लाल बत्ती हिरवी झाली, आली, कोकणगाडी
आली कोकणगाडी, दादा, आली कोकणगाडी
कशासाठी? पोटासाठी, कोकणपट्टी घाटासाठी
आगिनगाडी नागिण जैसी जाते नागमोडी ।।
येथे डोंगर तेथे सागर, नारळ, पोफळ हिरवे आगर
कणखर काळ्या सह्याद्रीची थडथडणारी नाडी ।।
कविवर्य वसंत बापटांची कोकणावर रचलेली ही एक सुंदर कविता. त्या कवितेतील वरील ओळी कोकणातील निसर्गाचे तर वर्णन करतातच, पण त्याचसोबत कोकणातून जाणारी आगिनगाडी पोटासाठीसुद्धा धावतेय हे दर्शवते. कोकणातील अनेक चाकरमानी असेच पोटापाण्यासाठी मुंबई-पुण्यात आले. जवळच्या तर कधी दूरच्या नातेवाईकांकडे राहिले. नोकरीसाठी वणवण करून नोकरी मिळविली. मग कुटुंबाला मुंबईला आणले आणि मग तो कायमचा इथलाच झाला. काम करून थोडासा स्थिरस्थावर झाल्यानंतर परत मग कोण तरी भाचा-पुतण्या याच्याकडे येतो. तो त्या भाच्या-पुतण्याला आसरा देतो, जेवण देतो. नोकरीसाठी मदत करतो. हे चक्र असंच चालू राहते. खरंतर हे आपल्या भारतीय समाजरचनेचे वैशिष्ट्य आहे. तो देखील असाच कोकणातून आला. काकांकडे कामाला राहिला. कालांतराने त्याने स्वत:चे दुकान सुरू केले आणि आज तो चष्मा फ्रेम क्षेत्रातील एकमेव मराठी म्हणून प्रसिद्ध झाला. तोच अवलिया चष्म्याचा व्यापारी म्हणजे ‘देसाई ऑप्टिशियन्स’चे शाम देसाई.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस हे एक गाव. आपले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे हे गाव. याच गावात देसाई परिवारात शामचा जन्म झाला. शामचे बाबा भाऊ देसाई मुंबईला खादी ग्रामोद्योगमध्ये नोकरीला होते. शाम, त्याची आई, एक भाऊ आणि दोन बहिणींसह गावी राहत असे. १० वी पर्यंतचे त्याचे शिक्षण गावीच झाले. शाम हा लहानपणापासून हुशार होता. व्यावहारिक हुशारी त्याच्यामध्ये उपजतच होती. त्याच्या एका दूरच्या काकाने त्याच्यातील चुणचुणीतपणा हेरला आणि शामला मुंबईला आणले. खरंतर त्या अगोदर शाम मुंबईला एकदा आला होता, पण त्याला मुंबईतील धकाधकीचे जीवन आवडले नव्हते. गावी राहून छान पैकी शेती करून आपली गुजराण करावी, असे काहीसे त्याचं स्वप्नं. सरकारी नोकरी म्हणजे सुरक्षित नोकरी असा आपल्या मराठी समाजात एक समज आहे. शामने सरकारी नोकरी मिळेल या आशेने एसटी वाहकाचा बॅच पण काढला. मात्र, एक गोष्ट तो नेहमी पाहायचा. ते म्हणजे त्याच्या गावातील काही जणांची मुंबईत चष्म्याची दुकाने होती. मुंबईत नोकरी करणाऱ्या चाकरमान्यांपेक्षा या व्यवसाय करणाऱ्यांना गावात विशेष मान होता. शामला लहानपणापासून त्या उद्योजकांचं नेहमीच अप्रूप वाटायचे. शाम त्या काकांसोबत मुंबईला आला. दादरला काकांचे चष्म्याचे दुकान होते. त्या दुकानातच तो कामाला लागला. चष्म्याविषयी आणखी तांत्रिक माहिती अवगत व्हावी यासाठी शामने ऑप्टोमेट्रीक या विषयात पदविका प्राप्त केली. १९८४ ते १९८९ पर्यंत त्याने त्या काकांकडे नोकरी केली. यानंतर शाम ठाण्यात दुसऱ्या एका नामांकित अशा चष्म्याच्या दुकानात कामाला लागला. एक वर्ष तिथे काम केले. सर्व नीट होते. मात्र, मनामध्ये ते गावातील उद्योजकांचे अप्रूप वाटणारे चित्र नजरेसमोर येई. १९९० साली शामने स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. वडिलांनी वडिलोपार्जित जागा विकून ६ लाख रुपये शामला भांडवल म्हणून दिले. भांडुपच्या लालबहादूर शास्त्री मार्गावर २०० चौरस फूट जागेत शामने चष्म्याचे दुकान सुरू केले. दुकानाला नाव दिले ‘देसाई ऑप्टिशियन्स’. शाम देसाईंनी दिवसरात्र राबून व्यवसाय प्रस्थापित केला. बाबांकडून घेतलेले भांडवलाचे ६ लाख रुपये त्यांना परत केले. आपला मुलगा स्थिरस्थावर झाला आहे, हे पाहून त्यांना समाधान वाटले. कालांतराने देसाई ऑप्टिशियन्स नंतर हरिप्रिया आणि कंपनी ही त्यांची दुसरी कंपनी उभी राहिली. ही कंपनी ऑप्टिकल फ्रेम तयार करते. किरकोळ विक्रीतून शाम देसाईंनी घाऊक बाजारपेठेत प्रवेश केला. आज आपल्याला चष्मा विक्री करणारी मराठी नावे असलेली अनेक दुकाने दिसतील. मात्र घाऊक बाजारपेठेत व्यवसाय करणारे ते एकमेव मराठी उद्योजक आहेत.
