मार्गारेट एलिझाबेथ नोबल ! २८ ऑक्टोबर १८६७ ह्या तारखेला तिचा आयर्लंड मध्ये जन्म झाला ज्याला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. ती विदेशी होती मात्र तिचं नाव भारतभूशी अशा प्रकारे जोडलं गेलं की ते अपृथक झालं! तसं तर ती एक स्वयंभू व्यक्तिमत्व होतीच! ह्या सगळ्या तिच्या क्षमता, तिचं पूर्वसुकृत आणि त्याला परिश्रमाची जोड. तरीही तिचा प्रवास हा एका महान व्यक्तीमत्वाशिवाय अपूर्ण! हे खरंतर व्यक्तिमत्व नव्हे तर ती काही महत्तम मूल्य! फार दुर्मिळतेने साध्य होणारी गोष्ट म्हणजे गुरु लाभणं! भारताबाहेरून येथे काही समाजकार्य करण्यासाठी आलेल्या व्यक्तींच्या ओंजळीत न पडलेली गोष्ट म्हणजे अध्यात्मिक गुरुंचं शिष्यत्व तिला मिळालं आणि आयुष्य उजळून गेलं – तिचं आणि बरोबरीने अनेकांचं! मार्गारेट पासून भगिनी निवेदिता नावाचा हा प्रवास गुरु स्वामी विवेकानंद नावाशिवाय किंबहुना अध्यात्मिक बैठकीशिवाय आणि त्यांच्या वेदांतअनुभवाशिवाय मांडणं कठीण....
परवाच वाचलं कुठेसं, हातोडा घेऊन उभं राहिलं की सर्वत्र खिळे दिसतात. तसं सेवाकार्य हा एकमेव अजेंडा घेऊन उभं राहिलं की सर्वत्र दुःख, दारिद्र्य दिसतं. मार्गारेटने कोणत्याही मिशनरीसारखं सेवाकार्याचं स्वप्न बघितलं नाही तर भारताच्या पुनरुत्थानाचं, वैभवसंपन्नतेचं स्वप्न बघितलं आणि त्याचे जे परिणाम हातात आले ते आश्चर्यचकित करणारे होते.
मार्गारेट ख्रिस्ती धर्मात जन्माला आली. लहानपणापासूनच तिला संगीत आणि कलेची आवड होती. तिनं साहित्य, भौतिकशास्त्र, नैसर्गिक विज्ञानशास्त्र अभ्यासलं. ती बौद्ध तत्वज्ञानाकडेही वळली. तिला समाजसेवेची दीनदुबळ्यांची मदत करण्याची आवड होती आणि पुढे शिक्षिका म्हणूनही अतिशय प्रयोगशीलतेने ती कार्यरत होती. आणि मग १८९५ साल उजाडलं. तिच्या पूर्ण आयुष्याला कलाटणी देणारं. तिच्या क्षमतांना निर्माणक बनवणारं. आयुष्याला अध्यात्मिक स्पर्श करून तुळशीपत्राने पारडं जड करून टाकणारं वर्ष! १८९३ साली शिकागो धर्मपरिषद गाजविणारे स्वामी विवेकानंद १८९५ साली लंडनला आले आणि त्यांची तिची भेट झाली. एका घरी जमलेल्या सर्व लोकांना संस्कृत वचने सांगत स्वामीजी धीरगंभीर आवाजात बोलत होते, मधूनच शिव शिव असे म्हणत होते. त्यानंतरही तिने स्वामीजींना खुपदा ऐकले. त्यांच्या निष्कलंक चारित्र्याने, सन्यस्त वृत्तीने, अमोघ वाणीने, देशासाठी सर्वस्वाचा त्याग केलेल्या अशा प्रभावी व्यक्तिमत्वाने ती वेधली गेली. तिचं अंतःकरण श्रद्धेने भरून गेलं. त्यातच एका प्रवचनात स्वामीजींनी ‘भारतातील शिक्षण आणि महिला सक्षमीकरण’ ह्यासाठी भारतात काम करण्यास उत्सुक असणाऱ्यांना हाक दिली आणि मार्गारेटने त्यास मनोभावे प्रतिसाद दिला. मार्गारेटची निवड अशी विधीलिखित असावी.
