जरूर आओ इंडिया... अखेर रेडियो मिर्चीला झुकावेच लागले ...

    28-Oct-2017   
Total Views | 2



फतेहपुर सीकरी येथे बाहेरच्या देशातून आलेल्या एका जोडप्यावर विनाकारण हल्ला करण्यात येतो, आणि सारा देश या विरोधात पेटतो, मात्र रेडियो मिर्ची सारखे नावाजलेले रेडियो चॅनल या विरोधात जे अभियान सुरु करतात, त्याचे नाव असते.. "मत आओ इंडिया"... देशाच्या गौरवाला काळिमा फासणाऱ्या या अभियानाच्या विरोधात ट्विटरवर पेटलेल्या वादानंतर अखेर रेडियो मिर्चीला झुकावे लागते....



माध्यमांचे आपल्या आयुष्यात एक अनन्य साधारण महत्व आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमे अनेक वर्षांपासून आपल्या आयुष्यात काही ना काही कारणांनी महत्वाची ठरली आहेत. रेडियो तर सगळ्यात जुने आहे.. हिटलरच्या यशामागे रेडियोचा मोठा हात होता. जेव्हा या माध्यमांमध्ये इतकी ताकद असते, तेव्हा त्याचा दुरुपयोग पण होवू शकतो नाही का?... नुकत्याच फतेहपुर सीकरी येथे एका परदेशी जोडप्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर रेडियो मिर्ची सारख्या एका नावाजलेल्या रेडियो चॅनेलने परदेशी पर्यटकांसाठी "मत आओ इंडिया" या नावाने अभियान सुरु केले, आणि एकूणच सोशल मीडियावर भडका उडाला. आणि पुन्हा एकदा समाज माध्यमांमध्ये मुख्यप्रवाहातील माध्यमांपेक्षा जास्त ताकद असल्याचे आढळून आले. ट्विटर आणि फेसबुकवर 'मत आओ इंडिया' कॅम्पेनच्या विरोधात आवाज कठोर झाल्याने रेडियो मिर्चीला अखेर आपले अभियान परत घेत माफी मागावीच लागली.



काय होते नेमके प्रकरण?

दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश येथील फतेहपूर सीकरी येथे एका स्विस जोडप्यावर काही तरुणांनी दगडांनी आणि लाठ्यांनी हल्ला केला. यामध्ये दोघांनाही भरपूर मार लागला. या हल्ल्यामागे काहीच सबळ कारण नव्हते. या घटनेच्या विरोधात रेडियो मिर्चीने चक्क 'मत आओ इंडिया' या नावाखाली अभियान सुरु केले. 'अतिथी देवो भव' सांगणाऱ्या देशात 'मत आओ इंडिया' अभियान चालतं या सारखं दुर्दैव काय. त्याहूनही वरचढ 'द वायर' या संकेतस्थळाने तर चक्क या अभियानाला 'विदेशी पर्यटक सुरक्षा अभियान' घोषित केले. याला आता बौद्धिक दिवाळखोरी नाही म्हणणार तर काय?

मात्र म्हणतात ना आजच्या काळात 'सोशल मीडिया' मध्ये जी ताकद आहे ती कुणाकडेच नाही. या अभियानाविरोधात ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून वादळ उठले. अनेकांनी आपला रोष व्यक्त केला. याचा अर्थ ते हल्ल्याच्या घटनेचे समर्थन होते का? तर नाही. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा विरोध हा केलाच पाहीजे. मात्र त्यासाठी भारताच्या संस्कृतीला, भारताच्या पर्यटनाला इजा पोहोचेल असे काही करणे मुख्य प्रवाहातील माध्यमांना शोभते का?



या ऑडियो कॅम्पेन मध्ये अक्षरशः "इंडिया आना आपकी सेहत के लिए हानिकारक है" असे म्हटले आहे. तसेच यामध्ये वापरलेल्या भाषेमुळे शब्दांमुळे भारताचा किती मोठा अपमान झाला आहे, हे लिहिण्यासाठी सुद्धा शब्द सापडणार नाहीत.

समाज माध्यमांच्या ताकदीमुळे आज रेडियो मिर्चीने माफी मागितली. आपले अभियान देखील थांबवले. हे सुदैवच म्हणा... मात्र आपणच आपल्या देशाविषयी असे बोलल्यास परदेशी पर्यटकांने आपल्याकडे चांगल्या नजरेने बघावे याची अपेक्षा तरी कशी करावी.. आणि भारताचा झाला तो अपमान जागतिक स्तरावर सगळ्यांनी बघितला, ऐकला... त्याचे काय? तो सन्मान परत येईल?? या प्रश्नाचे उत्तर कधी मिळू शकणार नाही..

- निहारिका पोळ

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121