शिवशक्ती संगम - सनबर्न - समर्थ भारत

    03-Jan-2017   
Total Views |

शिवशक्ती संगम होऊन एक वर्ष होतंय.  पुन्हा तोच जानेवारी महिना, तेच थंडीचे, उत्साहाचे दिवस! मागच्या डिसेंबरमध्ये असेच पुण्यामध्ये अनेक घरांत मस्त उत्साहाचे वातावरण होते. ते आठवायचं कारण म्हणजे पुण्यामध्ये सनबर्न ह्या इलेक्ट्रॉनिक डान्स म्युजिक फेस्ट मुळे तापलेले वातावरण. अशा कार्यक्रमाकडे तरुणाईचा वाढता ओढा, त्याची आवश्यकता आणि होणारा विरोध रास्त आहे की नाही ह्याची चर्चा होतेय. ह्या संगीताचा आवाज खूप मोठा असतो, खूप आक्रमक असतो, त्यातलं संगीतामुळे एका ट्रान्समध्ये जाऊन मदहोश होऊन नाचता येते,  प्रचंड आवाजात रेकॉर्डेड  संगीत, डान्स, भव्यदिव्य प्रकाशयोजना, मोठा समुदाय ह्या सगळ्यामुळे त्याची क्रेझ आणि आकर्षण न वाटलं तरच नवल! आजच्या वाढत्या ताणतणावाच्या काळात स्वतःला विसरायला लावणाऱ्या, स्ट्रेस रिलीफ थेरपीसारख्या काम करणाऱ्या अशा फेस्टकडे सगळेच आकर्षित होणं स्वाभाविक. अशा लाउड इव्हेंटमुळे 'ऍड्रेनॅलीन' ह्या हार्मोनची पातळी वाढते म्हणे! हार्ट बिट्स वाढतात, श्वासोच्छ्वासाची गती वाढते, रक्तातली साखर, फॅटी अॅसिड वाढून पूर्ण शरीराच्या पेशींना पर्यायाने शरीराला उर्जेचा स्त्रोत मिळतो. कधीतरी असा डान्स, अशी उर्जा ही गरज असली तरी त्याच्या तिकीटाची किंमत, अंमली पदार्थांचा वापर, क्षणिक मिळणारा स्ट्रेस रिलीफ, क्षणिक मिळणारी उर्जा, केवळ आणि केवळ अशा कार्यक्रमांची लागणारी सवय मग साधेपणात न सापडणारं सुख, मग येणारं भांबावलेपण-हरवलेपण आणि ह्या सगळ्यासाठी होणारा पैशांचा चुराडा ह्याचा एकदा विचार नक्कीच करायला हरकत नाही.

ह्या पार्श्वभूमीवर शिवशक्ती संगमाला एक वर्ष होतंय. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये पुण्यामध्ये ह्या मोठ्या कार्यक्रमाचा फिवर होता. पश्चिम महाराष्ट्र प्रांत म्हणजे नाशिक, नगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर ह्या जिल्ह्यांमधील एक लाख एकसष्ठ हजार स्वयंसेवकांची नोंदणी झाली होती. त्यातली पुण्यातून साधारण साठेक हजार असावी. आणि पुण्यातील आणि आसपासहून साधारण पन्नास हजार इतर नागरिकांनी उपस्थिती लावली.

मागच्या दहा वर्षात आपले बदललेले सण समारंभ, खासकरून जन्माष्टमी, गणेशोत्सव आणि शिवजयंती, त्यावरून राजकारण, कर्णकर्कश्श संगीत आणि अनावश्यक झगमगाटह्या गोष्टींमुळे सार्वजनिक उत्सवांचा उबग यायला लागलाय. पण मग विविधतेतून एकता साधण्यासाठी टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक उत्सवांची आवश्यकताही तेवढीच वाटते. पण मग त्यावर उपाय काय? तर शिवशक्ती संगम हे त्यावर उत्तर आणि उदाहरण होतं. अर्थातच ह्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हा कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण, संघटन, समाजापर्यंत संघ पोहोचवणे किंवा अजूनही काही असेल. मी संघाच्या बाहेरची; म्हणून त्याचा फारसा विचार केला नाही. तो उद्देश किती सफल झाला हा विचार करण्याचं पण मला काही कारण नाही. पण बाहेरून जे दिसलं तेही मला तितकंच महत्वाचं वाटलं.