अखेरीस ती १८९८ साली भारतात आली आणि आपलं उर्वरित आयुष्य भारतासाठी समर्पित केलं. तत्पूर्वी आयुष्यभर पाठीशी राहण्याचे स्वामीजींनी तिला वचन दिले होते. कलकत्यामध्ये येताच तिने बंगाली शिकायला सुरुवात केली. स्वामीजींनी तिला ब्रह्मचर्याची शपथ देऊन ‘निवेदिता’ असे नवीन नाव दिले. भगिनी निवेदिता म्हणून हे नाव भारताच्या इतिहासात अजरामर झाले. स्वामीजींच्या प्रवचनातून आणि वाचनातून भारताचा वैभवशाली इतिहास, शास्त्रे, शिल्प व वास्तूकला, काव्ये, पुराणे, महापुरुष ह्यांची तिला ओळख झाली. गुरु आणि शिष्याचं भारतीय परंपरेतलं हे तत्वज्ञान ती खरोखर जगली आणि स्वामी विवेकानंदांकडून ज्या ज्या गोष्टी शिष्य म्हणून संपादन केल्या त्या त्या गोष्टी इतरांना प्रेरणारूपाने देऊन परंपरा जपली.
त्यांनी कलकत्याच्या बागबझार भागात बोसपाडा गल्लीत मुलींची छोटी शाळा सुरु केली. सारदादेवींच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या उपस्थितीत शाळेचं उद्घाटन तर झालं मात्र विद्यार्थिनी मिळवण्यासाठी निवेदितांना शब्दशः दारोदारी जावं लागलं. पालकांना मुलींना शाळेत पाठविण्यासाठी प्रवृत्त करावं लागलं. प्रथम निवेदितांना परकीय म्हणून दूर लोटलं गेलं, विरोध झाला. तरी त्यांनी नेटाने प्रयत्न चालूच ठेवले. सुरुवातीला आपल्या मुलींना शाळेमध्ये पाठविण्यासाठी पालक उत्सुक नसल्याने केवळ प्रौढ आणि विधवा स्त्रिया शाळेत येऊ लागल्या. त्यांच्यासाठीही त्यांनी साक्षरता वर्ग घेतले. अखेरीस काही विद्यार्थिनी मिळाल्या.
१८९९ मध्ये कलकत्याच्या प्लेगच्या साथीत निवेदिता सर्व प्रकारच्या कामांसाठी पुढे आल्या. दिवसाकाठी शेकडो माणसे मृत्युमुखी पडत होती. निविदेतांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छतेपासून सुरुवात तर केलीच पण एका नेत्याची भूमिका वठवत स्वच्छतेसाठी लोकांचे समूह बनवून त्यांना शहरभर ह्या कामासाठी पसरले. स्वच्छतेबरोबरच प्लेगने प्रत्यक्ष आजारी असणाऱ्यांची मनोभावे सेवा सुश्रुषा केली. औषधे मिळवून दिली. स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता अत्यंत समर्पित भावनेने त्यांनी हे काम केले.
आपल्या शाळेसाठी देणग्या जमा करण्यासाठी त्या स्वामी विवेकानंदांच्या अनुमतीने युरोप अमेरिकेत गेल्या. शाळेसाठी भरघोस निधी तर जमा झाला नाही मात्र भारतविषयक तिथे पसरलेलं अज्ञान दूर करणं हेही एक मोठं काम आहे हे त्यानिमित्ताने त्यांना कळून चुकलं. ख्रिश्चन मिशनरीजनी प्रचार केलेल्या भारतविषयक चुकीच्या गोष्टी त्यांनी आपल्या प्रभावशाली भाषणांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. भारताची उज्वल संस्कृती, वैभवशाली इतिहास आणि तत्वज्ञान बरोबरीनेच भारताच्या पराभवाची कारणेही त्यांच्या भाषणांमध्ये येत असत. भारताची डागाळलेली प्रतिमा स्वच्छ करणं हे एक महान कार्य होतं आणि त्यांना आपला देश समजून हे करावसं वाटलं इतक्या त्या ह्या भूमीमध्ये रुजून गेल्या होत्या. इथल्या संस्कृतीशी समरस झाल्या होत्या. एके ठिकाणी त्यांची एक आठवण लिहिलीय. एकदा एकत्र चहा घेत असताना आकाश मेघांनी व्यापून गेलं. अंधार होऊन विजा चमकायला लागल्या. मेघांचा जोरात गडगडाट झाला. निसर्गाचा तो अचानक रुद्र अवतार बघून भयचकित होऊन निवेदितांच्या तोंडून आपसूक ‘काली!’ असे उद्गार बाहेर पडले. कालीदेवतेस त्यांनी असं मनोभावे पुजलं होतं, इथली संस्कृती त्यांनी अंतःकरणात अशी रुजवली होती.
