे राजकीय समीकरण निर्माण झालेले आहे. राजकीय पराभवाला विजय दाखवण्यासाठी हा नवा नैतिक निकष शोधून काढण्यात आलेला आहे. लागोपाठ दोन-तीनदा वेस्ट इंडीज वा ऑस्ट्रेलियाने क्रिकेटचा विश्र्वचषक जिंकला होता. तो त्यांचा नैतिक पराभवच असणार ना? असल्या शाब्दिक कसरतींनी वास्तविकता बदलत नसते. इथे भाजपाच्या लागोपाठच्या विजयाचा प्रश्र्नच येत नाही. कॉंग्रेसच्या सलग पराभवाचा मुद्दा चर्चिला जाणे अगत्याचे आहे. त्याचे कारण गुजरातच्या भाजपाविरोधी मतदाराला पर्याय उपलब्ध करून देण्यात कॉंग्रेस अपेशी ठरलेली आहे. वारंवार सोनिया व राहुल यांनी अपेशी ठरूनही तिथे अन्य कुणा नेत्याला कॉंग्रेसचे पुनरुज्जीवन करण्याचा मार्ग खुला करून दिला जात नाही, ही बाब अनैतिक आहे. तिथे तिसरा पक्ष पाय रोवून उभा राहिला, तर भाजपाचा पराभव होईलच असे नाही. पण उरलेसुरले कॉंग्रेसचे अस्तित्व नामशेष होऊन जाईल. तसा कुठला पर्याय पाव शतकात उभा राहिलेला नाही, हे गुजरातच्या व अन्य काही राज्यातल्या मतदाराचे घोर दुर्दैव आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश अशीच दुर्दैवी राज्ये आहेत. कर्नाटकात देवेगौडांनी जनता दलाला घरगुती मालमत्ता बनवून तसा तिसरा पर्याय उभा राहण्याची शक्यता मारून टाकलेली आहे. आम्हीच अजिंक्य आहोत, असा दावा भाजपाने वा मोदींनी कधीच केलेला नाही. पण कॉंग्रेस आणि भाजपा यांच्या तुलनेत सुसह्य अशी भाजपाची प्रतिमा आहे. त्यात अनैतिकता कुठली असेल तर भुजंगाप्रमाणे त्या पर्यायाच्या तिजोरीवर दबा धरून बसलेल्या गांधी वारसांची मक्तेदारी ही अडचण आहे. म्हणूनच गुजरातमध्ये पुन्हा सहज भाजपा जिंकला, तर तो त्या पक्षाच्या विजयापेक्षाही गांधी खानदानाच्या आश्रितांना नाकारण्याचा जनतेने दिलेला कौल असेल. कारण निवडणूका युक्तीवादाने जिंकता येत नाहीत. पराभवाची चटक लागलेल्यांना विजयाची मेहनत नकोशी वाटणे स्वाभाविक आहे.

- भाऊ तोरसेकर

भाऊ तोरसेकर

लेखक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121