‘हॉटमेल’चा भारतीय वंशाचा जनक
Total Views | 2
आज ईमेल हा अनेकांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग झाला आहे. आज जीमेल सारखी ईमेल सेवा सर्वांच्याच परिचयाची आहे. मात्र एक असा काळ होता जेव्हा ईमेल सेवा देणार्या कंपन्यांमध्ये ’हॉटमेल’ हे नाव आवर्जून घेतले जायचे. आज परिस्थिती वेगळी असली तरी एक काळ ‘हॉटमेल’ने गाजवला होता. याच ‘हॉटमेल’चा सहसंस्थापक एक अमेरिकी भारतीय असल्याची कल्पना आजही अनेकांना नाही. ती व्यक्ती म्हणजे सबीर भाटिया.
सबीर भाटिया मूळचे पंजाबचे. त्यांचा जन्म चंदीगडमधील एका पंजाबी कुटुंबातला. त्यांचे वडील बलदेव भाटिया हे सैन्यात अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते संरक्षण मंत्रालयात रुजू झाले. सबीर यांचे शालेय शिक्षण बंगळुरूमधील सेंट जोसेफ शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये घेतले. त्यानंतर त्यांनी आपले पुढील शिक्षण स्टॅनफोर्ड विद्यापीठात घेतले. स्टॅनफोर्ड विद्यापीठात त्यांनी वीएलएसआय डिझाईनवर देखील काम केले. या ठिकाणी काम करत असताना त्यांनी स्टीव्ह जॉब्स आणि स्कॉट मॅकनेलीसारख्या उद्योजकांकडून प्रेरित होऊन उद्योजक बनण्याचा मनाशी निश्चय केला. मात्र, तेव्हाच त्यांनी पीएचडीचे शिक्षण घेण्याऐवजी ‘ऍपल’ या कंपनीत रुजू होण्याचा निर्णय घेतला. सबीर भाटिया यांनी ‘फायरपॉवर सिस्टिम्स’ या कंपनीपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. लगेचच दोन वर्षांनंतर त्यांनी १९९४ साली इंटरनेट क्षेत्रात काही वेगळे करण्याच्या दृष्टीने काम करण्यास सुरुवात केली आणि त्यावेळी त्यांना साथ लाभली ती म्हणजे त्यांचे जुने सहकारी जॅक स्मिथ यांची. त्या दोघांनी ‘जावा सॉफ्ट वेब’ आधारित डेटाबेसची एक संकल्पना समोर आणली. मात्र, त्यानंतर वेबवर आधारित एक ईमेल सिस्टिम तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून पुढे ‘हॉटमेल’चा जन्म झाला.
प्रथम त्यांनी सर्वांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोफत ईमेल सेवा देण्यास सुरुवात केली आणि त्यासाठी लागणारा महसूल जाहिरातींच्या माध्यमातून मिळविण्यास सुरुवात केली. ड्रेपर फिशर वेंचर्सने यामध्ये तीन लाख डॉलर्सची गुंतवणूक केली. सहा महिन्यांमध्येच ‘हॉटमेल’ने दहा लाख नेटकर्यांना आपल्याकडे आकर्षित केले. वाढती लोकप्रियता पाहून ३० डिसेंबर १९९७ साली मायक्रोसॉफ्टने ४०० दशलक्ष डॉलर्समध्ये ‘हॉटमेल’ खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
‘हॉटमेल’ची विक्री केल्यानंतर एक वर्ष भाटिया त्यात कार्यरत होते. त्यानंतर भाटिया यांनी मायक्रोसॉफ्ट सोडण्याचा निर्णय घेतला आणि आपली नवी वेबसाईट ’आरजू इंक’ सुरू केली. ती वेबसाईट मात्र फार काळ चालू शकली नाही. २०१० साली याच वेबसाईटला त्यांनी ट्रॅव्हल पोर्टलचे रूप दिले आणि ती पुन्हा सुरू केली. २००६ साली भाटिया यांनी नेटवर्क सुरक्षा प्रदाता आणि एसएसएल वीपीएन-प्लसचे निर्माता निअएक्सेलच्या एंजलमध्ये गुंतवणूक केली तर २००७ साली त्यांनी मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे ‘लाईव्ह डॉक्युमेंट’ नावाचा ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून दिला, तर भारतात केबल टीव्हीच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरविण्याच्या दृष्टीनेदेखील त्यांनी जागृती करण्याचे अनेक प्रयत्न केले. २००८ साली त्यांनी टेलिकॉन्फरन्सिंगसाठी ’सबसे बोलो’ या इंटरनेटवर आधारित टेलिकॉन्फरन्सिंग वेबसाईटची सुरुवात देखील केली. उद्योग क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त त्यांना जगातील प्रमुख शंभर ट्रेंडसेटरच्या यादीतदेखील स्थान देण्यात आले आहे. अशा या अवलियाच्या कर्तृत्वाला एक सलाम !
https://www.mahamtb.com/authors/jaideep_dabholkar.html
बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.