हिंदू उपासना पद्धतीमध्ये मूर्तीपूजेचे स्थान अनन्य साधारण आहे. मूर्ती हे ईश्वरोपासनेचे साधन आहे. केवळ कलेसाठी कला म्हणून प्राचीन भारतात कधीच शिल्पकलेकडे बघितले गेले नाही. देवांच्या मूर्ती व शिल्पे घडवताना शिल्पकारांना फार कठीण नियमांनी स्वतःला बांधून घ्यावे लागत असे. धर्मतत्वज्ञानाचा भक्कम पाया, शिल्पकारांची तपःपूत मेहनत आणि मूर्ती घडविण्याच्या काळातली त्यांची आचार-विचारातली शुद्धता ह्या सगळ्या गोष्टींचा संगम झाल्यामुळेच भारतीय मंदिरातली शिल्पे आज हजारो वर्षे उलटून गेली तरी दर्शकांच्या मनाचा ठाव घेतात. हजार वर्षांपूर्वी कुणा अनामिक शिल्पकाराने घडवलेली मूर्ती आपल्याला आजही तितकीच पवित्र वाटते कारण त्या मूर्तीमधल्या सगुण साकार झालेल्या बाह्य सौंदर्याबरोबरच आपले हिंदू मन त्यातल्या निर्गुण, निराकार ईश्वरत्त्वाचा आपल्याही नकळत वेध घेत असते. म्हणूनच काळाचे घाव, इस्लामी आक्रमकांचे तडाखे आणि शेकडो वर्षांची अनास्था सोसून देखील भारतीय मंदिरशिल्पे आजही आपल्याला भारून टाकतात.
तामिळनाडू मधले कांचीपुरम हे शहर फार प्राचीन काळापासून तिथल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. साक्षात महाकवी कालिदासाने कांचीचे वर्णन करताना 'नगरेषु कांची' असे गौरवोद्गार काढले आहेत. इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या सुरूवातीला शिवस्कंदवर्मा या पल्लव राजाने आजच्या तामिळनाडूतल्या काही भूभागात स्वतःचे राज्य स्थापन केले. पुढे त्याचा वंशज महेंद्रवर्मन पहिला ह्या राजाने राज्यविस्तार केला. सहाव्या शतकात पल्लव साम्राज्य चांगलेच भरभराटीला आले होते. पल्लव राजा नरसिंहवर्मन दुसरा ह्याने महाबलीपूरम आणि कांचीपुरम येथे अनेक भव्य मंदिरांचे निर्माण केले. पल्लव राजे शिवभक्त होते. ह्याच राजघराण्यात नरसिंहवर्मन दुसरा नावाचा मोठा कर्तबगार राजा होऊन गेला. त्याने त्या काळात चीनला आपला राजदूत पाठवला होता. दंडी हा संस्कृत कवी त्याचा राजकवी होता. ह्याच राजसिंह नरसिंहवर्मनने आठव्या शतकात वालुकाश्मात बांधवून घेतलेले कैलासनाथाचे मंदिर हे कांचीपुरम मधले आज अस्तित्वात असलेले सगळ्यात जुने मंदिर आहे. द्रविड मंदिर स्थापत्याचा परिपूर्ण अविष्कार म्हणून हे मंदिर ओळखले जाते. ह्याच मंदिरापासून स्फूर्ती घेऊन वेरूळमधले एकपाषाणी महाकाय कैलास मंदिर पुढे राष्ट्रकूटांनी कोरले.
कैलासनाथाचे हे मंदिर मुख्य गावापासून थोडेसे दूर असल्यामुळे तिथे कमी लोक जातात. पण सकाळच्या किंवा संध्याकाळच्या उन्हात हे मंदिर बघणे हा एक विलक्षण सौंदर्यानुभव आहे. ह्या मंदिराच्या दर्शनी भिंतीवर आणि प्राकारातल्या दर्शनिकेमध्ये शिल्पपट्टांची नुसती रेलचेल आहे. आगम ग्रंथांमधून आखून दिलेल्या आयामांनुसार श्री शिव शंकरांचे विविध अवतार आणि त्यांच्या लीला ह्या मंदिरात शिल्पपट्टांद्वारे अंकित केलेल्या आहेत. आज आपण जे शिल्प बघणार आहोत ते आहे किरातार्जुनांचे. किरातार्जुन युद्धाची ही मूळ कथा महाभारतातल्या वनपर्वात एका छोट्या आख्यानाद्वारे आलेली आहे. साधारण सातव्या शतकात दक्षिण भारतात महाकवी भारविने ह्या कथेवर त्याचे किरातार्जुनीयम हे महाकाव्य रचले. हे महाकाव्य संस्कृत साहित्यातल्या बृहत्त्रयी म्हणजे तीन महाकाव्यांचा भाग मानले जाते. ह्याच काव्यावर हा शिल्पपट्ट आधारित आहे.
