
‘‘आँखो मे वैभव के सपने, पग मे तुफानों की गती हो, राष्ट्रभक्ती का ज्वार न रूकता, आए जिस जिस की हिंमत हो,’’ असे ठणकावून सांगणार्या अटल बिहारी वाजपेयींचा जन्मदिवस आपण गेल्याच आठवड्यात साजरा केला. कवी म्हणून, राजकारणी म्हणून अटलजी मोठे होतेच, पण हा राष्ट्रभक्तीचा ज्वार म्हणजेच भरती काय होती हेही त्यांना कवी म्हणून उत्तमकळत होते. मुळातच विचारवंत असलेल्या वाजपेयींना राष्ट्रभक्तीचे बाळकडू मिळाले ते भारतातल्या १९२५ सालच्या जग व्यापायला निघालेल्या प्रयोगातून. भारतासमोरच्या अस्सल प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी डॉ. हेडगेवारांनी इथल्या मातीतले एक मॉडेल उभे केले. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ नावाने डॉक्टरांचा हा प्रयोग लोकप्रियही झाला आणि वृध्दिंगतही होत राहिला. संघाच्या स्थापनेच्या वेळी प्रबळ असलेल्या विचारधारा आणि राजकीय पक्ष यांचे आज काय झाले आहे, हे इथे वेगळे लिहायला नको. पण डॉक्टर हेडगेवारांचा विचार कालजयी ठरला. त्यांची कारणमीमांसा केली पाहिजे. डॉक्टरांच्या विचारांचा पाईक होण्याची पद्धत, त्यासाठी जीवन देण्याची पद्धत डॉक्टरांच्या हयातीतच विकसित झाली होती. मात्र डॉक्टरांच्या मृत्यूपश्चात ती अक्षुण्णपणे वाढतच गेली. आजही शेकडो तरुण आपले लौकीक जीवन टाकून प्रचारकी जीवनाचा स्वीकार करताना दिसतात. डॉक्टरांनी देशभक्तीचा मार्ग दाखविला तो कुणाच्या देशभक्तीला फूटपट्ट्या लावून मोजण्याचा मुळीच नव्हता. हा मार्ग समर्पणाचा होता. सकारात्मक ऊर्जेचा होता. या ऊर्जेतूनच संघ आज तालुका स्तरापर्यंत जाऊन पोहोचला. या सकारात्मक ऊर्जेने निरनिराळे आयाम निर्माण केले. त्यातून लोककल्याणाची निरनिराळी कामे उभी राहिली. संस्काराची वाट धरून हिंदू अस्मितेचे सातत्याने जागरण करण्याची क्रिया सुरू राहिलीच, परंतु सेवाकार्याचे आयामही घडत गेले. आकारास येत गेले. हे जोडण्याचे कामहोते. लोकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे मॉडेल आहे. दुर्दैवाने जे संघात झाले ते समाजात होताना दिसले नाही. देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशात जी राष्ट्रीय ओळख निर्माण व्हायला हवी होती ती झाली नाही. जर्मनी, तुर्की, अमेरिका, फ्रान्स या सारख्या देशात तिथल्या राष्ट्रपुरुषांनी ही जबाबदारी शिरोधार्ह मानली आणि राष्ट्रनिर्मितीच्या कामाला जुंपून घेतले. स्वत:चा असा राष्ट्रवाद निर्माण केला. आपल्याकडे मात्र अगदी निराळेच घडले. समाजवाद, डावे, गांधीयन मॉडेल एक ना अनेक कितीतरी प्रयोग देशाच्या अस्मितेबरोबर निर्माण केले गेले आणि त्यातून स्वार्थी नागरिकांची एक मोठी पिढीच्या पिढी निर्माण झाली. ‘आम्ही काही करणार नाही, जे काही आहे ते सरकारने करावे’ हा याच पिढीचा महत्त्वाचा गुण. पण परिस्थिती तशीच राहिली असेही नाही. ग्लोबलायझेशन आले आणि ‘तुम्ही कोण आहात’ त्यापेक्षा ‘तुम्ही काय करू शकता’ याला महत्त्व आले. माहिती-तंत्रज्ञानाचा हा काळ एक वेगळ्याच प्रकारची राष्ट्रीय संस्कृती घेऊन आला. एखाद्या घटनेला राष्ट्रवादाच्या अंगाने ताबडतोब प्रक्षिप्तपणे प्रतिक्रिया देणे म्हणजे ‘राष्ट्रवाद’ असे काहीसे समीकरण होऊन बसले आहे. यातून निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा इतकी आहे की, ती कुठलेही देशहिताचे सृजनात्मक कामउभे करू शकत नाही. हिंदुत्वाच्या अनुषंगाने राष्ट्रीयत्वाची मांडणी करणारे अनेक सन्माननीय विचारवंत या देशात झाले. मात्र कालगतीच्या चक्रात या विचारवंतांचे विचार केवळ त्यांच्या पुस्तकापुरतेच मर्यादित राहिले. या उलट डॉक्टरांच्या विचारांच्या बाबतीत स्थिती पाहायला मिळते.
