बॅनरबाजीला लगाम !  

    25-Oct-2017   
Total Views |


 

नेत्यांचा, पक्षातील छोट्या-मोठ्या पदाची धुरा सांभाळणाऱ्यांचा वाढदिवस असो किंवा विरोधी पक्षांवर टीका-टीप्पणी करण्यासाठी बॅनर्स - होर्डिंग्जच्या माध्यमातून ‘राजकारण’ रंगवण्यात राजकीय पक्ष धन्यता मानतात. आजच्या सोशल मीडियाच्या युगातही राजकीय पक्षाचे बॅनर्स, होर्डिंग्जवरची ‘माया’ काही कमी झालेली नाही. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर इतरही राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून बॅनर्स, होर्डिंग्ज लावण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. पण, आता या बॅनरबाजीमुळे होणारे शहराचे विद्रूपीकरण थांबविण्यासाठी देशभरात ठोस कारवाई करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्या तुलनेने महाराष्ट्र मात्र अजूनही मागे राहिलेला दिसतो. अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्सवर लगाम कसण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाने, “बॅनर्स, पोस्टरवर जिवंत व्यक्तींचे फोटो वापरू नये,’’ असे आदेश दिले आहेत. चेन्नई महानगरपालिकेच्या आवारात लावण्यात येणाऱ्या अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्समुळे शहराच्या सौंदर्यामध्ये बाधा येत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या बॅनर्सवर जिवंत व्यक्तीचे फोटो झळकतील ते बॅनर्स ‘अनधिकृत’ असल्याचे ठरविण्यात येणार आहे. या नव्या निर्णयामुळे बॅनर्स, होर्डिंग्जच्या संख्येवर नियंत्रण येण्याबरोबरच अनधिकृत बॅनर लावण्याचे प्रमाणही आपसुकच कमी होणार आहे. त्यामुळे आता चेन्नईमध्ये होर्डिंगबाजी कमी होईल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा, एखाद्या पदावर नियुक्ती झाल्याच्या शुभेच्छा, तर कधी आपल्या कामांचा पाढा वाचून दाखविण्यासाठी राजकारण्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी, होर्डिंग्ज व पोस्टर्सना प्रथम पसंती असते. आपले नाव, आपल्या पक्षाचे नाव, नेत्यांची - कार्यकर्त्यांची नाव सतत या ना त्या कारणावरून चर्चेत राहायला पाहिजे, हा त्यामागचा मूळ हेतू असतो. रस्त्यावर, बस, लोकल, सार्वजनिक ठिकाणी लहान-मोठे होर्डिंग्ज, बॅनर्स नजरेस पडतात. भररस्त्यात बेशिस्त पद्धतीने लावण्यात आलेल्या या बॅनर्समुळे काही छोट्या अपघाताच्या घटनाही झाल्या आहेत, पण तरीदेखील आपला चेहरा मतदार राजाला सतत दिसावा, या अट्टाहासापायी हे बॅनर्स लावले जातात. राजकीय पक्षांच्या या बॅनरबाजीत सगळेच पक्ष अगदी आघाडीवर. एकूणच काय तर, राजकीय पक्ष कुठलाही असला तरी बॅनरबाजी ही प्रत्येकाला प्रिय आहे, हे यातून सिद्ध होते.

 

ऑनलाईन सावधगिरी

आजच्या सोशल मीडियाच्या युगात वावरणाऱ्यांना इंटरनेटमुळे सगळ्या गोष्टी सुखकारक, साध्या-सोप्प्या झाल्या आहेत, असा तुमचा भ्रम असेल तर त्यातून बाहेर या. कारण, ही ऑनलाईनची प्रक्रिया जितकी सेवा-सुविधा देणारी असली तरी तितकीच ती घातकदेखील ठरू लागली आहे. सायबर धमक्या देण्याच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे, मुंबईत सायबर धमक्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. हिंसाचाराच्या सर्वाधिक धमक्या किंवा सायबर धमक्यांना बळी पडणारे पीडित मुंबईत ५१ टक्के, दिल्लीत ४७ टक्के, तर हैदराबादमध्ये हेच प्रमाण ४६ टक्के असल्याचे नोंदविले आहे. सिमेंटेकच्या ‘नॉर्टन’ने केलेल्या एका सर्व्हेच्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. सायबर धमक्यांमधून केला जाणारा व्यक्तींचा लैंगिक छळ ही चिंताजनक बाब बनत चालली आहे. पुरुषांपेक्षा महिलांना हा अनुभव अधिक येतो. सोशल मीडियावर अश्लिल शेरेबाजी आणि संदेश पाठवणे, तसेच अस्वस्थ करणारे ईमेल पाठविणे, या तक्रारींच्या प्रमाणामध्ये अलीकडच्या काळात वाढ होत आहे. नको असलेली भांडणे, चारित्र्यहनन, लैंगिक छळाची किंवा शारीरिक हिंसाचाराची सायबर धमकी, तसेच या अनुभवांचे परिणामआदींबाबत देशातील स्थिती समजून घेणे हे ‘नॉर्टन’च्या अभ्यासाचे लक्ष्य आहे. ऑनलाईन छळाच्या घटना अनुभवणारा चाळिशीखालील वयोगट जास्त आहे. या वयोगटातील ६५ टक्के व्यक्तींनी ऑनलाईन अपशब्द आणि अपमानास्पद मजकूर अनुभवला आहे. तसेच, ८७ टक्के अपंग किंवा मानसिक अस्वास्थ्य असणारे आणि ७७ टक्के लठ्ठपणाची समस्या असणारे लोक हेही ऑनलाईन छळाला बळी पडले आहेत. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना काही गोष्टींची खबरदारी घेणे तितकेच गरजेचे आहे. सोशल मीडियावर सक्रीय असताना विशेषतः अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना त्या व्यक्तींच्या वैयक्तिक माहितीची खातरजमा करणे गरजेचे आहे. परंतु, तसे होत नसल्यामुळे फसवणूक केली जाते. तसेच ऑनलाईन छळाशी लढा देण्यासाठी ‘नॉर्टन’ने सुचविल्याप्रमाणे तुमची सुरक्षा आणि व्यक्तिगत सेटिंग तपासून पाहाणे, नियमितपणे पासवर्ड बदलणे, तसेच ऑनलाईन व्यवहार करताना सोशल मीडिया हाताळताना शंका असल्यास त्वरित विश्वासातल्या व्यक्तीची मदत घेतली पाहिजे. त्यामुळे असे कोणतेही संदेश, छायाचित्र किंवा चित्रफित कॉपी करून फसवणुकीचे सर्व पुरावे तक्रार दाखल करतेवेळी जवळ हवे. त्यामुळे ऑनलाईन सावधगिरी ही महत्त्वाची!

 

- सोनाली रासकर

सोनाली रासकर

समाजशास्त्र, इतिहास घेऊन बी.ए. पत्रकारिता व मास कम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा केला आहे. फिचर स्टोरी, तसेच  सामाजिक विषयावरील लिखाणाची आवड, गुन्हेगारीशी संबंधित मालिका बघण्यामध्ये रस. सध्या दै. ’मुंबई तरूणभारत’मध्ये उपसंपादक या पदावर कार्यरत.