असमर्थांघरचे श्वान

    30-Oct-2017   
Total Views | 2

 

पक्षाचे उपाध्यक्ष आणि देशातले सर्वात जुने जाणते, पन्नाशीला आलेले चिरतरुण युवा नेते राहुल गांधी ह्यांचा सध्या 'सोशल मीडिया मेकओव्हर' चालू आहे हे एव्हाना देशात काय चालू आहे ह्याची खबर ठेवणाऱ्या सर्वांना कळून चुकले असेल. त्याच नवीन इमेजचा भाग म्हणून त्यांनी काल एक काहीसे विनोदी ढंगाचे ट्विट केले होते. ट्विटमध्ये एक छोटा व्हिडियो आहे ज्यात राहुल गांधी त्यांच्या पीडी नामक गोंडस कुत्र्याला सूचना देताना दाखवलेत. राहुल 'नमस्ते कर' म्हणतात, पीडी नमस्ते करतो. राहुल पीडीच्या नाकावर एक बिस्कीट ठेवतात, तो बिस्कीट नाकावर ठेवून तसाच स्तब्ध उभा राहतो आणि राहुल गांधी ह्यांनी परवानगी दिल्यावरच बिस्कीट खातो. शेवटी राहुल त्याला 'गुडबॉय' अशी शाबासकी देतात. खरोखरच पीडी अत्यंत चलाख आणि आज्ञाधारक कुत्रा आहे ह्यात वादच नाही आणि ज्यांनी कुणी त्याला प्रशिक्षण दिलेले आहे त्या माणसाचेही कौतुकच आहे. ट्विटमध्ये असे म्हटले आहे की 'हल्ली विचारणा होते की ह्या अकाउंटचे ट्विट्स कोण लिहितो? मी पीडी, कारण मी माझ्या मालकापेक्षा जास्त हुशार आहे'.



अपेक्षेप्रमाणेच हे ट्विट व्हायरल झाले. कारण खेळ करून दाखवणारा हुशार, गोंडस कुत्रा बघायला कुणाला आवडणार नाही? पण ह्या ट्विटवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या केवळ हास्यास्पद नव्हे, तर भीतीदायक होत्या. संजय झा, प्रियांका चतुर्वेदी, पक्षाचा सोशल मीडियावरचा प्रसार सांभाळणारी दिव्या स्पंदना ह्यांच्यासकट भल्याभल्यांनी ह्या ट्विटची खूप भलावण केली. ती भलावण इतकी हास्यास्पद होती की पिडीला देखील हसू आले असते.

 

 

हेमंत बिस्वा सरमा हे आसाममधले एकेकाळचे काँग्रेसचे आघाडीचे नेते. त्यांनी आसामच्या निवडणुकीपूर्वी पक्षत्याग करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि ते आज आसामचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी आपण काँग्रेसचा त्याग का केला हे सांगताना पूर्वी एका मुलाखतीत म्हटले होते की जेव्हा ते आसामच्या समस्या सांगायला म्हणून राहुल गांधींना भेटायला गेले होते तेव्हा राहुल गांधींनी त्यांच्याकडे लक्षही दिले नाही. त्या भेटीत हेमंत बिस्व सरमा पोटतिडीकेने आसामच्या प्रश्नांबद्दलबोलत होते आणि राहुल मात्र पूर्णवेळ पीडीशी खेळत त्याला बिस्किटे भरवत होते. त्या प्रसंगाची आठवण करून देत हेमंत बिस्वा सरमा ह्यांनी काल ट्विट केले की 'पीडी किती हुशार आहे हे माझ्याहून चांगले कोण समजू शकेल? मी राहुलना आसामच्या समस्या सांगत होतो तेव्हा ते माझ्याकडे लक्षही न देता पिडीशी खेळत होते.' ते ट्विटही व्हायरल झाले. बहुधा हेमंत बिस्वा सरमांचे हे प्रत्युत्तर काँग्रेसला चांगलेच झोम्बले असावे कारण लगेचच काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी ह्यांनी त्यांना उत्तर दिले की 'कुत्र्याचा प्रमुख गुण असतो त्याची स्वामीभक्ती. तुम्ही स्वामीभक्ती पाळली नाहीत, आणि राहुलचा विश्वासघात केला हे तुम्हाला कुठेतरी खटकते का?'

