काही दिवसांपूर्वी संजय लीला भन्साळी ह्या चित्रपट दिग्दर्शकाच्या पद्मावती चित्रपटाच्या सेटवर, या चित्रपटातल्या एका राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी ह्यांच्यामधील कथित दृश्यावर आक्षेप घेत एका राजपूत संघटनेने भन्साळी यांना मारहाण केली आणि सेटची नासधूस केली. मीडिया मध्ये लगेचच ह्या विषयवर रान पेटले. बॉलीवूड आणि मीडिया सकट समस्त पुरोगामी विचारवंतांची फौज हिरीरीने भन्साळी ह्यांच्या समर्थनासाठी धावून आली. अगदी मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देखील 'दहशतवादाला धर्म नसतो' असे म्हणून गळा काढून रडणाऱ्या अनुराग कश्यप सारख्या दिग्दर्शकांना भन्साळी ह्यांच्यावर झालेला हल्ल्यात मात्र लगेच 'हिंदू दहशतवाद' दिसायला लागला. अर्थात समाजमनाला न पटणाऱ्या एखाद्या कलाकृतीला विरोध करण्याचे लोकशाही मार्ग असताना अश्या तऱ्हेने मारहाण करणे चुकीचे आहे असे म्हणून त्याचा विरोध करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहेच. पण हा विरोध जेव्हा एकांगी असतो तेव्हा विरोध करणाऱ्या लोकांच्या विश्वासार्हतेवरच घाला येतो.
Hindu extremists have stepped out of twitter into the real world now.. and Hindu terrorism is not a myth anymore
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) January 27, 2017
आज भन्साळीच्या बाजूने रणांगणात उतरलेल्या किती 'पुरोगामी विचारवंतांनी' जेम्स लेनच्या पुस्तकाचा निषेध म्हणून पुण्यातल्या भांडारकर संस्थेचा नासधूस करणाऱ्या लोकांचा निषेध केला? बॉलीवूडमधल्या किती लोकांनी रजा अकादमीच्या मुसलमान गुंडानी केलेल्या मुंबईतल्या हुतात्मा चौकातल्या अमर जवान स्मारकाच्या तोडफोडी विरुद्ध आवाज उठवला? ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर ह्यांनी काश्मीर मधून हुसकावून लावलेल्या, आपल्याच देशात निर्वासितांचे जिणे जगणाऱ्या पंडितांचे प्रश्न जाहीरपणे मांडायचा प्रयत्न केला, त्याला हिंदी चित्रपट सृष्टीतल्या किती कलाकारांनी पाठिंबा दिला?
भन्साळीला इतिहासाचे चित्रण त्याच्या पद्धतीने करायचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असे ह्या पुरोगामी विचारवंतांचे मत आहे. जर भन्साळीला नुसती एक गोष्टच सांगायची आहे तर मग समाजमनाला पूज्य असलेल्या पद्मिनीचीच का? प्रा. वामसी जुळुरी हे संज्ञापनशास्त्राचे अभ्यासक म्हणतात त्याप्रमाणे भन्साळीनी त्याला हवी ती गोष्ट खुशाल सांगावी, त्यामध्ये क्रूरकर्मा अल्लाउद्दीन खिलजीचे उदात्तीकरण करायचे असेल तर तेही करावे पण देशातल्या लाखो लोकांना पूज्य असलेल्या पद्मिनीचे नाव कशासाठी? इतिहासकार जेम्स टॉड आणि गौरीशंकर ओझा ह्यांच्या मते पद्मिनी खरोखरी अस्तित्वात होती आणि चित्तोडच्या युद्धानंतर अल्लाउद्दीन खिलजीच्या हाती पडू नये म्हणून राणी पद्मिनीने हजारो राजपूत स्त्रियांसोबत अग्निप्रवेश म्हणजे जौहर केला. भारतीय जनमानसात तर पद्मिनीचे स्थान अद्वितीय आहे.
मुळात अल्लाउद्दीन खिलजी हा अत्यंत क्रूर राज्यकर्ता होता. त्याचे पुरुषांशी आणि स्त्रियांशी असे दोघांशीही लैंगिक संबंध होते. मलिक कफूर हा त्याचा सेनापती म्हणजे एक हजार दिनार देऊन विकत घेतलेला एक गुलाम होता, आणि त्याचे खच्चीकरण करून ह्याच खिलजीने त्याला बाटवले होते. ह्याच मलिक कफूरने पुढे दक्षिण भारत जिंकून घेत हजारो देवळे फोडली, हिंदूंचे निर्घृण शिरकाण केले आणि हजारो हिंदू बायका-मुलांना जबरदस्तीने मुसलमानांच्या जनानखान्यात पाठवले. खिलजीने गुजरात वर स्वारी करून सोमनाथच्या मंदिराचा विध्वंस केला आणि स्वतःच्या हाताने सोमनाथच्या लिंगावर घणाचे घाव घालून त्याचे तुकडे जामी मशिदीच्या फरशीसाठी वापरले. ६०,००० हिंदूंचा शिरच्छेद करून त्यांच्या मस्तकांची उतरंड रचणारा हा क्रूरकर्मा अल्लाउद्दीन खिलजी. गुजरातच्या राजाचा पराभव करून त्याने त्याच्या कमलादेवी नावाच्या राणीला स्वतःच्या जनानखान्यात आणले. एवढ्यावरच खिलजी थांबला नाही. काही वर्षांनी त्याने कमलादेवीच्या लेकीला, देवल देवीला जबरदस्तीने उचलून आणून स्वतःच्या मुलाच्या जनानखान्यात तिला टाकले.
एका चित्तोडच्या लढाईत त्याने ३०,००० राजपूत योद्ध्यांची कत्तल केली. हा सगळा इतिहास झियाउद्दीन बरानी ह्या इतिहासकाराच्या तारीख-ई-फिरुझशाही ह्या ग्रंथात नोंदलेला आहे. अश्या माथेफिरू, धर्मांध, क्रूर माणसाचे गाणी गाणारा नायक असे रूपांतर करून त्याचे उदात्तीकरण करणे सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे? राणी पद्मिनी खरोखरच अस्तित्वात होती की नाही हा कदाचित वादाचा मुद्दा असू शकेलही, पण अल्लाउद्दीन खिलजी हा अत्यंत क्रूर आणि माथेफिरू होता हे मात्र निखळ ऐतिहासिक सत्य आहे.
अल्लाउद्दीन खिलजी, तैमूर, गझनीचा महमूद, टिपू, औरंगझेब हे सगळ्या मुसलमान राज्यकर्त्यांनी हिंदू प्रजेवर अतोनात जुलूम केलेले आहेत. पण आजकाल 'इतिहासाचे कलात्मक चित्रण' ह्या गोंडस नावाखाली ह्या सगळ्यांचे सरसकट उदात्तीकरण केले जात आहे. त्यांनी जर काही देवळे उध्वस्त केली असलीच तर हा केवळ 'राजकीय' निर्णय होता, त्यामध्ये धार्मिक उन्मादाचा जराही भाग नव्हता अश्या प्रकारची मखलाशी सतत केली जात आहे. काही वर्षांनी भारताची नाव पिढी हाच विकृत इतिहास खरा मानून चालेल अशी परिस्थिती आहे.
-शेफाली वैद्य