हिंदू उपासनापद्धतीमध्ये त्रिमूर्तींची कल्पना आहे. सृष्टीच्या तीन अवस्था आपण मानतो, निर्माण, पालन आणि संहार, म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय. ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करतात तर श्रीविष्णू सृष्टीचे पालन करतात आणि शिवशंकर सृष्टीचा संहार करतात असे आपण मानतो. मूर्तिशास्त्राचे अभ्यासक गो. बं. देगलूरकर ह्यांनी आपल्या विष्णुमूर्ते नमस्तुभ्यम ह्या पुस्तकात विष्णू ह्या नावाची उत्पत्ती सांगताना असं म्हटलं आहे की जो चराचर भूतांच्या ठिकाणी प्रविष्ट असतो तो श्रीविष्णू. पार ऋग्वेदापासून आपल्याला श्रीविष्णूचे उल्लेख आढळतात पण श्रीविष्णूच्या प्रतिमा आपल्याला मिळतात त्या कुषाणकाळापासूनच्या. श्रीविष्णूंच्या आसन म्हणजे बसलेल्या, स्थानक म्हणजे उभ्या असलेल्या आणि शयन म्हणजे झोपलेल्या अश्या तिन्ही प्रकारच्या मूर्ती आपल्याला भारतीय मूर्तिकलेत बघायला मिळतात.
भारतात गुप्तकाळात श्रीविष्णूंच्या प्रतिमांचे मोठ्या प्रमाणावर अंकन झाले. इसवीसनाच्या चौथ्या शतकात उत्तर भारतात गुप्त साम्राज्याची स्थापना झाली. गंगा आणि यमुना यांच्या खोऱ्यांमधला प्रदेश गुप्त सम्राटांनी आपल्या अधिपत्याखाली आणला. गुप्त काळ हा भारताचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. सुमारे तीनशे वर्षांचा गुप्त राजवटीचा कालखंड हा संगीत, साहित्य, स्थापत्य इत्यादी भारतीय अभिजात कलांच्या भरभराटीचा काळ मानला जातो. ह्याच काळात मूर्तिशास्त्राविषयी वेगळा विचार केला गेला आणि वेगवेगळ्या ग्रंथांमधून मंदिरस्थापत्य आणि मूर्तिशास्त्र ह्या विषयावर विपुल लिखाण केले गेले. गुप्त राजांनी शिल्पकलेला उदार हस्ते आश्रय दिला आणि कलाकारांचा सन्मान केला. त्यामुळे ह्याकाळात अत्यंत सुरेख मूर्ती घडवल्या गेल्या. मध्यप्रदेश मधल्या सांची जवळच्या उदयगिरी गुंफामधल्या मूर्ती पाहिल्या म्हणजे गुप्तकाळातल्या त्या अनामिक शिल्पकारांच्या प्रतिभेचा आवाका आणि त्यांची कल्पनाशक्ती आजही आपले डोळे दिपवून टाकते.
उदयगिरीच्या ह्या गुंफा चंद्रगुप्त दुसरा आणि समुद्रगुप्त पहिला ह्यांच्या काळात म्हणजे इसवीसनाच्या चौथ्या-पाचव्या शतकात कोरल्या गेल्या. आज ह्या गुंफा फार दुर्लक्षित अवस्थेत आहेत, पण त्या काळात ह्या गुंफा बघायला येणाऱ्या लोकांच्या चेहेऱ्यावरचे भाव कसे असतील त्याची आपण आजही कल्पना करू शकतो. उदयगिरीची भव्य नृवराहमूर्ती आपण आधीच पाहिलेली आहे. आज आपण बघणार आहोत ती उदयगिरीच्या गुंफा क्रमांक तेरा मधली शेषशायी श्रीविष्णूची मूर्ती. सामान्यतः देव-देवतांच्या उभ्या किंवा बसलेल्या प्रतिमा आपल्याला दिसतात. पण निद्रिस्त अवस्थेतल्या मूर्ती मात्र फक्त श्रीविष्णूच्याच दिसतात. शेषनागावर झोपलेल्या श्रीविष्णूची प्रतिमा अनंतशयनी किंवा शेषशायी ह्या नावाने ओळखली जाते.
