मुंबईत परळ आणि एल्फिस्टन रेल्वे स्थानकाला जोडणार्या पुलावर गेल्या आठवड्यात चेंगराचेंगरी होऊन २३ जणांचा जीव गेला. अत्यंत दुर्दैवी अश्या ह्या दुर्घटनेनंतर काही काळातच समाजमाध्यमांमधून अफवांचे पेव फुटले. सोशल मीडियावर काही लोकांनी ह्या चेंगराचेंगरीचे व्हिडियोही व्हायरल केले तर काही लोकांनी पुलाच्या पायऱ्या पडल्या म्हणून चेंगराचेंगरी झाली वगैरे अफवा पसरवायला सुरवात केली. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ह्या अफवा फक्त व्हॉट्सअॅपपुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत.
द हिंदू ह्या सारख्या स्वतःला प्रतिष्ठित मुख्यमार्गी वृत्तपत्र म्हणवणाऱ्या मीडिया कंपनीनेही टीआरपीच्या हव्यासापोटी एक अत्यंत घाणेरडी अफवा चक्क बातमी म्हणून छापली. एका व्यक्तीने आपल्या ट्विटरवर फक्त पाच सेकंदांचा एक व्हिडियो टाकला होता ज्यात पुलाच्या बाहेर उभा असलेला एक पुरुष आत अडकलेल्या एका बाईला बाहेर खेचण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. केवळ त्या पाच सेकंदांच्या क्लिपच्या आधारावर त्या व्हिडियोची काहीही शहानिशा न करता वेदिका चौबे ह्या द हिंदूसाठी काम करणाऱ्या बाईने 'मरणाच्या दारात असलेल्या बाईचाही मुंबईत विनयभंग होतो' अशा स्वरूपाची सनसनाटी बातमी केली आणि तिला प्रक्षोभक शीर्षक दिले. द हिंदूच्या संपादक मंडळानेही काहीही चौकशी न करता ती बातमी प्रसिद्ध केली.
भारताशी निगडित खोडसाळ आणि विकृत बातम्या प्रसारित करणारा कुटिरोद्योग जगभरात सध्या जोरात आहे. भारत हा देश स्त्रियांसाठी सुरक्षित नाही असे चित्र जगभरात पसरवणे हे ह्या कुटिरोद्योगाशी संबंधित असलेल्या लोकांचे प्रमुख काम. ह्यामध्ये बीबीसी आणि इंडिपेंडंट सारख्या काही परदेशी वृत्तसंस्था, शरीराने भारतात राहणारे पण मनात भारताचा आणि सर्वसामान्य भारतीयांचा पराकोटीचा द्वेष करणारे काही 'भारतीयस्थ परदेशी' आणि स्वतःला 'पुरोगामी' म्हंणवणारे काही रिकामटेकडे विचारवंत ह्यांचा समावेश होतो. साहजिकच द हिंदूमधली ही 'बातमी' काहीही चौकशी न करता जगभर प्रसारित करण्याचे काम त्यांनी मोठ्या आनंदाने केले. फक्त ऑपइंडिया हे एकच ऑनलाईन वृत्तपत्र असे होते की ज्यांनी हिंदूच्या ह्या बातमीबद्दल शंका उपस्थित केली. ही बातमी लिहिणारी जी वेदिका चौबे नावाची पत्रकार आहे तिने ह्यापूर्वी अश्या बऱ्याच खोट्या बातम्या पसरवलेल्या आहेत. त्या बाईने त्या व्हिडियोत दिसणाऱ्या माणसाला उद्देशून चक्क 'बास्टर्ड' हा अपशब्द उच्चारला होता. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच माणसाचे त्या बाईला वाचवण्याचा प्रयत्न करतानाचे इतर काही व्हिडियो प्रसिद्ध झाले. वेगळ्या अँगलने घेतलेल्या ह्या जास्त मोठ्या, सविस्तर व्हिडियो क्लिप्समधून स्पष्ट दिसतंय की तो माणूस त्या बाईला ती जिथे अडकलेली आहे तिथून ओढून बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. ह्या हे दोन्ही व्हिडियो बघून आणि ह्या प्रकरणाची समग्र चौकशी करून मुंबई पोलिसांनी निर्णय दिला की तो माणूस त्या बाईला वाचवण्याचाच प्रयत्न करत होता. म्हणजे
अपघातात सापडलेल्या एका असहाय्य बाईला वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न करणाऱ्या एका निष्पाप माणसाला द हिंदूने खलनायक बनवलं. मृत्यूच्या दाढेत असणाऱ्या बाईची छेडछाड करणारा नराधम असं भयानक लेबल त्याला चिटकवून टाकलं, तेही काहीही सबळ पुरावा नसताना.
