ही कथा आहे ट्यूलाईट नावाच्या एका छोट्या मुलाची. हो 'ट्यूबलाईट'च. वेगळं आहे ना नाव जरासं. ही कथा पण अशीच वेगळी आहे. शिक्षणाची आवड असलेल्या एका चिमुकल्याची ही कथा. जो स्ट्रीटलाइटच्या खाली बसून अभ्यास करतो. ज्याला त्याच्या सतत लाईटखाली बसून अभ्यास करण्यामुळे 'ट्यूबलाईट' असे नाव पडते. आणि तीच त्याची ओळख बनते. तो अनाथ असतो, त्याला शाळेत जाता येत नाही. मात्र शाळेबाहेर बसून शिक्षिकांचे शिकवणे ऐकून तो शिक्षण घेत असतो.
एकदा काही महाविद्यालयीन विद्यार्थी त्याच्या शाळेच्या गल्लीत जातात आणि त्याला शाळेबाहेर अभ्यास करताना बघून त्याचा व्हिडियो काढतात, व्हिडियो मध्ये देखील तो त्याचे नाव 'ट्यूबलाईट' असेच सांगतो. एक पत्रकाराच्या हे लक्षात येते आणि त्यानंतर ती त्याचा मागोवा घेते. 'ट्यूबलाईट'ला ओळख मिळावी, त्याला त्याचे स्वत:चे नाव मिळावे यासाठी ती एक लेख लिहीते आणि एका उत्तम शाळेचे प्राध्यापक 'ट्यूबलाईट'ला शिक्षण देण्यास इच्छुक असतात. या पद्धतीने त्याला त्याची ओळख त्याचे नाव मिळते. काय असते हे नाव? ट्यूबलाईट पुढील आयुष्य कुठल्या ओळखीसोबत जगणार?
जाणून घेण्यासाठी नक्की बघा हा लघुपट....
एक सुंदर संदेश देणारा हा लघुपट आहे. पॉकेट फिल्म्स निर्मित या लघुपटाचे दिग्दर्शक आहेत विनम्र तर यामध्ये मुख्य भूमिका निभावल्या आहेत, मयंक पेरिवाल, मोनिका शर्मा, वज्र पंचारिया आणि ममता यांनी. या निरागस मुलाच्या सुंदर कथेला जगण्यासाठी हा लघुपट एकदा तरी नक्की बघा.
- निहारिका पोळ