आज अनेकांनी ’सोलफ्री’ या संस्थेचे नाव ऐकले असेल. दिव्यांग आणि गरजूंना मदत करण्यासाठी या संस्थेचा जन्म झाला. प्रीती श्रीनिवासन ही या संस्थेची सह-संस्थापक आहे. एक असा काळ होता, जेव्हा प्रीतीने तामिळनाडूच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवले होते, तर दुसरीकडे एक राष्ट्रीय जलतरणपटू म्हणून आपली ओळख निर्माण केली होती.
५ सप्टेंबर १९७९ रोजी प्रीतीचा जन्म झाला. अभ्यास आणि खेळात प्रीतीचा लहानपणापासूनच हातखंडा. अमेरिकेतही शिक्षण घेत असताना तिला सन्मानित करण्यात आले होते. मात्र, १७ वर्षांपूर्वी प्रीतीवर काळाने घाला घातला. पॉंडिचेरी येथे झालेल्या एका अपघातात तिच्या गळ्याखालील संपूर्ण शरीर लकवाग्रस्त झाल्याची दुर्देवी घटना घडली. या घटनेने तिच्याकडचे सर्व काही हिरावून घेतले. मात्र, प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर तिने काही करून दाखवण्याचे आपल्या मनाशी पक्के ठरवले आणि त्यातूनच ’सोलफ्री’ या संस्थेने जन्मघेतला.
ही घटना जवळपास १७ वर्षांपूर्वीची आहे. प्रीती आपल्या काही मित्र-मैत्रिणींबरोबर समुद्राच्या लहरींचा आनंद लुटण्यासाठी समुद्रकिनारी गेली होती. त्याच वेळी समोरून येणार्या जोरदार लाटेने तिचे आयुष्यच बदलून टाकले. तिच्या आसपास असलेल्या लोकांनाही त्यावेळी काय झाले याची कल्पनाही आली नाही. समुद्राच्या लाटेत अडकलेल्या प्रीतीला आपल्या शरीराची जराही हालचाल करता येत नव्हती. त्यावेळी तिच्या मित्रांनी त्वरित त्या ठिकाणी धाव घेत तिचा बचाव केला. शरीराची हालचालही होत नसताना केवळ आपला श्वास रोखून ठेवत तिने समोर असलेला मृत्यूही माघारी धाडला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले तेव्हा ती पॅरालाईज्ड झाल्याचे समजले नाही, मात्र, त्यानंतर तिला चेन्नईतील रुग्णालयात दाखल केले तेव्हा ही माहिती समोर आली आणि तिच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. या घटनेनंतर अचानक तिचे सर्व मित्र तिच्यापासून लांब गेले, तर एका महाविद्यालयाचा दाखलादेखील तिला घेता आला नाही. अशा परिस्थितीत तिच्या आईने तिला आधार दिला आणि दिव्यांग व्यक्तींची मदत करण्याचा मोलाचा सल्लाही दिला. त्यानंतर प्रीतीनेही आपल्या जिद्दीच्या जोरावर ’सोलफ्री’ संस्थेची स्थापना केली. सध्या ही संस्था दिव्यांग आणि गरजू व्यक्तींना सन्मानाने जगण्यासाठी सर्वतोपरी मदत करत आहे. प्रामुख्याने महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही संस्था सर्वाधिक झटत आहे. प्रामुख्याने पाठीच्या कण्याच्या विकारांबाबत ही संस्था जनजागृती, गरजूंना मदत, तसेच या विकाराने ग्रस्त रुग्णांच्या शिक्षणाची आणि रोजगाराची जबाबदारी उचलण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे. याव्यतिरिक्त ही संस्था एक स्टायपेंड प्रोग्रामदेखील चालवत आहे. या अंतर्गत पाठीच्या कण्यामुळे अपंगत्व आलेल्या व्यक्तींना संस्थेमार्फत एका वर्षापर्यंत १ हजार रुपये देण्यात येतात. प्रीती या संस्थेमार्फत गरजूंसाठी पुनर्वसन केंद्रदेखील उभारण्याच्या विचारात आहे. या अंतर्गत गरजूंना आपल्या घराप्रमाणेच या ठिकाणी राहण्यास मदत केली जाणार आहे. प्रीतीच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्यातर्फे कल्पना चावला हा पुरस्कार देऊन नुकताच तिचा सन्मान करण्यात आला. तिच्या या कर्तृत्वाला एक मानाचा सलाम!
- जयदीप दाभोळकर