बंगालच्या अनेक बुद्धीजीवी आणि कलाकार व्यक्तींशी निवेदितांचा स्नेह जुळला होता. सारदादेवींच्या तर त्या जवळच्या सहकारी होत्याच. मात्र रवींद्रनाथ टागोर, जगदीशचंद्र बोस, अबला बोस, अवनिन्द्रनाथ टागोर, श्री अरबिंदो, गोपालकृष्ण गोखले, बिपिनचंद्र पाल, सुरेंद्रनाथ बॅनर्जी ह्यांच्याबरोबरचे त्यांचे मैत्र हे परस्परसंबंध समृद्ध करणारे ठरले.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी अनेक तरुणांना प्रेरणा देण्याचे महान कार्य निविदितांनी आपल्या लेखणीने आणि वाणीने केले. त्या उत्कृष्ट लेखिका आणि वक्त्या होत्या. त्यांनी भारतभर दौरे केले आणि भारताची संस्कृती आणि धर्म ह्यावर अनेक व्याख्याने दिली. आपल्या अमोघ वाणीने त्यांनी भारताच्या समृद्धतेचा प्रचार केला त्यामुळे अनेक तरुणांमध्ये स्वाभिमानाची, क्रांतीची ज्योत पेटली. अनुशिलन समितीच्या अनेक क्रांतिकारकांच्या त्या प्रत्यक्ष संपर्कात होत्या.
कलकत्ता विद्यापीठात १९०५ साली लॉर्ड कर्झनचे भाषण झाले. ज्यामध्ये पुर्वेपेक्षा पाश्चिमात्य देशांमध्ये सत्याला मोठे महत्त्व आहे असे आले. ह्यावर निवेदितांनी स्वतः काही शोध घेऊन कर्झनने एके ठिकाणी दिलेले वय आणि लग्नविषयक बाबींची कथनं कशी खोटी आहेत आणि असे खोटे दाखले देऊन कोरिअन फॉरेन ऑफिसची मर्जी त्याने कशी संपादन केली ह्याचा पर्दाफाश केला. अमृता बझार पत्रिकेमध्ये हे येताच ‘द स्टेट्समन’ ने कर्झनला माफी मागण्यास भाग पाडले. निवेदितांचं रूप जसं सौम्य तसंच असं झंझावाती होतं. भारताविषयक कोणताही अपप्रचार गप्प बसून सहन करणं त्यांना शक्य नव्हतं इतक्या त्या इथे एकरूप झाल्या होत्या.
आपल्या लेखणीने आणि भाषणांनी त्यांनी देशभरात राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लावली. पाटणा, लखनौ, वाराणसी, मुंबई, नागपूर, मद्रास अशा अनेक शहरात त्यांनी भाषणे दिली आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी लोकांना प्रेरणा दिली. त्यांची शाळा राष्ट्रवादी विचारांचे केंद्रच झाली. वन्दे मातरम् ही शाळेची प्रार्थनाच होऊन गेली. ह्या सगळ्याची सुरुवात तर स्वामी विवेकानंदांमुळे झाली मात्र गुरूने शिष्याला मार्ग दाखवावा आणि त्या मार्गावरून ध्येय मात्र आपलं आपण गाठावं असा भगिनी निवेदितांचा प्रवास झाला. गुरु शिष्याची ही परंपरा एक ठळक उदाहरण म्हणून पुढे आली. स्वामीजींनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे निवेदिता बहरल्या आणि अगदी त्यांच्यानंतरही एकटीच्या हिमतीवर त्यांना आपला कार्यविस्तार करता आला. शिष्याच्या भूमिकेतून देण्याच्या भूमिकेपर्यंत येऊन ठेपल्या. अॅनी बेसंट ह्यांना प्रोत्साहित करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता. त्या काळी राजा रविवर्मांसारख्या पाश्चात्य शैलीने चित्र काढणारे कलाकार नावारूपास आले होते. मात्र कलेचे भारतीयत्व जपले पाहिजे असे भगिनी निवेदितांना वाटत होते. अवनिन्द्रनाथ टागोर, नंदलाल बोस, असित हलदर ह्यांना त्यांनी त्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या ‘काली दी मदर’ ह्या पुस्तकाच्या आणि कलाविश्वात निर्माण केलेल्या राष्ट्रीयत्वाच्या प्रेरणेने अवनिन्द्रनाथांनी पुढे ‘भारतमाता’ सुप्रसिद्ध चित्र काढले. देशाभिमान जागा करण्यासाठी निवेदितांनी लिहिलेल्या खालील उताऱ्यावरूनसुद्धा त्यांना भारताबद्दल वाटत असलेल्या आत्मीयतेचा आणि त्यांनी दिलेल्या प्रेरणेचा अंदाज येऊ शकतो. कर्मयोगिनच्या संपादकीयमध्ये त्या लिहितात -
“The whole history of the world shows that the Indian intellect is second to none. This must be proved by the performance of a task beyond the power of others, the seizing of the first place in the intellectual advance of the world. Is there any inherent weakness that would make it impossible for us to do this? Are the countrymen of Bhaskaracharya and Shankaracharya inferior to the countrymen of Newton and Darwin? We trust not. It is for us, by the power of our thought, to break down the iron walls of opposition that confront us, and to seize and enjoy the intellectual sovereignty of the world.”
