शिल्पकथा : सोमनाथपूरची महिषासुरमर्दिनी

    16-Oct-2017   
Total Views | 8


 

शिल्पकथा मधल्या आधीच्या लेखात मी म्हटल्याप्रमाणे कर्नाटकच्या होयसळ राजांच्या काळातली शिल्पकला मला मनापासून आवडते. ह्या होयसळ राजवंशाने चारशे वर्षे राज्य केलं. छोटंसंच होतं त्यांचं राज्य. वातापीच्या चालुक्यांचे ते मंडलिक होते. ह्या काळात होयसळ राजांनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी, सरदारांनी, राज्यातल्या श्रीमंत व्यापाऱ्यांनी मिळून जवळजवळ दीड हजार मंदिरांचे निर्माण केल्याचे उल्लेख आहेत. दुर्दैवाने चौदाव्या शतकातअल्लाउद्दीन खिलजीचा गुलाम मलिक कफूरच्या स्वारीत बहुसंख्य होयसळ मंदिरांचा विध्वंस करण्यात आला. आजच्या काळात जेमतेम १०० होयसळ मंदिरे अस्तित्वात आहेत, आणि त्यातली बहुतेक भग्नावस्थेत आहेत. पण जे मंदिरे किंवा अवशेष आपल्याला आज बघायला मिळतात त्यावरून जे काळाच्या ओघात नष्ट झाले ते किती भव्य-दिव्य असेल ह्याची कल्पना करता येते. 

 

हळेबिडू आणि बेलूर ही हसनजवळची दोन ठिकाणे प्रामुख्याने होयसळ मंदिरांसाठी ओळखली जातात. बेलूर ही होयसळ साम्राज्याची पहिली राजधानी. तिथले चेन्नकेशवाचे सुंदर मंदिर आजही उपासनेत आहे. बेलूरला पाणी कमी पडायला लागलं म्हणून राजा विष्णूवर्धन ह्या होयसळ राजाने आपली राजधानी जवळच्याच हळेबिडू इथे हलवली. तिथे त्याने एक प्रचंड सरोवर बांधलं, त्याचा व्यास इतका प्रचंड होता की ते सरोवर लोकांना समुद्रासारखं भव्य वाटायचं. त्यामुळे हळेबिडूचं प्राचीन नाव होतं द्वारसमुद्र. पुढे मलिक कफूरची नतद्रष्ट नजर द्वारसमुद्र शहरावर पडली आणि त्याच्या धर्मांध सैनिकांनी ते शहर पुरतं उध्वस्त करून टाकलं. त्या धक्क्यातून द्वारसमुद्र परत कधीच सावरलं नाही. एकेकाळची ही संपन्न नगरी द्वारसमुद्र पुढे 'हळेबिडू' म्हणजे 'उध्वस्त शहर' म्हणूनच ओळखली जाऊ लागली. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की अजूनही हे गांव ''उध्वस्त शहर' हीच आपली ओळख मिरवतंय. ७० वर्षे झाली स्वातंत्र्य मिळून, पण कुणालाही ह्या गावाचं नाव पुन्हा बदलून द्वारसमुद्र करावंसं वाटलं नाही. 

 

बेलूर-हळेबिडूची मंदिरे विख्यात आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक ह्या दोन मंदिरांना भेट देतात पण ह्याच होयसळ शिल्प परंपरेतलं एक खूप सुंदर मंदिर म्हैसूरजवळ सोमनाथपुरा येथे आहे. बेलूर-हळेबिडूच्या मंदिरांच्या तुलनेने हे मंदिर खूपच छोटं आहे. थोडं उपेक्षितही आहे, पण आहे मात्र नजर ठरणार नाही इतकं सुंदर. कन्नडमध्ये असं म्हणतात की बेलूरचं चेन्नकेशव मंदिर आतून बघावं, हळेबीडूचं होयसळेश्वर मंदिर बाहेरून बघावं आणि सोमनाथपूरचं मंदिर मात्र आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी बघावं इतकं सुरेख आहे. मी तीन वेळा सोमनाथपूरला जाऊन आले, पण तरीही माझं समाधान काही अजून झालेलं नाही. प्रत्येक वेळेला जेव्हा मी हे मंदिर बघते तेव्हा मला काहीतरी नवीन गवसतं. सोमनाथपूरचे हे मंदिर होयसळ राजा नरसिंहराज तिसरा ह्याच्या कारकिर्दीत सोमनाथ नावाच्या त्याच्या सेनापतीने १२६८ मध्ये बांधवून घेतलं. ह्या मंदीराचं पहिलं दर्शन होताच आपल्या मनात पहिल्यांदा ठसते ती ह्या मंदिराची प्रमाणबद्धता! इतका प्रचंड आकार आणि दर्शनी भागात दिसणारी शिल्पांची रेलचेल असूनसुद्धा मंदिर कुठेच डोळ्यांवर आघात करत नाही.

