मंदिर शिल्पांच्या शोधात मी भारतभर फिरले आहे. अगदी गुप्तकाळच्या साध्या, तुलनेने अनलंकृत शिल्पांपासून ते पुढे चोल, चंदेल, होयसळ काळातल्या अत्यंत बारीक कोरीव कामाने सजलेल्या मूर्तींपासूनची भारतीय शिल्पकलेतील स्थित्यंतरे मुळातूनच समजून घेण्यासारखी आहेत. त्यातही काही देवतांची शिल्पे सुरवातीला दिसतात पण पुढेपुढे त्यांचं अंकन कमी होतं तर काही देवतांची शिल्पे गुप्तकाळात फारशी आढळून येत नाहीत पण पुढे त्यांचे शिल्पांकन फार मोठ्या प्रमाणात कसे होते हा कलाप्रवास बघणे अत्यंत उद्बोधक आहे. गुप्तकाळात अत्यंत लोकप्रिय असलेल्या श्रीविष्णूच्या वराहावताराचे शिल्पांकन पुढे पुढे कमी होत गेले आणि श्रीविष्णूच्याच नृसिंहावताराचे प्रस्थ वाढत गेले, विशेषतः दक्षिण भारतात. चालुक्य, चोल, होयसळ ह्या सर्व राजवंशानी बांधवून घेतलेल्या मंदिरांमधून श्रीनृसिंहाच्या मूर्तींचे अंकन मोठ्या प्रमाणावर दिसते. होयसळ राजवंशाचे तर श्रीनृसिंह हे कुलदैवतच होते त्यामुळे होयसळ काळात बांधलेल्या शिवमंदिरांच्या बाहेरही आपल्याला श्रीनृसिंहाच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात.
होयसळ राजवंश हा कर्नाटक राज्यातील एक प्रसिद्ध राजवंश. तुंगभद्रा आणि कावेरी ह्या दोन नद्यांमधल्या सुपीक भूप्रदेशात इसवीसनाच्या अकराव्या ते चौदाव्या शतका दरम्यान या वंशाची सत्ता होती. होयसळ राजे नुसते रसिकच नव्हे तर उदारही होते. नृत्य, संगीत, स्थापत्य आणि साहित्य ह्या अभिजात कलाप्रकारांना त्यांनी उदार हस्ते आश्रय दिला. होयसळांच्या उण्यापुऱ्या ४०० वर्षांच्या कारकिर्दीत जवळजवळ दीड हजार मंदिरांचे निर्माण केल्याचे उल्लेख आहेत. पण अल्लाउद्दीन खिलजीच्या गुलाम मलिक कफूरच्या स्वारीत खूप होयसळ मंदिरांचा विध्वंस करण्यात आला. आता जेमतेम १०० होयसळ मंदिरे अस्तित्वात आहेत. पण जे आहे त्यावरचे शिल्पकाम देखील इतके लखलखीत सोन्यासारखे आहे की जे गेले ते किती मौल्यवान होते ह्याची कल्पनाच करता येते. ११०८ मध्ये गादीवर आलेला बिट्टीदेव विष्णूवर्धन हा ह्या होयसळ वंशातला सर्वात कर्तबगार राजा. त्याच्याच कारकिर्दीत त्याची राजधानी द्वारसमुद्रम येथे होयसळेश्वर आणि शांतलेश्वर ह्या जुळ्या शिवमंदिराची उभारणी करण्यात आली. आज द्वारसमुद्रम हे एकेकाळचे वैभवाच्या शिखरावर असलेले शहर मलिक काफूरच्या कृपेमुळे 'हळेबिडू' म्हणजे 'उध्वस्त गांव' म्हणून ओळखले जाते. काळाचा महिमा, दुसरे काय?
आगमग्रंथांनुसार नरसिंहाच्या मूर्तीचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. खांबातून बाहेर येणारी ती स्थौण नृसिंहमूर्ती, मांडीवर आडवा टाकलेल्या हिरण्यकश्यपूचं पोट फाडणारी ती उग्र नृसिंह मूर्ती, गरुडावर आरूढ असलेली ती यानक नृसिंहमूर्ती, हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर क्रोध शांत करण्यासाठी म्हणून गुढघ्यांवर योगपट्ट बांधून ध्यानाला बसलेली ती शांत मुद्रेची योगनृसिंहमूर्ती आणि लक्ष्मीसमवेत दाखवलेली ती लक्ष्मीनृसिंहमूर्ती. आपण आज बघणार आहोत ही उग्र नृसिंहमूर्ती हळेबिडू इथल्या शांतलेश्वराच्या मंदिराबाहेर कोरलेली आहे.