बंगाल ही आधीच राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर अशा ध्येयवादी सुधारकांची भूमी होती. त्यातून भगिनी निवेदितांसारख्या व्यक्तींमुळे राष्ट्राभिमान जागृत व्हायला आणखी मदत झाली. प्राचीन भारताचा समृद्ध वारसा त्यांनी आपल्या गुरूंकडून ऐकला आणि आपल्या भाषण आणि लेखनाद्वारे पूर्ण जगासमोर मांडला. The Web of Indian Life, Kaali The Mother, The Master as I saw him (on Swami Vivekanand) The Cradle Tales of Hindusim (on the stories from Puranas), , Ramayana and Mahabharata, Studies from an Eastern Home, Civil Ideal and Indian Nationality, Hints on National Education in India, Myths of the Hindus & Buddhists, Religion and Dharma व इतर अशी त्यांची मोठी ग्रंथसंपदा आहे.
स्वामी विवेकानंद सुरुवातीच्या एका पत्रात त्यांना म्हणतात, “प्रेमाच्या जोरावर जडाचं चैतन्यात रुपांतर करता आले पाहिजे; नव्हे हेच तर वेदान्ताचे सार आहे.” पुढे आपल्या ध्यानधारणेच्या एका अनुभवाविषयी लिहिताना त्या म्हणतात "A mind must be brought to change its centre of gravity...again open and disinterested state of mind welcomes truth.” निवेदिता म्हणतात, “मनाची निष्काम, स्वार्थरहित अवस्था सत्याकडे घेऊन जाते.” स्वामी विवेकानंदांना जे “चैतन्यात रुपांतर” अपेक्षित होतं ते हेच असावं असं वाटून जातं.
स्वामीजींची अखेर हा एक हृद्य प्रसंग आहे. १९०२ च्या सुमारास स्वामी विवेकानंदांची प्रकृति अधिकच ढासळत होती. निवेदिता आपल्या गुरूंना भेटायला गेल्या. स्वामीजींचे अंतःकरण भरून आले. त्यांनी स्वतः निवेदितांना जेवण वाढले, त्यांच्या हातावर पाणी घातले आणि त्यांच्या विरोधाला न जुमानता टॉवेलने त्यांचे हात पुसले. त्याक्षणीही येशूने आपल्या शिष्यवरांचे पाय धुतले होते ह्याची आठवण स्वामीजींनी करून दिली. येशूच्या जीवनाचे ते अंतिम क्षण होते. हे मनात येऊनही निवेदिता काही बोलल्या नाहीत. २ जुलै १९०२, स्वामीजी आणि निवेदितांची ही अखेरचीच भेट ठरली. 3 जुलैला स्वामीजींचे महानिर्वाण झाले. निवेदिता धावतच मठाकडे पोहोचल्या. पाच तारखेला अंत्यविधीसाठी स्वामीजींचा देह भगव्या कपड्यात आणण्यात आला. भगिनी निवेदितांना त्या भगव्या वस्त्राचा एक तुकडा त्यांच्या शिष्याला पाठवण्यासाठी हवा होता मात्र ते योग्य दिसणार नाही ह्या कारणाने त्या गप्प राहिल्या. अंत्यविधीच्या ज्वाळा सरत असताना निवेदितांच्या बाहीला स्पर्श जाणवला म्हणून त्या वळल्या. भगव्या कापडाचा एक छोटा तुकडा चीतेमधून त्यांच्याजवळ येऊन पडला होता. त्यांनी तो उचलला आणि आशीर्वाद समजून जवळ ठेवला. हा मानला तर योगायोग नाहीतर अनुभूती!