तर ३ जानेवारी २०१६ ला झाला एक लाख स्वयंसेवकांच्या एकत्रिकरणाचा शिवशक्ती संगम हा कार्यक्रम. त्याच्या कितीतरी दिवस आधी मी पुण्यातल्या कार्यकर्त्यांना अतिशय उत्साहाने संकल्पना राबवताना बघत होते.  संघाची शिस्तबद्धता हा कार्यक्रम राबवताना दिसत होती. त्यातून मला तरी सार्वजनिक उत्सवांमधून अपेक्षित असलेली एकता आणि संघभावनेने काम करण्याचे उत्तम उदाहरण म्हणून ह्या सोहळ्याचं विशेष कौतुक वाटले. अनेक वेगवेगळ्या व्यवस्थांमधून स्वयंसेवक आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत होते. वाहतूक, बैठक, आखणी, मंच, भोजन, संपर्क, वेगवेगळ्या जिल्ह्यांतून येणारे वेगवेगळे स्वयंसेवक, त्यांची नोंदणी, प्रात्यक्षिके, पद्य, कवायती, पर्यावरणपूरक ताटे वाट्या, कचरा आणि खरकटे ह्याचं तिथेच रिसायकल होईल अशा सोयी अशा आपापल्या आवडीच्या आणि क्षमतेच्या विभागात स्वयंसेवक विशेषतः तरुण आणि स्वाभाविकच पुण्यातले स्वयंसेवक हिरीरीने काम करताना दिसत होते. कार्यक्रमाचं तीन मजली व्यासपीठ शिवाजीमहाराजांच्या बॅकड्रॉप ने सजलं होतं आणि कार्यकर्त्यांत उत्साहाची एक लाट दिसत होती. कार्यक्रमासाठी पुण्याच्या बाहेरून येणाऱ्या स्वयंसेवकांसाठी जाताना शिदोरी देण्याची व्यवस्था होती. त्यासाठी आदल्या दिवशी पुण्यातल्या अनेक कुटुंबांकडून पुऱ्या आणि कोरडी चटणी ह्यांची पाकिटं एकत्र गोळा केली गेली. अतिशय उत्साहामुळे अपेक्षेपेक्षा अशी जास्त पाकिटे गोळा झाल्यामुळे पुण्यातल्या स्वयंसेवकांचंही त्यातच काम झालं असावं. एकंदर प्रत्येकजण एका गोष्टीच्या पूर्ततेसाठी आपल्या पूर्ण क्षमतेने, उत्साहाने आणि इतरांना बरोबर घेऊन काम करत होता. कोणत्याही व्यक्तिमत्व शिबिराशिवाय अनेक लहान तरुण कार्यकर्ते संघभावनेने काम करण्याचं ट्रेनिंग घेत होते.

शिवशक्ती संगम होण्यापूर्वी आणि झाल्यावर एकूणच काय दिसलं ?

शांततापूर्ण मार्गाने नियोजन, व्यवस्थापन आणि छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा विचार, कामाची विभागणी, कार्यकर्त्यांची उतरंड, स्नेहपूर्ण वातावरणात होणारा कार्यक्रम, त्यायोगे साधली जाणारी 'आपण एक आहोत, संघटीत आहोत'ही भावना ह्या सगळ्याने वातावरण भारलं होतं. काही ठळक गोष्टी जाणवल्या, केवळ एका हाकेवर आणि कोणत्याही भव्य दिव्य भोजन कार्यक्रमाव्यतिरिक्त लोक एकत्र जमू शकतात जेव्हा संघ बोलावतो आणि जेव्हा त्यांचे हेतू शुद्ध असतात. संघ कार्यक्रमात आणि केवळ संघ कार्यक्रमातच लोक आपली जात, वय, हुद्दे, आर्थिक सामाजिक स्थान सगळं विसरून एकत्र येतात. आकर्षक भेटवस्तू देऊन ट्रक भरभरून टाळ्या वाजवायला लोकांना घेऊन यायचे ह्याची संघाला गरज नाही. एखादा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम राजकीय व्यक्ती व्यासपीठावर नसतानासुद्धा होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांसारखी राजकीय व्यक्तीदेखील संघ कार्यक्रमात व्यासपीठावर नसते आणि त्यामुळे ती नाराज नसते.  आपला दर्जा किंवा हुद्दा विसरून कार्यकर्ते मिळेल ते काम संघभावनेने करतात, वेळ पडली तर व्हीआयपी माणूसदेखील खुर्ची सोडून जमिनीवर बसतो. केवळ सज्जन असणे पुरेसे नाही तर ताकदीचे प्रदर्शनदेखील कधीतरी गरजेचे असते. इतके सगळे लोक एकत्र असतात, जमवून घेतात, कार्यक्रम पार पडतात. नक्कीच ते सहिष्णू असले पाहिजेत! व्यक्तीस्वातंत्र्यवाद जपत एकटं पडणं नाही तर आपापसातले फरक विसरून एकत्र येणं, मदत करणं, आणि उत्तम सामाजिक आयुष्य व्यतीत करणं ही माणसाच्या उत्क्रांतीची पुढची पायरी झाली. तीच - जी हिंदू जीवनपद्धतीत दिसते. गुळमुळीत वाटते; पण सर्व लोकांशी जमवून घेणे, पूर्ण समाजाचा एकत्र विचार करणे आणि पर्यायाने समाजात समरस होणे; हीच जीवनपद्धती जी अशा कार्यक्रमांमधून दिसते. कोणतीच संघटना ही व्यक्तिकेंद्री असेल तर नव्वद वर्षे टिकाव धरून राहणार नाही. व्यक्तिकेंद्री संघटनांचे काय झाले ह्याला इतहास गवाह आहे. नक्कीच संघ ‘विचारधारेवर’ आधारलेला असला पाहिजे. जरा डोळे उघडे ठेऊन बघितलं तर जाणवतं  समता आणि एकता ह्या गोष्टी इतर कोणत्याच कार्यक्रमांत आपल्याला एवढ्या ठळकपणे दिसत नाहीत. 