मुंबई पोलिसांच्या ह्या स्पष्टीकरणानंतर काल रात्री उशिरा 'द हिंदू' ने आपली खोडसाळ आणि तद्दन खोटी बातमी शेवटी मागे घेतली, पण दोन दिवस ती बातमी प्रसिद्ध होती. कित्येक हजार लोकांनी ती आपापल्या फेसबुकवरून, ट्विटरवरून, व्हॉट्सअॅपवरून शेअर केली. इंडिपेंडंट, स्कुपव्हुप ह्या परदेशी वृत्तसंस्थांनीही ही बातमी शेअर केली. एका सज्जन माणसाची हकनाक जगभर बदनामी झाली तेही त्याची काहीही चूक नसताना. इतके होऊनही ''द हिंदू' ने तद्दन खोटी बातमी दिल्याबद्दल माफी मागितलेलीच नाही, फक्त दिलगिरी व्यक्त केली आहे, तीसुद्धा आतल्या पानावर, चार ओळीत, एका कोपऱ्यात. ही बातमी लिहिणारी वेदिका चौबे तर कालपासून ट्विटरवरून गायबच आहे. म्हणजे खोटे बोलायचे तेव्हा रेटून बोलायचे आणि माफी मागायची वेळ आली की गायब व्हायचे ही 'द हिंदू'ची संपादकीय पॉलिसी दिसतेय.
मुंबईतल्या चेंगराचेंगरीसारखा एखादा दुर्दैवी अपघात घडतो तेव्हा पोलीस आणि इतर यंत्रणा पोचायच्या आधी तिथे उपस्थित असलेले लोक यथाशक्ती लोकांना मदत करायचे काम स्वयंस्फूर्तीने सुरु करतात. पण असे चांगले काम करणाऱ्याची जर अशी प्रसारमाध्यमांमधून जाणूनबुजून बदनामी करण्यात येत असेल तर कोण कुणाला मदत करू धजेल? मागे २००२ मध्ये सौदी अरेबियात मक्का येथे मुलींच्या शाळेला आग लागली होती त्यात पंधरा शाळकरी लहान मुली होरपळून मेल्या. पोलीस व अग्निशामक यंत्रणा वेळेत पोचली होती तरीही, कारण सौदीमधल्या इस्लामी कायद्यानुसार पुरुषांना मुलींच्या शाळेत प्रवेश करायला, अपरिचित मुलींना स्पर्श करायला बंदी होती आणि तिथल्या मुतव्वा म्हणजे धार्मिक पोलिसांनी ती बंदी चोख बजावली. अग्निशामक दलाच्या जवानांसमोर, त्या मुलींच्या पालकांच्या डोळ्यादेखत त्या निष्पाप पोरी आगीत तडफडून जळून गेल्या आणि मुतव्वा ते सगळे निर्लज्जपणे बघत होते. द हिंदूंचे संपादक मंडळ आणि ह्या बातमीच्या लेखिका वेदिका चौबे भारताच्या स्वघोषित मुतव्वा आहेत ज्या अश्या दुर्दैवी प्रसंगात लोकांचा जीव जाताना बघतील पण त्यांना कुणाला मदत करू देणार नाहीत.
एकेकाळी 'द हिंदू' हे वृत्तपत्र लोकहिताची, समाजहिताची चाड असलेले वृत्तपत्र म्हणून ओळखले जायचे. पण आता हेच वृत्तपत्र केवळ सवंग लोकप्रियतेसाठी कसलीही खोटी बातमी छापायला तयार असते हेच ह्या प्रकरणाने सिद्ध झाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोंडस नावाखाली काहीबाही खोटेनाटे छापणे हा सध्या भारतीय पारंपारिक मीडियाचा स्थायीभाव बनलेला आहे, आणि वर हेच लोक 'प्रसार माध्यमांची विश्वासार्हता रसातळाला का गेली आहे' असे प्रश्न विचारताना दिसतात. सामान्य वाचकानेच आता ठरवले पाहिजे की तिला सत्याची चाड आहे की टीआरपी पाठीमागे धावून काहीही खोटे, खोडसाळ लिहिणारा मीडिया हवा आहे? आता लोकांनीच ठरवायचंय की त्यांना फक्त एक पॅसिव्ह ग्राहक बनायचंय की जबाबदार अभिव्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीची चाड असलेले सुबुद्ध नागरिक?
शेफाली वैद्य