सेल्फी... म्हणजे काय? फ्रंट कॅमेरा ऑन करुन आपला स्वत:चा फोटो घेणं. हो ना? पण या लघुपटात सेल्फीचा खूप वेगळा अर्थ मांडला आहे. स्वत:वर प्रेम करणं, स्वत:चं स्वत:ला आवडणं किती महत्वाचं असतं नाही? असाच काहीसा संदेश या लघुपटाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
एक सामान्य माणून लोकलने प्रवास करत असतो, खचाखच भरलेल्या लोकलमध्ये मोबाइल खिशात ठेवताना चुकुन त्याचा धक्का समोरच्या माणसाला लागतो, आणि तो त्याला काहीबाही बोलतो. त्याच्या आविर्भावावरुन लक्षात येतं, की त्यानं या सामान्य माणसाला चोर समजलं आहे. त्याला वाईट वाटतं. पुणे तो टॅक्सीपाशी उभा असताना एक मुलगी त्याला टॅक्सीवाला समजते. आणि त्याला चक्क "भैय्या बँड्रा चलोगे?" असं विचारते. आपल्या दिसण्यामुळे तर लोक आपल्याला असं समजत नाही ना? असा प्रश्न त्या सामान्य माणसाच्या मनात चमकतो, आणि तो विचार करत राहतो. पुढे असे अजूनही एक दोन किस्से घडतात. त्याला स्वत:मध्येच काहीतरी कमी असल्याचं भासतं. मात्र पहिल्या दिवशी त्याच्या सोबत घडलेली घटना लोकलमध्ये आणखी एका मुलासोबत घडते. मात्र त्या मुलाचा दृष्टीकोन या सामान्य माणसाची दृष्टीच बदलतो. असं काय म्हणतो तो मुलगा? जाणून घेण्यासाठी नक्की बघा हा लघुपट.
रामचंद्र गावकर यांचा सेल्फी हा लघुपट खरच खूप वेगळा आहे, आणि एक चांगला संदेश देणारा आहे. या लघुपटाला यूट्यूबवर २१ लाख व्ह्यूज आहेत. एकदा तरी नक्कीच बघावा असा हा लघुपट आहे.
- निहारिका पोळ