नृसिंहावतारामागची कथा अशी. वराहावतारात येऊन श्रीविष्णुंनी हिरण्याक्ष दैत्याचा वध केला त्यामुळे संतापलेल्या त्याच्या मोठ्या भावाने म्हणजे हिरण्यकश्यपूने कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व त्याच्याकडे अमरत्व मागितले. जो जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित आहे असे सांगून ब्रह्मदेवाने नकार दिला तेव्हा हिरण्यकश्यपूने हुशारीने असा वर मागितला की त्याला न दिवसा न रात्री, न भूमीवर न आकाशात, न शस्त्राने न अस्त्राने असा मृत्यू यावा तोही न प्राणी न मनुष्य, ना देव ना दानव अश्या व्यक्तीच्या हातून. हे वरदान मिळाल्यावर हिरण्यकश्यपूने उन्मत्त होऊन पृथ्वीवरच्या समस्त जीवसृष्टीला जेरीला आणले. देवांनाही त्याने त्रस्त केले तेव्हा सर्व देव श्रीविष्णूकडे गेले. श्रीविष्णुंनी त्यांना सांगितले की जेव्हा हिरण्यकश्यपू आपल्या प्रह्लाद ह्या मुलाचा छळ करायला लागेल तेव्हा श्रीविष्णू त्याचा वध करतील.
प्रह्लाद हा हिरण्यकश्यपूचा मुलगा विष्णूभक्त होता म्हणून हिरण्यकश्यपूने त्याचा खूप छळ केला पण तो काही बधेना. तो विष्णूचे नामस्मरण करतच राहिला तेव्हा चिडून त्याला हिरण्यकश्यपूने विचारले की 'ज्या नारायणाचे तू नाव घेतोस, तो आहे तरी कुठे?' प्रह्लादाने सांगितले की विष्णू सर्वत्र आहे. तेव्हा 'ह्या खांबात आहे का तुझा विष्णू?' असा प्रश्न विचारत हिरण्यकश्यपूने शेजारच्या खांबावर गदेने प्रहार केला. त्याबरोबर तो खांब दुभंगला आणि त्यातून न प्राणी न मनुष्य, ना देव ना दानव अश्या रौद्र नृसिंहअवतारात श्रीविष्णू प्रकट झाले आणि त्यांनी न दिवसा न रात्री अश्या संधिकाली, न भूमीवर न आकाशात अश्या आपल्या मांडीवर हिरण्यकश्यपूला अधांतरी पाडून न शस्त्राने न अस्त्राने अश्या आपल्या नखांनी त्याचे पोट फाडून हिरण्यकश्यपूचा वध केला.
ह्या उग्रनृसिंहाच्या शिल्पात देवाच्या चेहेऱ्यावरचा रौद्र भाव स्पष्ट दिसतोय. नृसिंह दशभुज आहेत. चार हातात शंख, चक्र, गदा, पदम ही श्रीविष्णूंची लक्षणे धरलेली आहेत. मांडीवर आडवा पडलेल्या हिरण्यकश्यपूचा एक पाय जमिनीवर असहाय्यपणे घासतोय तर दुसरा पाय श्रीनृसिंहानी आपल्या एका हाताने पकडून ठेवलाय. हिरण्यकश्यपूच्या देहबोलीतून त्याची भीती साकार करण्यात शिल्पकार पूर्णपणे यशस्वी झालाय. दोन हातांनी श्रीनृसिंह हिरण्यकश्यपूचे पोट फाडत आहेत तर इतर दोन हातानी त्यांनी हिरण्यकश्यपूचे मोठे आतडे बाहेर काढलेले आहे. त्या आतड्याच्या वळ्या देखील शिल्पकाराने स्पष्टपणे शिल्पांकित केल्या आहेत त्यावरून त्या काळच्या शिल्पकारांचा मानवी शरीराचा अभ्यास स्पष्टपणे दिसून येतो. नृसिंहांच्या अंगावरचे अलंकार अत्यंत नजाकतीने कोरले आहेत. मांडीवर आडवं पडलेल्या हिरण्यकश्यपूच्या गळ्यातले अलंकार ज्या पद्धतीने छातीवरून ओघळलेले दाखवलेले आहेत तेही मुळातून बघण्यासारखं आहे. ही एकच मूर्ती मी अर्धा तास बघत वेड्यासारखी तिथेच खिळून उभी होते. ज्या कुणा अनाम कलाकाराने दगडातून ही मूर्ती साकार केली त्याच्या अलौकिक कलेला माझा साष्टांग नमस्कार!
- शेफाली वैद्य