एका ठरावीक कुटुंबाच्या मालकीतून सुटून देश आता एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. या कुटुंबाने या देशाचे काय केले ते सांगण्याचे आणि त्यांची नालस्ती करण्याचे दिवस संपले आहेत. आता भारताच्या संदर्भात एका आधुनिक राष्ट्रवादाची मांडणी करावी लागणार आहे. ज्या जागतिक अर्थव्यवस्थेचे आपण आज अविभाज्य घटक आहोत, त्या अर्थव्यवस्थेची फळे जशी आपण चाखली आहेत तसे तिचे परिणामही आहेत. एका बाजूला ‘युवकांचा देश’ म्हणून आपण आपली पाठ थोपटून घेत आहोत, तर दुसर्या बाजूला यांत्रिकीकरणामुळे या देशातील लाखो तरुणांच्या हातचे कामही जाणार आहे. याचाही विचार आपल्याला करावा लागेल. भारतीय समाजाचे सर्वच प्रश्न आपल्याला आपल्या राष्ट्रवादाशी आणून जोडावे लागतील. कृषी, कररचना, शिक्षण, पायाभूत सुविधांचा विकास हे सारे राष्ट्रवादाशी निगडित घटकच असले पाहिजे. जर्मनांचा राष्ट्रवाद त्यांच्या यंत्रातून दिसतो. ज्यूंचा राष्ट्रवाद त्यांच्या तंत्रज्ञानातून दिसतो. वाळवंटात उभा राहिलेला त्यांचा देश. यांच्याकडे दूधदुभत्यासाठी स्वत:च्या गाईच नव्हत्या. या मंडळींनी सीरियन गाई आणून इस्रायलच्या वातावरणाशी जुळवून घेणार्या गाई निर्माण केल्या. आज इस्रायलमध्ये डेअरी हा अजस्त्र मोठा व्यवसाय आहे. अर्थकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या त्यांच्या गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिथे गाई उकिरड्यावर फिरताना दिसत नाहीत. त्यांचा राष्ट्रवाद ज्यांना पटत नाही त्यांचा सातत्याने द्वेष करण्याची गरज त्यांना भासत नाही. भीती तर नाहीच नाही.
मात्र देशविघातक काहीही केले तर त्यांना चांगला धडा शिकविण्याची हिंमत ही सगळीच राष्ट्रे बाळगतात. ट्विन टॉवरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानचे जे केले तो त्यांचा राष्ट्रवादच होता. ‘राष्ट्र’ म्हणून या सगळ्याच प्रक्रियांचे समाजशास्त्रीय विवेचन वारंवार केले जाणे आवश्यक असते. लोकशाहीत ही जबाबदारी विचारवंतांवर आणि विद्यापीठांवर येऊन पडते. राष्ट्रीय मूल्यांचे निश्चितीकरण करण्यासाठी जी घुसळवणूक व्हावी लागते तिची जबाबदारी या मंडळींवरच असते. मिनाक्षीपुरमच्या धर्मांतरणापासून ते रामजन्मभूमीपर्यंतच्या आंदोलनापर्यंत भारतीय जनमानसाचे जे मनपरिवर्तन झाले त्या परिस्थितीचे आकलन न करता आपल्या विचारवंतांनी या प्रक्रियेला धार्मिक उन्मादाचे लेबल लावले. यामागचे कारण सोईचे होते. विद्यापीठातल्या आपल्या खुंट्या बळकट करण्यासाठी सत्ताधार्यांच्या सोईचे असे विवेचन ही मंडळी करीत राहिली. त्यामुळे ‘राष्ट्र’ म्हणून जी घुसळण व्हायला हवी होती, ती झालीच नाही. पुन्हा एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी ही विद्यापिठे अडवून ठेवल्याने त्यांची सारी प्रमेयेही त्याच साचेबंद दृष्टिकोनातून मांडली गेली. पाश्चात्त्य विचारवंतांची अवतरणे यांनी उचलली, मात्र त्यामागचे सत्यान्वेषी बौद्धिक धाडस यांना दाखविता आले नाही. अर्थात, सत्तेतील पदांच्या आणि वैचारिक विश्वातील विविध पदांच्या ज्या वाटण्या झाल्या त्याचाच हा परिणामआहे. माध्यमांनी तर भलतीच भूमिका घेतली आहे. लोकशिक्षणापेक्षा नकारात्मतेच्या गर्तेत लोकांना कसे ढकलता येईल याचा चंगच काहींनी बांधला आहे, तर उरलेले जाहिरात विभागाने मोकळ्या ठेवलेल्या जागेत रंजक मजकूर भरून माध्यमे चालवित आहेत. अशा परिस्थितीत आत्मभान देणार्या मूल्यव्यवस्थेची मोठी गरज आहे. ही गरज केवळ आणि केवळ राष्ट्राशी निगडित असलेल्या विषयांचा सकारात्मक विचार करूनच येईल. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा कडवा संघर्ष करावा लागेल. मुक्त माध्यमांची निर्मिती हीच मुळी पारंपरिक माध्यमांची आपमतलबी मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी झाली आहे. पण इथेही जर प्रतिक्रियावादी राष्ट्रवाद फोफावायला लागला, तर या भूमीचा ‘राष्ट्र’ म्हणून विचार कोण करणार? त्याच्या अन्य आयामांची जबाबदारी कोणाची असेल? गुरूचरण दास यांच्या ‘डिफिकल्टीज इन बीईंग गुड’ या पुस्तकात पुरात उडी मारून दोन मुलांचा जीव वाचविणार्या तरुणाचे उदाहरण दिले आहे. त्याने दाखविलेल्या माणुसकीचे आणि धैर्याचे सगळेच कौतुक करतात. याने मात्र बुडणार्या मुलांना पाहणार्या घोळक्यात उभ्या असलेल्या एका तरुणीला प्रभावित करण्यासाठी हे धाडस केलेले असते. आपण करीत असलेल्या कामामागची प्रेरणा काय, याचा नीट अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे. तो लावता आला, तरच राष्ट्रभक्ती आणि प्रतिक्रियात्मक राष्ट्रवाद यातला फरक आपल्याला कळू शकेल.
- किरण शेलार