'हिंदी' वर प्रभुत्व गाजवणारा अजरामर नायक...

    11-Oct-2017   
Total Views | 8



आज 'सदी के महानायक', 'शहंशाह', 'अँग्री यंग मॅन' म्हणजेच अमिताभ बच्चन यांचा ७५ वा वाढदिवस. तसं तर त्यांची ओळख वेगळ्याने करुन देण्याची गरजच नाही. ते ओळखले जातात त्यांच्या उत्तम अभिनयामुळे, या वयात देखील असणाऱ्या असीम ऊर्जेमुळे आणि त्यांच्या विशेष आवाजामुळे. मात्र अमिताभ यांच्याकडे असलेल्या अनेक गुणांपैकी घेण्यासारखा एक गुण म्हणजेच त्यांचे भाषेवर असलेले प्रभुत्व.  अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांचे हिंदी साहित्याच मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळे हिंदी काव्याला इतक्यासुंदर कविता मिळाल्या आणि हिंदी सिनेसृष्टीला महानायक. अमिताभ यांना  भाषेचा वारसा घरातूनच मिळाला आहे, मात्र तो आज तागायत जपण्याचे काम त्यांनी केले आहे, त्यामुळे त्यांच्या अनंत गुणांपैकी हा गुण त्यांना इतरांपासून वेगळं करतो. 

आजच्या दिवशी देखील देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी हिंदी भाषेचीच निवड केली आहे. 



आजच्या काळात बॉलिवुड मधील युवा अभिनेते अभिनेत्री यांचे बोलणे ऐकले तर त्यात ७०% इंग्रजी आणि ३०% हिंदी भाषा असे प्रमाण असते. आधीच्या काळातील अभिनेत्यांमध्ये हे प्रमाण थोड्या फार फरकाने कमी असेलही. मात्र अमिताभ यांच्या हिंदी भाषेच्या ज्ञानामुळे आणि त्यांच्या 'इलाहाबादी' लहज्यामुळे त्यांचे 'हिंदी' हे विशेष लक्षात राहते.



त्यांचे वडील म्हणजेच प्रसिद्ध कवी आणि लेखक हरिवंश राय बच्चन. त्यांच्या लिहीलेल्या हिंदी कविता अजरामर आहेत. 'मधुशाला', 'अग्नीपथ' आणि 'जो बीत गयी सो बात गयी' या प्रसिद्ध कविता आहेत. मात्र त्या आजच्या पिढीपर्यंत पोहोचल्या, त्या म्हणजे अमिताभ यांच्यामुळे. मधुशाला, अमिताभ यांच्या आवाजात ऐकणं म्हणजे एक पर्वणी. त्यांच्या खास शैलीत मधुशालाची वेगळीच नशा चढते असे म्हणणे देखील वावगे ठरणार नाही.



केवळ कविताच नाही तर छोट्या पडद्यावर "देवियों और सज्जनों" म्हणत कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाची सुरुवात करणारे अमिताभ बच्चन वेगळे ठरले. त्या आधीपर्यंत सर्व कार्यक्रमांची सुरुवात "वेलकम लेडीज अॅण्ड जेंटलमॅन' अशी होत असत. त्यांच्या या एका ओळीने अक्षरश: प्रेक्षकांना वेड लावले. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की ''मी छोट्या पडद्यावर यावे ही जयाची अजिबात इच्छा नव्हती. मात्र एबीसीएल कंपनीत झालेल्या तोट्यानंतर कर्ज फेडण्यासाठी मला ते करणे भाग होते." प्रांजळपणे असे सांगणारा इतका दिग्गज अभिनेता पुन्हा होणे नाही. कौन बनेगा करोडपतीचे अनेक पर्व आले, मात्र ज्यामध्ये 'बिग बी' नाहीत ते पर्व प्रेक्षकांवर म्हणावी तशी जादू करू शकले नाही, त्याचे एकमेव कारण म्हणजे अमिताभ बच्चन यांनी बोलण्याची, कार्यक्रम सादर करण्याची शैली आणि त्यांची सुंदर हिंदी भाषा.



पत्रकारांना उत्तर देताना देखील ते हिंदी भाषेचाच वापर करताना दिसतात. एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी 'मैं आपकी वाणी सुनकर स्तब्ध हूँ, उत्तर नहीं है मेरे पास.' असे उत्तर दिले होते. २०११ मध्ये विजय पुणेकर यांच्या आव्हानावरुन एम्ब्युलेंस, मोबाईल, सिमकार्ड या सारख्या शब्दांना त्यांनी चिकित्सा वाहनम, हस्त दूरभाषम आणि ‘जा विहीनम:, ता हस्त दूरभाषम' अशी नावे दिली.



आपल्या पडद्या मागच्या कलाकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना एका कार्यक्रमात ते म्हणाले की, "कई कर्मचारी हैं, जो नेपथ्य में कार्य करते हैं, व्यक्तिगत तौर पर हम इनकी सहायता करते हैं, लोकिन कभी भी कोई ऐसा संगठन नहीं बना जो इनकी सहायता कर सके, हमें मिलकर उनकी सहायता के लिए प्रयास करना चाहिए." त्यांच्या या मृदु भाषेत खडी बोली हिंदी ऐकायला मिळणं म्हणजे एक भाग्याची बाब आहे.

आजच्या सर्व सिनेमांमध्ये इंग्रजी भाषेचे प्रभुत्व आपोआप दिसून येतं. सिने कलाकारांप्रमाणे इंग्रजीमध्ये बोलणं म्हणजे 'कूल'.. 'यू नो.. आय सी.. ओहहहह ओके.." या शब्दांचा वापर स्टायलिश असतो, असे सगळे पटवून देणाऱ्या सिनेकलाकारांपेक्षा आपल्या देशातील आपल्या एका भारतीय भाषेला जपण्याचे, आणि केवळ जपण्याचेच नाही तर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम या अजरामर नायकाने केले आहे.भाषा ही केवळ अभिव्यक्ती नाही तर विचार करण्याची पद्धत आहे. अमिताभ यांना मिळालेल्या वारशामुळे संस्कारांमुळे त्यांची विचार करण्याची पद्धतीच त्यांना हे सामर्थ्य देते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना व त्यांच्या या भाषेवरील प्रभुत्वाला मानाचा मुजरा..


- निहारिका पोळ

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121