 

आज आपण बघणार आहोत ती महिषासुरमर्दिनीची विलक्षण सुंदर मूर्ती मंदिराच्या दर्शनी भागावर कोरलेली आहे. महिषासुरमर्दिनी दुर्गेचे पूजन भारतात फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे. कुषाण काळापासूनची दुर्गेची शिल्पे भारतात उपलब्ध आहेत. सुरवातीच्या काळातल्या दुर्गेच्या शिल्पांमध्ये सिंह कमी दिसतो, आणि महिषासुर हा बहुधा रेड्याच्या रूपातच दिसतो. पण काळाच्या ओघात सिंह जास्त शैलीदार होत गेला आणि अर्धा रेडा, अर्धा माणूस असे महिषासुराचे अंकन होत गेले. ह्या शिल्पातला महिषासुर हा रेड्यातून संपूर्णपणे बाहेर आलेला आहे, फक्त त्याचा एक पाय तेव्हा रेड्याच्या शरीराशी जखडलेला आहे. दुर्गा अष्टभुजा आहे. रेड्याच्या पाठीवर एक पाय ठेवून आवेशपूर्ण अश्या आलीढ मुद्रेत देवी उभी आहे. तिच्या आठही हातात विविध देवांनी दिलेल्या शस्त्रशक्ती आहेत. दुर्दैवाने शिल्पाचे हात तुटलेले असल्यामुळे आपल्याला आज ती सर्व शस्त्रे बघता येत नाहीत. देवीच्या देहबोलीतून तिचा क्रोध आणि तिचा आत्मविश्वास नेमका दाखवण्यात शिल्पकार यशस्वी झालेला आहे. होयसळ शिल्पकलेच्या परंपरेला धरून देवीच्या मुकुटाचे, वस्त्रप्रावरणांचे, आभूषणाचे अत्यंत बारकाईने शिल्पांकन केले आहे. गळ्यातल्या हाराचे, कटिमेखलेचे सुटे सुटे पदर आपल्याला दिसतात. देवीची मूर्ती अत्यंत सौष्ठवपूर्ण आहे, एका हाताने तिने महिषासुराचे डोके दामटून धरलेय. दुसऱ्या हातातला त्याच्या छातीत घुसू पाहणारा त्रिशूल भग्न झाल्यामुळे आता आपल्याला दिसत नाही. देवीच्या पायाशी, एका कोपऱ्यात सिंह आहे आणि सिंहाने आपल्या पंजात एका राक्षसाला पकडले आहे. महिषासुराच्या महिष स्वरूपाचे अत्यंत नैसर्गिक शिल्पांकन केले आहे. देवीच्या मूर्तीच्या मानाने महिषासुर थोडा बेढब, कुरूप दाखवलेला आहे. एकूण शिल्प बघताना आपल्याला शक्तीचा पुरेपुर अनुभव येतो. 

 

 

सोमनाथपुरच्या ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे कधी नव्हे ती इथे शिल्पकारांनी आपली नावं कोरून ठेवलेली आहेत. इथला प्रमुख शिल्पी रेवारी मालीताम्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या अद्भुत प्रतिभेला वंदन करण्यासाठी आपण सोमनाथपुराला जायलाच हवं.

 

- शेफाली वैद्य 

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121