अखेर सीतारामन यांनी चीनी सैनिकांना 'नमस्ते' शिकवलेच..

    08-Oct-2017   
Total Views | 4



भारताला पहिल्यांदाच पूर्णवेळ महिला संरक्षणमंत्री मिळाल्यापासून निर्मला सीतारामन हे नाव चर्चेत आले. मात्र त्या केवळ त्यांच्या या पदामुळे किंवा त्यांच्या कामामुळेच चर्चेत नाहीत, तर त्यांच्या कार्यपद्धतीमुळे चर्चेत आहेत. भारत आणि चीन यांच्यात डोकलाम विषयावरुन वाद सुरु असताना, किंवा तणावाचे वातावरण असताना काल निर्मला सीतारामन यांनी नथुला येथे जावून भारत-चीन सीमेवर भेट दिली. यावेळी त्यांनी चीनी सैनिकांसोबत देखील संवाद साधला. मात्र या संवादाचे आकर्षण ठरला 'नमस्ते' हा शब्द.



जणून आश्चर्य वाटेल मात्र निर्मला सीतारामन यांनी चीनच्या सैनिकांना नमस्ते हा शब्द शिकवला, आणि केवळ शिकवलाच नाही तर त्यांना तो म्हणायलाही लावला. त्यांनी विचारले देखील 'तुम्हाला माहीत आहे नमस्ते म्हणजे काय?' यावेळी त्यांनी नमस्ते या शब्दाचा अर्थ चीनी सैनिकांना सांगितला. तसेच त्यांना देखील नमस्ते म्हणायला सांगितले.

भारतीय संस्कृतीत 'नमस्ते' किंवा 'नमस्कार' ही केवळ भेटताना अभिवादन करण्याची एक पद्धत नाहीये, तर ते संस्कार आहेत. दोन्ही हात जोडून अतिथी समोर हल्केच वाकून त्यांना नमस्ते म्हणणे हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. आपली संस्कृती आपली मूल्ये चीनी सैनिकांपर्यंत इतक्या सौम्य भाषेत पोहोचवण्याचे काम केवळ सीतारामनच करु शकल्या असत्या. 

यामागे कौतुक का? तर भारत-आणि चीन यांच्यात वाद सुरु असताना देखील सीमेवर जावून आपल्या संस्कृती विषयी चीनी सैनिकांना सांगणे, आपल्या संस्कृतीविषयी ठाम राहणे, आणि त्यांना देखील त्याचा एक भाग करुन घेणे हे कारण आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास खूप काही बोलून जातो.. त्यांच्या या 'नमस्ते' मधून "तुम्ही कितीही काहीही केले तरी भारत आपली भूमिका सोडणार नाही, भारत आपल्या संस्कृती विषयी आपल्या मूल्यांविषयी ठाम आहे, आणि त्यासोबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. असा संदेश जातो. तसेच त्यांना देखील नमस्ते म्हणायला सांगण्यातूनही भारताचा भारदस्तपणा सौम्य भाषेतून प्रतीत झाला.



त्या सीमेवर गेल्या असताना अनेक चीनी सैनिकांनी त्यांच्या फोटो काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सीतारामन यांनी कुठलीही वेगळी प्रतिक्रिया न देता, सौम्यपणे त्यांना अभिवादन केले. साध्या वाटणाऱ्या या त्यांच्या वागण्यातून एक खूप मोठा संदेश देण्यात आला आहे. यामुळे भारताला किती कतृत्ववान आणि समंजस संरक्षण मंत्री मिळाल्या आहेत, हे दिसून येते.

खरं तर ही बाब छोटी होती, मात्र त्यांच्या या आत्मविश्वासाने भारतीय सेनेचे एक वेगळे रूप चीन समोर आले असणार. यावेळी त्यांनी चीनी सैनिकांसोबत देखील ओळख करुन घेतली. भारत आणि चीन यांच्यातील संबंध येत्या काळात सुधारतील का नाही माहीत नाही? डोकलाम सारखे वाद पुन्हा निर्माण होती का नाही? माहीत नाही. मात्र जो पर्यंत भारताकडे निर्मला सीतारामन यांच्या सारखे सक्षम नेतृत्व आहे, तो पर्यंत भारत अशा प्रश्नांवर एकदम वेगळ्या पद्धतीने तोडगा काढू शकेल हे मात्र खरे.

- निहारिका पोळ

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121