आज ह्याच दिवसात हा सनबर्न फेस्ट होतोय. मुलगी मोठी होतेय त्यामुळे स्वाभाविकच माझी भूमिकाही बदलत जातीये. ह्या दोन कार्यक्रमांकडे मी तुलनात्मक बघते, माझ्याकरिता नाही तर मुलीकरिता!  मग त्यातले अधिक टिकणारे काय ह्याचा विचार आपसूकच येतो.  आपल्या सगळ्यांमध्येच भरपूर उर्जा असते. त्याचा चांगला विनियोग व्हावाच लागतो. ती बाहेर पडावी लागते. नाहीतर बेफाम वेगात गाड्या चालवणे, जिथे सर्जनशीलता दाखवायला, उर्जा वापरायला  चिक्कार वाव असतो अशा गणपतीसारख्या सण समारंभांमध्येही केवळ आणि केवळ नाच गाणी करणे एवढेच होते. तेही अधून मधून करायला हरकत नाही. पण फक्त तेवढेच करणारेही कमी नाहीत.  फार कमी वेळा तरुणपणी कुणी गॉडफादर भेटतो, तो अमुक अमुक कर असं सांगतो आणि आपलं आयुष्य उजळून जातं. काही गोष्टी आपण आपल्याच शोधाव्या लागतात, काही  पालक म्हणून आपण पाल्यांना दाखवू शकतो. कधी आपल्या स्वतःच्या वर्तणुकीने उदाहरण घालून देऊन, कधी त्यांना करायला सांगून. नुसतंच ‘अमुक अमुक करू नका’ हे सांगितलं तर आजकाल कोणी ऐकणार नाही. माझ्या मुलीला टीव्ही बघू नकोस म्हणून सांगितलं तर ती ऐकत नाही, पण ‘चल आपण काहीतरी खेळुयात’ म्हटलं की ती लग्गेच टीव्ही बंद करते.

ह्यातली तुलना ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने करायची. कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं तेही प्रत्येकाने ठरवायचं. मात्र आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या गोष्टींकडे निश्चितच डोळेझाक करून चालणार नाही. वैयक्तिक स्तरावर कायमस्वरूपी स्किल्स वाढविणाऱ्या, आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या, पैशांशिवाय पण निखळ आनंद देणाऱ्या, समाज उपयोगी पडणाऱ्या, राष्ट्रनिर्माण कार्यात खारीचा का होईना वाटा आहे अशी भावना निर्माण करणाऱ्या, एकजुटीची भावना निर्माण करणाऱ्या, ताण हलके करणाऱ्या अशा कितीतरी शाश्वत गोष्टी आहेत. शिवशक्ती नंतर पुढे काय असा मलाही प्रश्न पडला होता. पुण्यामध्ये ‘समर्थ भारत’ म्हणून अभियान सुरु झालं आहे. शिवशक्ती संगमासाठीसाठी नोंदणी झालेल्या आणि त्यांच्या कुटुंबियांना तसेच इतर राष्ट्रीय विचार असणाऱ्या सर्वच उत्सुक सज्ञान व्यक्तींना संघ आणि परिवारातील वेगवेगळ्या समाजोपयोगी कामांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी हे अभियान राबविले जात आहे.  संघ परिवारात अनेक इतर संघटना आहेत ज्या महाविद्यालय स्तरावर, किशोरवयीन मुलींसाठी, महिलांसाठी, आदिवासींसाठी, शेतकरी, मजुरांसाठी काम करतात. ह्या कामात महाविद्यालयीन तरुण तरुणी, महिलादेखील सहभागी आहेत हे संघेतर व्यक्तींना माहित नसतं. काहीतरी काम करण्याची तर इच्छा आहे, थोडासा वेळ पण देऊ शकतो,  पण नक्की काय ते कळत नाहीय त्यांनी ‘समर्थ भारत’ अभियानाची आसपासच्या कार्यकर्त्यांकडे चौकशी करायला हरकत नाही. पुणे सोडून इतर ठिकाणी कार्यकर्ता जोडणीसाठी किंवा सहभागी होण्यासाठी अशा अभियानाचीच गरज आहे असेही नाही. आपण स्वतःहूनदेखील सहभागी होऊ शकतो, सहभागी करून घेऊ शकतो. गरज आहे ती विचार करण्याची आणि इच्छाशक्तीची!

-विभावरी बिडवे

 

विभावरी बिडवे

बी. ए. (मानसशास्त्र), एल एल. बी. पुणे येथे दिवाणी आणि मिळकत हस्तांतर विषयक वकिली सुमंत्र सेंटर ह्या संस्थेची विश्वस्त म्हणून कार्यरत. कोथरूड, पुणे येथील वस्त्यांमध्ये सदर संस्थेतर्फे उपचारात्मक अभ्यासिका चालविल्या जातात. पूर्वी दिव्य मराठी मध्ये थोडे कायदेविषयक व इतर लिखाण. इतरत्र स्फुट लेखन.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121