उदयगिरीच्या गुंफांमधली ही प्रतिमा आपल्या भव्यतेने आपले लक्ष वेधून घेते. चतुर्भुज श्रीविष्णू शेषनागाच्या आभोगावर म्हणजे वेटोळ्यांवर उजवा हात उशाशी घेऊन पहुडले आहेत. शेषनाग एकार्णवामध्ये म्हणजे क्षीरसागरात डोलतोय आणि श्रीविष्णू योगनिद्रेत आहेत. त्यांच्या अंगावर अगदी मोजकेच अलंकार आहेत. डोक्यावर उंच शंकूसारखा मुगुट आहे, आणि गुडघ्यापर्यंत येणारी जाड वनमाला म्हणजेच वैजयंती त्यांच्या छातीवर रुळते आहे. गुप्तकाळातल्या ह्या प्रतिमेचे वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीजवळ किंवा मूर्तीच्या हातात कसलेच आयुध नाही. पाय चुरणारी लक्ष्मीही दिसत नाही. नंतरच्या काळात दिसणारे विष्णूच्या नाभितून उगवलेले वज्रदंड कमळ आणि त्यावर विराजमान ब्रह्मदेवही ह्या प्रतिमेत दिसत नाही. एका आडव्या प्रचंड दगडाच्या खोबणीत ही मूर्ती कोरलेली आहे. ह्या मूर्तीच्या पायाशी गुढघ्यांवर बसलेला, हात जोडलेला एक भक्त कोरलेला आहे. काही इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की स्वतःला परमभागवत म्हणवून घेणाऱ्या सम्राट चंद्रगुप्त दुसरा ह्याचीच ही मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे भिंतीवर कमळ कोरलेले आहे. मागे ब्रह्मा, स्कंद वगैरे इतर देवताही कोरलेल्या आहेत. श्रीविष्णूंच्या शयनमूर्तीला उत्तर भारतात नारायण म्हणून ओळखतात तर दक्षिण भारतात श्रीरंगनाथ असे ह्या प्रकारच्या मूर्तीचे नाव आहे. गुप्तकाळात शेष नागाची वेटोळी उभ्या स्प्रिंगसारखी असायची. पुढे ती आडवी झाली, हाही कलाप्रवास समजून घेण्यासारखा आहे.
सध्या एएसआयने एक अत्यंत कुरूप असा जाळीचा दरवाजा लावून हा शिल्पपट्ट झाकून टाकलेला आहे. त्यामुळे मूर्तीचे सर्वांगाने दर्शन होत नाही, पण जे दिसते तेही स्तिमित करणारे आहे. ही मूर्ती बघायला आपल्याला एका अरुंद घळीतून वर चढावे लागते. त्या घळीत खाली समुद्राच्या लाटा कोरलेल्या आहेत. पाणी जायला एक भोक केलेले आहे तेही स्पष्टपणे दिसते आहे. माझ्या गाईडच्या म्हणण्याप्रमाणे गुप्तकाळात ह्या घळीतून पाणी सोडत असावेत आणि त्या पाण्यातून चालत जात ही शेषशायी विष्णूची प्रतिमा बघताना खरोखरच आपण क्षीरसागरातून श्रीविष्णूंच्या दर्शनाला चाललोय अशीच अनुभूती भक्तांना येत असावी. ही निद्रिस्त श्रीविष्णूंची मूर्ती बघताना त्या काळाच्या कलाकारांची, शिल्पकारांची अफाट कल्पनाशक्ती बघून आपण खरोखरच चकित होतो. भोपाळहून मुद्दाम वेळ काढून ह्या उदयगिरीच्या गुंफा जरूर बघाव्यात. एका दिवसात आपल्याला सांची, विदिशा आणि उदयगिरी ह्या तिन्ही ठिकाणांना भेट देता येते.
शेफाली वैद्य