अवंती : व्वा मेधाकाकू... गेल्या आठवड्यातलं मित्र आख्यान अफलातून होत... काय मस्त रूपकं दिली आहेत फ्रेंडशिपला...!!
मेधाकाकू : अवंती... शक्यतो आपल्या मातृभाषेतलेच शब्द वापरायचे... असे ठरलय ना आपलं ? मग फ्रेन्डशिपच्या ऐवजी मैत्र किंवा स्नेहभावना असे संबोधन वापरावे की. आपणच आपल्या भाषेला महत्व दिले नाही तर अन्य भाषिक कसे देतील हा मुद्दा लक्षात घे. अच्छा... मैत्र-स्नेहाची, म्हणीमधून व्यक्त झालेली रूपके आवडली तर तुला छान...! आता एक लक्षात घे की, एखाद्या व्यक्तीचा परिचय झाला, ओळख झाली की, लगेच मैत्री होत नसते. मैत्री-स्नेह हे नाते; विश्वास, विवेक, सदाचार, सौजन्य, आदरभावना अशा, दोन व्यक्ती अथवा समूहाच्या परस्पर गुणवत्तांच्या देवाण-घेवाणीवर आधार घेऊन कालांतराने निर्माण होत असते. अगदी वर्तमानातले उदाहरण द्यायचेच झाले तर, आज इंटरनेटवर भेटलेली बिनचेहेऱ्याची - नाव नसलेली व्यक्ती लगेच मित्र बनत नसते. इंटरनेट नसलेल्या काही शतकांपूर्वी आपल्या हुशार पूर्वजांनी अशा फसव्या मैत्रीसाठी सुद्धा म्हणी रचल्या...!
चुलीतले लाकूड चुलीत बरे
इतकी सुंदर तुलना - इतका निश्चित दृष्टांत, स्पष्ट आहे या म्हणीत. घरातल्या अथवा शेतातल्या उपयोगाची साधने, अवजारे, हत्यारे लाकडापासूनच तयार केली जातात. मात्र प्रत्येक लाकडाची, त्यांच्या उपयोगाच्या आधारावर प्रत ठरवली जाते. काही लाकडे सरवण म्हणून चुलीत वापरायच्या लायकीची असतात, त्यांची अलमारी बनत नसते. आता या म्हणीत स्पष्ट इशारा आहे की, फक्त लाकूडच नव्हे तर आपल्याला दैनंदिन भेटणाऱ्या व्यक्तीच्या गुणवत्तेवर, त्याची पारख करायला शिका. ओळख झाली म्हणून प्रत्येकाला मित्र बनवू नका.
अवंती : मेधाकाकू... आम्हा मुलांची अडचण अशी आहे की, आता आम्ही एका वेगळ्या मोडमधे गेलोय. आता आम्ही “मला सगळं माहित्ये” अशा धारणेने जगतोय, बहुतेक. आजी, आजोबा, आई, बाबा हे सगळे जे काही सांगतायत त्याच्याकडे आम्ही लक्षच देत नाहीसे झालोय...!!
मेधाकाकू : अवंती... आम्हीही कधी, तुमच्या वयाचे होतोच ना. आम्ही सगळेच, कमी - अधिक प्रमाणात या अनुभवातून गेलोय...!
नवे तेंव्हा सवे शिंक्याला लावून ठेवे
या वाकप्रचारातला “सवे” हा शब्द म्हणजे, एखादी वस्तू जवळ ठेवणे किंवा एखादी व्यक्ती सतत आसपास वावरणारी किंवा एकत्र असणे, हवी-हवीशी वाटणे. आताच्या बदलत्या काळांत येणारा अनुभव या ‘स्वभावोक्ती’ मधे व्यक्त होतो. शाळकरी मुलांच्यात असा अनुभव नेहमी मिळतो आपल्याला. एखादे पुस्तक, दफ्तर, कंपासपेटी किंवा पायातले बूट, दिसायला छान दिसतात म्हणून हट्ट करून घेतले जातात, रात्री झोपताना सुध्दा जवळ ठेवलेले असतात. आई - बाबा सतत जवळ हवे असतात. मात्र या कंपासपेटीचा वापर करून भूमितीच्या आकृती काढायची वेळ येते तेंव्हा एखाद्या मुलाला त्या वस्तूचे नावीन्य रहात नाही. भूमितीचा कंटाळा म्हणून ती कंपासपेटीच नकोशी होते. जणू वाकप्रचारात लिहिल्यासारखी दूर शिंक्याला टांगून ठेवली जाते. हल्ली आई, बाबा, शिक्षकांचा सल्ला सुद्धा कटकट वाटते म्हणून असाच शिंक्याला टांगला जातो.
अवंती : अगं मेधाकाकू... आता तू आमच्या अख्या पिढीवर घसरतीयेस की काय. काहीही हं काकू. आम्ही असं काही शिंक्याला टांगून वगैरे ठेवत नसतो हं. तुम्हीच सांगता... आयुष्य येतंय तसं घेत रहावं. घाईने उगाच काही अर्थ काढायचा प्रयत्न करू नये...!
मेधाकाकू : अग्ग बाई... अवंती... खरंच मोठी झालीस असं वाटतंय मला आज. मस्त. आता असं लक्षात घे की, हा आपला फक्त अभ्यास आहे. तो समजून घ्यायचा. आपल्या रोजच्या व्यवहारांत जमेल तसा त्याचा फायदा नक्की होत रहातो. आपले मित्र, मैत्रीण, स्नेही, शेजारी असे सगळे रोज भेटत असतात. मात्र अडी-अडचणीला मदतीला येणारे खरे मित्र असे नक्की समजावे.
कोलती मोळ काळ कांत कळता
कोकणातल्या मालवणी बोलीतली ही म्हण फारच अर्थपूर्ण आहे. ‘मोळ’ या शब्दाचे तीन - चार अर्थ आहेत. या म्हणीतला अर्थाचा संदर्भ, कुंचा - केरसुणी बनवण्यासाठी वापरले जाणारे गवत म्हणजे ‘मोळ’. ‘कोलती मोळ’ म्हणजे जळणारे गवत. ‘काळ कांत कळता’ म्हणजे अंधारात समजते - कळते अशी गोष्ट. या म्हणीतला हा दृष्टांत असा की, रात्री जळणारे गवत किंवा लाकूड याचे महत्व हिवाळ्यातल्या रात्रीच समजते. ते दिवसा - उजेडी समजणार नाही. या उलट, सावलीचे महत्व उन्हातून फिरल्यावरच समजते. गंभीर अडचणीच्या काळात, न बोलावता मदतीला धाऊन येणारे शेजारी आणि मित्र - स्नेही याची नोंद घेणारी ही म्हण. निसर्गातल्या घटनांचा संदर्भ घेऊन, पुन्हा एक व्यवहारी दृष्टांत मैत्री - स्नेह या नात्यातला नक्की भाव सांगणारा...!!
- अरुण फडके