भगिनी निवेदिता अथक कार्यरत होत्या. अतिश्रमामुळे देह थकला होता. अखेरच्या काळात स्वतःचे सर्वस्व, पुस्तकांच्या कॉपीराईटचे हक्क हे सर्व मृत्युपत्राद्वारे बेलुर मठाला देऊन टकले. दार्जीलिंगमध्ये भ्रमणास गेल्या असताना प्रकृति अजूनच ढासळली. १३ ऑक्टोबर १९११ रोजी त्या काळाच्या पडद्याआड गेल्या. त्यांच्या समाधी चौथऱ्यावर मजकूर आहे, “ज्यांनी आपले सर्वस्व भारताला दिले, त्या निवेदिता येथे विसावल्या आहेत.”
मेडेलिन स्लेडही अशीच भारतात आली होती; गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडल्यामुळे. तिलाही चित्र आवडायची. संगीताचं आकर्षण होतं. गांधीजींमुळे भारावून जाऊन भारतासाठी काही कार्य करण्यासाठी तीही प्रवृत्त झाली होती. अगदी आश्रमातल्या साध्या राहणीचा सराव करून आली होती. तिनेही बरीच सामाजिक कामं केली पण गांधीजींच्या मृत्यनंतर ती त्यातून निवृत्त झाली. एवढंच नाही तर ती भारतातूनही परतली.
मदर टेरेसाही भारतात आल्या आणि आपल्या सेवाकार्यामुळे स्वतःचं नाव भारताच्या इतिहासात कोरून गेल्या.
सरलादेवी घोषाल म्हणजे रवींद्रनाथ टागोरांची भाची – बहिणीची मुलगी. तिच्याकडून तमाम बंगालला खूप मोठ्या अपेक्षा होत्या. एवढंच नाही तर स्वामी विवेकानंदांना भारतामध्ये स्त्रियांसाठी शैक्षणिक कार्य करण्यासाठी तसेच पैसा उभा करण्याच्या कामात त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्यासाठी त्यांना सुचवूनही झाले. मात्र आपल्या अफाट क्षमतांचा आणि प्रभावी व्यक्तीमत्वाचा गांधीजींच्या सानिध्यात येऊनही ना गांधीजींकडून त्यांचा समाजकार्यासाठी काही उपयोग केला गेला ना वैयक्तिक क्षमता जोपासल्या गेल्या. उलट गांधी व्यक्तिमत्वाने उत्कटतेने भारावून गेल्यानंतरही त्यातून काहीही सृजनशील साध्य न होता त्यांचे व्यक्तित्व झाकोळून गेले. काही गोष्टी ह्या soul’s choice असतात असं म्हणतात. त्यातून स्वामी विवेकानंदांसारख्या विकल्पाचा शक्य असूनही विचार झाला नाही ह्यामागे निश्चितच काही विधिलिखित होतं.
निवेदितांच्या आयुष्याला अध्यात्मिक स्पर्श झाला. एका चिरंतन तत्वज्ञानाचा स्पर्श! आणि मग त्या आपल्या गुरूंशी आणि तद्नंतर त्यांनी दाखवलेल्या राष्ट्रनिर्माणाच्या कार्याच्या मार्गशी पर्यायाने भारताशी एकरूप झाल्या. श्रद्धेने, धर्माने, संस्कृतीने! भारतानेही त्यांना आपलं मानलं! त्यांनी सेवाकार्यासाठी दुःख शोधलं नाही तर भारतातलं प्राचीन वैभव शोधलं आणि त्यामुळे त्यांना तेच परतून मिळालं. पुढील काळात बंगालमध्ये अनेक स्वातंत्र्यसेनानी उदयास आले. निवेदितांनी सुरु केलेल्या शाळेचं एका मोठ्या शिक्षण संस्थेत परिवर्तन होऊन ती शिक्षणाद्वारे आज हजारो कन्यांचं सक्षमीकरण करत आहे. भारतातल्या अनेक शिक्षण संस्थांना त्यांचं नाव सन्मानपूर्वक दिलं गेलं. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारत सरकारने त्यांच्या प्रतिमेचा पोस्टल स्टँप काढला. जगदीशचंद्र बोसांच्या संशोधन संस्थेत निवेदितांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हातात दीप घेतलेल्या स्त्रीची प्रतिमा स्थापन करण्यात आली. निवेदिता केवळ समाजसेविका राहिल्या नाहीत तर भारतीयांसाठी सर्जक - निर्माणक ठरल्या आणि म्हणूनच भारतीयांना पूजनीय झाल्या. कोणत्याही पुरस्कारापेक्षा - नोबेलपेक्षा हा नक्कीच खूप मोठा गौरव आहे. त्यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना शतशः प्रणाम!