प्रियांका चतुर्वेदींचे हे ट्विट म्हणजे काँग्रेसमधल्या सद्य परिस्थितीवर केलेली एक विदारक भाष्य आहे. काँग्रेसमध्ये इतर कुठलेही गुण महत्वाचे नसून फक्त स्वामीभक्ती आणि एका घराण्यातल्या लोकांच्या सर्व आज्ञांचे डोळे झाकून पालन करणे हा एकमेव गुण महत्वाचा आहे हेच जणू चतुर्वेदी बाईंनी त्या ट्विटमधून जाहीरपणे कबूल केले आहे. राहुलनी ट्विट केलेल्या व्हिडियोमधला पीडी हा नुसता असमर्थाघरचा श्वान नसून संस्कृतीचा प्रतीक आहे. पक्षनेता म्हणून आपल्या आपल्या अनुयायांकडून काय अपेक्षा आहेत ह्याचे राहुलनी आपल्या ट्विटमधून प्रदर्शन केलेच आहे. केलेल्या आज्ञा निमूटपणे पाळल्या, आपण सांगू तसा खेळ करून दाखवला, आणि मुकाट शेपूट हलवली तरच खायला बिस्कीट मिळेल, 'गुड बॉय' अशी शाबासकी मिळेल असा संदेश राहुल गांधी ह्यांनी आपल्या ट्विटमधून जगाला दिलेलाच आहे. पण त्या संदेशाची किळस येईल इतक्या लाळघोटेपणाने री ओढताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना बघताना कुठल्याही स्वाभिमानी माणसाला चीड आल्याशिवाय राहवणार नाही.

तसे गांधी घराण्याचे आणि श्वानांचे नाते फार जुने आहे. तवलीन सिंग ह्या इंग्रजीतून लिहीणाऱ्या पत्रकार बाईंनी 'दरबार' ह्या आपल्या पुस्तकात अशी आठवण दिली आहे की जनता पक्षाच्या राजवटीच्या वेळी इंदिरा गांधींच्या दोन्ही सुनांमधले मतभेद विकोपाला गेले होते. तेव्हा सोनिया गांधींनी आणलेली परदेशी कुत्र्यांची बिस्किटे जाऊबाई मनेका गांधींनी आपल्या कुत्र्याला खाऊ घातली म्हणून सोनिया आणि राजीव मनेका गांधींना खूप बरेवाईट बोलले असे तवलीन सिंग ह्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी सध्या इमेज मेकओव्हरच्या धुंदीत आहेत. पण आज्ञाधारक आंधळी स्वामीभक्ती हा एकमेव नेतृत्वगुण असावा ही जर पक्षातल्या लोकांकडून त्यांची जाहीर अपेक्षा असेल तर ती भारतासारख्या लोकशाही देशासाठी अत्यंत शरमेचीआणि दुःखाची गोष्ट आहे.

पीडी आपल्या मालकाच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकणारा अत्यंत चलाख श्वान आहे ह्यात शंकाच नाही पण पीडीचा मालक मात्र देशाच्या नेतृत्वाबद्दलच्या अपेक्षा पुऱ्या करायला असमर्थ आहे हेच ह्या ट्विटने सर्वांना दाखवून दिले आहे. केवळ चमकदार ट्विट्स करून आणि उसन्या विनोदाचा आधार घेऊन देशाचे नेतृत्व करता येत नाही हे राहुल गांधींना कधी ना कधी तरी समजावे हीच देशातल्या सुजाण जनतेची इच्छा असेल.

 

शेफाली वैद्य

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121