शकुनीबरोबर द्यूत खेळून राज्य हरल्यावर पांडव आणि द्रौपदी १३ वर्षांच्या वनवासाला निघून जातात. तिकडे दुर्योधन युद्धाची तयारी करत असतो. ही बातमी घेऊन महर्षी व्यास द्वैतवनात येतात व अर्जुनाला सल्ला देतात की युद्ध अटळ आहे, त्यामुळे त्याने वनवासकाळाचा फायदा घेऊन शस्त्रात्रांची जमवाजमव करावी. युधिष्ठिर, इतर भाऊ आणि द्रौपदी ह्यांना द्वैतवनात सोडून अर्जुन हिमालयात जातो आणि त्यांच्या वडिलांची म्हणजे इंद्राची आराधना करतो. इंद्र त्याला सांगतो की अर्जुनाला जी अमोघ शक्ती हवी आहे ती त्याला केवळ श्री शिवशंकरच देऊ शकतील. अर्जुन त्याप्रमाणॆ घोर तपःश्चर्येला आरंभ करतो, पण त्याचे धनुष्य त्याच्या पाठीला असते. त्याच्या तपाने श्री शंकर प्रसन्न होतात पण अर्जुनाची परीक्षा घ्यायला म्हणून ते किरात शिकाऱ्याच्या वेषात अर्जुनाकडे येतात. तेव्हढ्यात मूक नावाचा एक राक्षस रानडुकराचे स्वरूप घेऊन अर्जुनावर मुसंडी मारतो. अर्जुन आणि किराताच्या वेशातले शिवशंकर एकदमच त्या रानडुकरावर बाण चालवतात. दोघांचेही बाण एकाच क्षणी रानडुकराच्या देहात घुसतात. अर्जुन आपली शिकार घ्यायला म्हणून रानडुकराकडे येतो पण शंकर त्याला अडवतात. दोघांचेही तुंबळ युद्ध होते. पण अर्जुन हरतो आणि त्याला समजते की हा किरात साधा शिकारी नाही. तो आपले धनुष्य त्या किराताच्या पायाशी ठेऊन हात जोडून उभा राहतो. शंकर प्रसन्न होऊन त्याला पाशुपतास्त्र देतात.
ह्या शिल्पपट्टात किराताच्या वेशातले शिव आणि तपस्वी अर्जुन ह्यांच्यामध्ये जुंपलेले युद्ध दाखवलेले आहे. चार पल्लव सिंहांनी वेढलेल्या मंडपात हा शिल्पपट्ट कोरलेला आहे. शिल्पाच्या उजव्या कोपऱ्यात खाली रानडुक्कर दाखवलेला आहे. शिल्पपट्टात दाखवलेले दोन्ही वीर एकाच उंचीचे आणि बांध्याचे आहेत, दोघांचीही देहबोली तितकीच आक्रमक आहे त्यामुळे किरातवेषातले शंकर कुठले आणि अर्जुन कुठला हे सहजासहजी समजत नाही. शंकरांची लक्षणे म्हणजे तिसरा डोळा, त्रिशूल वगैरे इथे अर्थातच दिसत नाही. पण उजवीकडच्या वीराने यज्ञोपवित घातलेले आहे. त्याच्या डोक्यावर राजमुकुट आहे आणि त्याचा हात धनुष्यावर आहे त्यामुळे तो अर्जुन असावा असे मूर्तिशास्त्राच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. शंकर किरातवेषात आहेत त्यामुळे त्यांच्या अंगावर यज्ञोपवित नाही आणि डोक्यावर मुकुटही नाही. पण त्यांच्या दोन्ही कानातली कुंडले वेगवेगळी आहेत, त्यावरून कयास बांधता येतो की हे शंकर आहेत. हा शिल्पकाराच्या प्रतिभेचा खेळ आहे. त्या अनाम शिल्पकाराने घातलेले हे कोडे आज इतक्या वर्षांनंतरही आपल्याला सोडवताना त्रासच होतो, हीच भारतीय शिल्पांची महानता आहे.
- शेफाली वैद्य