अवंती : मेधाकाकू मस्त मस्त मस्त ! आमचे दिवाळी कंदील खूपच मस्त झाले या वर्षी. आमच्या सरीताची अमृतकन्या श्रुतीसाठी बनवलेल्या माझ्या कंदिलाचे नांव ‘स्वमग्न’. तर आजी, आई, बाबा आणि कुटुंबाचे महत्व लक्षात घेऊन बनवलेल्या चिन्मयीच्या कंदिलाचे नांव ‘निर्भर’. मोहिनी खूप टापटीप रहाते आणि तिला नेहमीच नव्या कपड्यांची आवड आही म्हणून तिने बनवलेल्या कंदिलाला आम्हीच नाव दिले ‘नखरेल’...!!
मेधाकाकू : अरे व्वा... अवंती, ही नावे फारच सुरेख आणि त्याच्या मागची भूमिका सुद्धा खूप आवडली मला. आपल्या अभ्यासाचा झालेला असा परिणाम पाहून मला खूप अभिमान वाटतोय तुझा. त्या कंदिलांना नाव द्यायची कल्पनाच मला त्यादिवशी आवडली होती. आता त्याचे अंतिम स्वरूप सुद्धा एकदम पसंत. आता तू एक छान दिशा दिलीस आजच्या अभ्यासाला. असे बघ की या म्हणी आणि वाकप्रचार फक्त मनुष्य स्वभाव आणि समाजमनाचा वेध घेऊन थांबत नाहीत. घराघरातल्या वापरातील या वस्तूच, त्यापुढे जाऊन संपूर्ण कुटुंबाच्या सवयी किंवा कुटुंबाची आर्थिक व्यवहाराची पद्धत यावर सुद्धा सहज टिप्पणी करतात. मात्र याच्या सूक्ष्म अर्थाचा अभ्यास करताना यात वापरलेल्या रूपके-दृष्टांताचा अभ्यास, थोडासा खोलांत जाऊन करावा लागतो...!
चुलीमध्ये मांजरे व्याली आहेत
मेधाकाकू : अवंती, आजचा हा अभ्यास दोन इयत्ता पुढचा धडा आहे असे समजायला हरकत नाहीये. हा वाकप्रचार म्हणजे ‘व्याजोक्ती’ या मराठी अर्थालंकाराचे सर्वोत्तम उदाहरण आहे. व्याज+उक्ती = खोटे बोलणे. एखादी घटना किंवा परिस्थितीचे खरे कारण लपवून दुसरेच काही सांगणे, थोडक्यात खोटे बोलणे असा या ‘व्याजोक्ती’ अलंकाराच्या वापरातील भावार्थ. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी खालावली आहे की घरांत चूल सुद्धा पेटत नाहीये, अन्नाची भ्रांत आहे. तरीही खोट्या आवेशाने घरमालक सांगतोय, अहो चूल पेटली नाही त्याला कारण आहे. चुलीमध्ये मांजर व्याली आहे.
अवंती : अरेच्या, मेधाकाकू हे एकदम चाबूक आहे की. नुसता वाकप्रचार वाचून काहीच उलगडा होणार नाही. पण मग, याचा अर्थ ऐकणाऱ्याला कसा समजत असेल...? मला हाच प्रश्न पडलाय...!
मेधाकाकू : अगदी योग्य प्रश्न विचारलास, अवंती, असे बघ, मागच्या एका अभ्यासात आपण collective uncontious अशा विषयावर बोललो होतो. म्हणजे साधारणपणे मराठीत याचा अर्थ होतो ‘सामुहिक अबोध’. जगातील प्रत्येक संस्कृतीतील, तत्कालिन प्रचलित भाषेतील गद्य आणि पद्य पारंपारिक रचना-साहित्यकृती, एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे मौखिक परंपरेने पोहोचत राहिल्या. या रचना आणि साहित्यकृतीशी, प्रत्यक्ष न वाचताही अशा मौखिक माध्यमातून परिचित झालेले श्रोते, या संदर्भात मानसशास्त्रज्ञ जॅक लाकाँ याने collective uncontious संबोधनाचा वापर केला. आज आपण ह्या म्हणी-वाकप्रचार आपल्या बोलण्यात नियमितपणे वापरत नाही. ज्या काळात ते वापरले जायचे त्या काळात श्रोत्याला त्याचा अर्थ सहज प्रवृत्तींनी माहित असायचा. हेच या मानसशास्त्रज्ञ जॅक लाकाँच्या सिद्धांताचे महत्व.
ठेवता मोठी चूल घरी, पिशवी लहान करी
मेधाकाकू : पुन्हा एक फार अर्थवाही वाकप्रचार. ‘पर्यायोक्ती’ अर्थालंकाराचे उत्तम उदाहरण. एखादी गोष्ट आडवळणाने सांगताना या अर्थालंकाराचा वापर केला जातो. एखाद्या कुटुंबाला फार सामिष-चमचमित मसालेदार किंवा गोडाचे जेवण रोज हवे असते. वाकप्रचाराच्या पहिल्या अर्ध्या भागात ‘ठेवता मोठी चूल घरी’ हे वाक्य याच अर्थाने आले आहे. त्यासाठी किमती पदार्थ-वस्तूंची खरेदी करताना पैशाची उधळपट्टी केली जाते. कालांतराने लक्षात येते कि अशा खर्चीक वृत्तीमुळे खिशातले पैसे संपत आले आहेत आणि आता सध्या भाजी खरेदीला सुद्धा पैशाची अडचण आहे. ‘पिशवी लहान करी’ या पुढच्या अर्ध्या वाक्यात आडवळणाने हेच सांगितले असावे... पैशाची पिशवी लहान करी.
अवंती : ‘सामुहिक अबोध’ म्हणजे प्रत्येकाला माहित्ये पण काय माहित्ये ते दुसऱ्याला माहित नाही. असा घ्यायचा का मेधाकाकू ?
मेधाकाकू : अगदी तसाच अर्थ नाही. मात्र ‘प्रत्येकाला माहित्ये, मात्र प्रत्येकाचे आकलन वेगळे आहे’ असा अर्थ आपण घ्यायला हवा.
डाव असता हात भाजू नये
मेधाकाकू : हा वाकप्रचार सुद्धा ‘स्वभावोक्ती’ अलंकाराने सजलेला आहे. ‘डाव’ म्हणजे स्वयंपाक करताना वरण-डाळ-कढी करताना वापरायची वस्तू. या डावेचे काम, काही सुरक्षित अंतरावरून स्वयंपाक करणे. हा सल्ला अगदी सहजी आहे की स्वयंपाक करताना हातात डाव असेल तर गृहिणीचा हात भाजणार नाही. मात्र ‘डाव’ या वस्तूचे रूपक वापरून वेगळाच काही सल्ला हा वाकप्रचार देतोय. संसार कसा करायचा याचे मार्गदर्शन घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींकडून मिळत असतेच. ते नेमके आचरणात आणावे आणि मर्यादा जाणून घ्याव्या, मग योग्य मार्गाने गेल्याने वास्तवाचे चटके बसणार नाहीत, वरण-डाळ करताना हात भाजणार नाही.
अवंती : आता या अफलातून मराठी लोकसाहित्याला काय संबोधन वापरावे तेच समजत नाहीये. हे सगळं चक्राऊन टाकणारे आहे आणि तुझ्यामुळेच याचा अनुभव मला मिळतो आहे.
- अरुण फडके