नरकचतुर्दशीची पहाट! अभ्यंग स्नान, सुगंधी उटणे, सुवासिक तेल व सूर्योदयाच्या आधी अंघोळ करून स्वर्गाचे आरक्षण मिळवायचे! आणि जो सूर्योदयाच्या आधी अंघोळ करणार नाही, त्याचे नरकाचे आरक्षण नक्की! या समजुती मागे आहे नरकासुराची गोष्ट.
नरकासुराच्या वधाची कथा येते महाभारतातील खिलपर्वात, हरिवंशमध्ये. ही कथा आहे काही अबलांची आणि एका सबलेची.
एकदा काय झाले ? प्राकज्योतीषपूर येथे नरकासुर नावाचा दैत्य राज्य करत होता. कधी त्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वर मागितला की, “मला कधीच मृत्यू येऊ नये!”. ब्रह्माने असा वर देता येत नाही, दुसरे काही माग असे सांगितले. तेंव्हा त्याने, “मला स्त्रीकडून युद्धात मृत्यू यावा!” असा वर मागितला. त्याला वाटायचं, अशी शक्तिवान स्त्री कुठे असूच शकत नाही, अर्थात तो कधीच मरणार नाही!
आपण अमर आहोत, या भ्रमात तो मोठ्या प्रौढीने जनतेला पीडा देण्यात धन्यता मनात असे. त्याने उन्मत्तपणे अनेक देशांतील राजकन्यांना पळवून आणले. मानव कन्या, देव कन्या आणि गंधर्व कन्या, अशा सोळा हजार एकशे कन्यांना त्याने अलकानगरीतील मणिपर्वतावर बंदी करून ठेवले होते.
नरकासुराचा मृत्यू स्त्रीच्या हातून आहे हे जाणून, काही सज्जन लोकांनी सत्यभामेकडे मदतीची याचना केली. सत्यभामेने जनतेला नरकासुराच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी, त्याच्यावर हल्ला करायचे ठरवले. त्यावर कृष्ण व सत्यभामा, सैन्य घेऊन लढाईसाठी निघाले. नरकासुराच्या विरुद्ध ही लढाई अनेक दिवस चालली. या लढाईत कृष्णाने नरकासुराच्या मुरा नावाच्या बलाढ्य सेनापतीला मारले, म्हणून कृष्णाला “मुरारी” हे नाव मिळाले. शेवटी कृष्ण आणि सत्यभामेने नरकासुराला मारले! मृत्यू समीप आल्यावर नरकासुराला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्याने मरतांना विनवणी केली की, “माझी कीर्ती उरावी असे मी काही केले नाही. परंतु, लोकांनी माझी यासाठी आठवण ठेवावी, की आपण अमर आहोत असे समजून वागू नये. तर मृत्यूचे स्मरण ठेवून, नरकात जावे लागेल असे कर्म करू नये!” तेंव्हा कृष्णाने त्याला वर दिला की आजचा दिवस तुझ्या नावाने “नरकचतुर्दशी” म्हणून ओळखला जाईल आणि जो तुझ्या सारखे वागेल तो खचित नरकात जाईल!
नरकासुराला मारल्यावर कृष्णाने बंदीत असलेल्या राजकन्यांना सोडवले. त्या कन्यांनी कृष्णाला विनवणी केली, “आता आमचे पुढे काय होईल? कोण आम्हाला स्वीकारेल? तूच आमचा कैवारी आहेस, तेंव्हा आम्हाला यातून मार्ग सांग!” तेंव्हा कृष्णाने या सर्व राजकन्यांशी विवाह केला. त्यांना सन्मानाने द्वारकेला नेले. तिथे त्यांच्यासाठी स्वतंत्र महाल बांधवले. आणि आजन्म त्यांच्या योगक्षेम वाहिला.
वरवर अगदी साधीच दिसते ही गोष्ट. अशी परीकथेतली. एक दुष्ट राक्षस, एका राजकन्येला डांबून ठेवतो. एक राजपुत्र राक्षसाशी लढतो आणि राजकन्येला सोडवतो. त्या राजकन्येचा आणि राजपुत्राचे लग्न होते. आणि मग ते दोघे सुखाने राहतात! पण ही नरकासुराच्या वधाची कथा वेगळी आहे, हे महाभारतातील अजून एका कथेवरून कळते.
ती कथा आहे भीष्म व अंबेची. भीष्माने काशिराजाच्या मुली – अंबा, अंबिका व अंबालिका यांना पळवून आणले. शुभ मुहूर्तावर त्यांचा विवाह विचित्रवीर्यशी ठरला. तेंव्हा अंबा म्हणाली, “मी मनाने शाल्व राजाला वरले होते. आम्ही दोघांनी विवाह करायचे ठरवले होते. मी काही विचित्रवीर्यशी विवाह करणार नाही.” त्यावर भीष्माने तिला शाल्व राजाकडे पाठवले. तिकडे शाल्वने, भीष्माने पळवलेल्या अंबेला स्वीकारले नाही. अंबा भीष्माकडे परत आली व भीष्माने तिच्याशी विवाह करावा अशी विनंती केली. आपल्या प्रतीज्ञेपायी भीष्माने तो प्रस्ताव स्वीकारला नाही. शेवटी अंबेला कुठेही थारा न मिळाल्याने तिच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
या पार्श्वभूमीवर, कृष्णाने नरकासुराने पळवलेल्या कन्यांना आश्रय देणे, त्यांची सन्मानाने जगण्याची व्यवस्था लावणे, ही अतिशय कारुण्यपूर्ण कृती असल्याचे लक्षात येते. सोळा हजार हा आकडा कदाचित अतिरंजित असेल. पण त्या सोळा जरी असत्या तरी या कृतीतील कारुण्य कमी होत नाही. आज जिथे घराण्यातील एखादी विधवा, अनाथ किंवा वृद्ध जड होतात, तिथे ही कृती निश्चित सामान्य नाही!
या कथेत अजून एक गमक आहे. ते असे की - जिथे आजही अनेक घरांमध्ये, “तुला काय कळतंय? तू गप्प बस!” असे म्हणून स्त्रीयांना आपले मत सुद्धा मांडू दिले जात नाही, तिथे कृष्ण सत्यभामेच्या नरकासुरावर हल्ला करण्याच्या निर्णयाला पाठींबा देतांना दिसतो. युद्धाला जातांना सत्यभामेला बरोबर घेऊन जातो. दोघेही खांद्याला खांदा लावून लढतात आणि नरकासुराला मारतात. कृष्णाचे सत्यभामेशी बरोबरीचे व आदराचे वागणे इथे दिसते.
कृष्णाचा अबला राजकन्यांशी व्यवहार आणि सबला सत्याभामेशी व्यवहार हा खरोखर आदर्श आहे! नरकासुराच्या वधाची कथा, स्त्री सन्मानाची कथा आहे. अर्थात हा धडा केवळ पुरुषांसाठी नाही, तर स्त्रियांसाठी सुद्धा आहे. सबला सत्यभामा, “मला कुणाच्या मदतीची गरज नाही!” किंवा “हा स्त्री विरुद्ध समस्त पुरुष जात असा लढा आहे.” असले अवास्तव स्त्रीवादी डायलॉग न बोलता, कृष्णाची मदत घेऊन नरकासुराला मारायचे कार्य करते. तसेच त्या सबलेच्या मनातील बंदिवान स्त्रियांविषयीची कणव, व त्यासाठी तिचा नरकासुराबरोबरचा लढा, आपल्याला निश्चित विचार करायला लावणारा आहे.
- दिपाली पाटवदकर