देसाईंनी स्वत:चे तीन ब्रॅण्ड्स बाजारपेठेत प्रस्थापित केले आहेत. रिओ-डी-जानिरो, डि-स्पेक, टुलिप हे तीन ब्रॅण्ड्स. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात या राज्यांसह संपूर्ण भारतात चष्म्यांच्या घाऊक बाजारपेठेत हे तीन ब्रॅण्ड्स आज चांगलेच नावाजलेले आहेत. शाम देसाईंच्या या उद्योजकीय प्रवासात त्यांच्या पत्नी शामल देसाईंचा मोलाचा वाटा आहे. त्या शाम देसाईंसोबत खांद्याला खांदा लावून हा व्यवसाय सांभाळत आहेत. यावर्षी १५ ऑगस्टची घटना आहे. शाम देसाईंच्या उद्योजकीय वर्तुळातील उद्योजिका उज्ज्वला बाबर यांनी त्यांना रात्री फोन केला. उज्ज्वला बाबर यांच्या परिचयाच्या एका अनिवासी भारतीय ग्राहकाला चष्मा हवा होता. शाम देसाईंनी सकाळी संपर्क करून उज्ज्वला बाबर यांच्याकडून सगळी माहिती घेतली. स्वातंत्र्यदिनी सकाळी १० वाजता दुकान उघडले. स्वातंत्र्यदिनाची सार्वजनिक सुट्टी होती. त्या चष्माची ब्रॅण्डेड काच मिळणे अवघड होते. मात्र, शाम देसाईंनी आपले स्वत:चे बाजारपेठेतील गुडविल वापरून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तो चष्मा तयार करून उज्ज्वला बाबर यांना दिला. बाबर यांनी तो चष्मा विमानतळावर पोहोचविला. आपण भारतीय व्यावसायिक सेवेत कुठेच दिरंगाई करत नाही, हा संदेश त्या अनिवासी भारतीयापर्यंत पोहोचला. अशाप्रकारे स्वातंत्र्यदिनी एकप्रकारे आपल्या देशाची मान उंचावली.
बहुतांश वेळा ज्यांना चष्मा आहे, अशा मुली देसाईंच्या दुकानात येतात. चष्मा हा त्यांच्या लग्नातील अडथळा असतो. मात्र, देसाई अगदी आपुलकीने त्या मुलींच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना फ्रेम वा लेन्स सुचवितात. सुखाने संसार करणाऱ्या अशा अनेक मुली शाम देसाईंचे आभार मानण्यास आवर्जून येतात. शाम देसाईंसाठी ती एकप्रकारे कौतुकाची मोठी पावती आहे. त्याचप्रमाणे मोतीबिंदू असणारे अनेक रुग्णदेखील त्यांच्याकडे तपासणीसाठी येतात. शाम देसाई आणि त्यांच्या दुकानातील कर्मचारी त्यांना योग्य मार्गदर्शन करतात.
येत्या पाच वर्षांत कंपनीची उलाढाल १० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा देसाई यांचा मानस आहे. सोबतच आपला भारत सशक्त दृष्टी असणारा देश बनवायचा आहे. त्यासाठी ते काही उपक्रम तयार करत आहेत. प्रचंड मेहनत घेण्याची तयारी, सतत शिकण्याची ऊर्मी आणि लाघवी स्वभाव यामुळेच शाम देसाई आज त्यांच्या क्षेत्रात यशस्वी आहेत. त्यांच्यातील हे गुण त्यांच्या संपर्कात येणा-या प्रत्येक व्यक्तीला एक नवीन दृष्टी देतात.
- प्रमोद सावंत