#ओवीLive - नित्ययज्ञ

    08-Jan-2017   
Total Views | 2

नेहेमीप्रमाणे धावपळ करत निनाद वर्गात पोचला. अमित सरांचा drawing चा तास सुरु झाला होता. त्यांच्या सारख्या दिग्गज चित्रकाराचे मार्गदर्शन मिळवणारी त्याची batch lucky होती. निनाद धापा टाकत मागच्या बाकावर बसला.

अमित सर सांगत होते - “जिम कॉलिनस् ने सांगितलेली ही शंभर सव्वाशे वर्षापूर्वीची ही घटना आहे. दोन ब्रिटीश गट उत्तर ध्रुवावर जाण्यास निघाले. शर्यतच होती दोन्ही गटांमध्ये, कोण आधी पोचते! पहिला गट उत्तर ध्रुवावर पोहोचला, आणि ३० दिवसात सर्वजण सुखरूप परत आले. दुसरा गट उत्तर ध्रुवा पर्यंत पोचला तर नाहीच पण दुर्दैवाने त्या गटातील सर्वजण मृत्यू पावले.

“या घटने मागचे कारण शोधतांना असे लक्षात आले – पहिल्या गटाने ठरवले होते रोज २० मैल अंतर कापायचे. थंडी असो, वारा असो, वादळ असो. काहीही असो, रोजचे ठरलेले ध्येय गाठयाचे. 

दुसरा गट मात्र जमेल तेंव्हा - जमेल तितके अंतर कापत होता. या गटातील एकाची दैनंदिनी मिळाली, त्यात लिहिले होते – आज पुन्हा वादळी वाऱ्यामुळे हलता आले नाही, आम्ही दोन दिवस एकाच जागी थांबून आहोत. आणि त्याच दिवसाची नोंद पहिल्या गटाने केली होती – आजही वादळ होते, त्यामुळे आजचे २० मैल कापायला जास्त कष्ट पडले.” गोष्ट संपली तसे अमित सर वर्गाला म्हणाले, ”या गोष्टीवरून वरून काय कळते?”

कोणी सांगितले – “ध्येयाच्या दिशेने एक पाउल जरी टाकले तरी ती प्रगती आहे.”

कोणी सांगितले – “यश मिळणार की अपयश, हे रोजच्या सवईवर ठरते.”

आणखी कोणी आणखीन काही सांगितले.

शेवटी, अमित सर म्हणाले, “तुम्हाला त्या घटने मागाची कारणे नीटच कळली आहेत! आता पुढचा प्रश्न. तुमची रोजची २० मैल यात्रा काय आहे?”

इतका वेळ हिरहिरीने उत्तरे देणारा वर्ग, या प्रश्नाने अंतर्मुख झाला. निनाद विचार करत होता, खरच आपण रोज ठरलेलं असं काय करतो? सरांनी सांगितलेली Sketching ची practice दुसऱ्या गटासारखी करतो. जमेल त्या दिवशी, जमेल तेंव्हा आणि जमलं तर. मग निनादने सरांनाच विचारले – “अमित सर, तुमची रोजची २० मैल यात्रा काय आहे?”

“रोज सकाळी ५ स्केचेस् काढल्याशिवाय मी सकाळचा चहा पीत नाही!”

पंढरी शुभ्र दाढी आणि hearing aid मिरवणारे सर अजूनही रोज सराव करतात? अंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार असूनही रोज सराव करतात! सरांच्या उत्तराने वर्गात शांतता पसरली. तसे सर म्हणाले, “यालाच आज काल Daily Ritual म्हणतात. रोजचा अभ्यास, रोजचा रियाझ, रोजचे sketching, रोजची practice झालीच पाहिजे!”      

ज्ञानेश्वर यालाच ‘नित्ययज्ञ’ म्हणतात! जो नित्ययज्ञ करायला चुकला, तो सुखाला मुकला! त्याचे यशापयश, सुख-दु:ख परतंत्राने चालते. 


हा लोकू कर्मे बांधिला | तो परतंत्रा भूतला | तो नित्ययज्ञाते चुकला | म्हणोनिया || ३.८४ ||

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121