सुमित घरात येऊन पाहतो तर, २-४ जुन्या डायऱ्या आणि पुस्तके मांडून, दुर्गाबाई टेबलापाशी बसून लिहित आहेत! “आजी, काय लिहित आहेस?”, सुमितने आश्चर्याने विचारले.
“सूर्योपासनेच्या ज्ञानयज्ञात आहुती घालते रे!”, दुर्गाबाई म्हणाल्या.
“सुम्या!”, आबा म्हणाले, “मागचा आठवडाभर तुझी आजी लिहित बसली आहे. दुर्गाबाई, आता आम्हाला दोघांनाही सांगा, काय लिहिताय ते!”
“संक्रांतीचे पदार्थ आणि त्यांची पाककृती, लिहित आहे.”, दुर्गाबाई वही बाजूला ठेवत म्हणाल्या.
“मस्त उपक्रम आहे आजी! तू लिहून काढ, मी तुला दहा xerox काढून देतो! आणि त्यातली एक आईसाठी नेतो. फार गरज आहे तिला या शिक्षणाची!”
“काय काय पदार्थ आहेत तुझ्या यादीत?”, आबांनी उत्सुकतेने विचारले.
“तुम्हाला अनुक्रमणिका वाचून दाखवते ...”, दुर्गाबाई नाकावर चष्मा चढवत म्हणाल्या.“संक्रांतीला - पोंगल, बिहु, लोहरी, माघी, खिचरी काही म्हणले तरी – डाळ तांदळाची खिचडी, तांदळाची खीर, भरपूर भाज्यांची भाजी आणि तीळ-गुळ करतात. असा ठराविक साचा असून सुद्धा, त्यात खूप वैविध्य दिसते -
“पंजाबची – ‘तिल चावली’ म्हणजे तीळ आणि गुळ घालून केलेला पुलाव, आणि ‘रस्से का खीर’ म्हणजे उसाच्या रसात केलेली तांदळाची खीर.
“उत्तराखंडची – घुगुतीमाला. उसाचा रस आणि गुळ घालून कणिक मळायची. त्या पिठाच्या छोट्या छोट्या तलवारी, ढाली, खंजीर करून तळायच्या. आणि खाऊच्या तलवारींची माळ मुलांच्या गळ्यात घालायची.
“उत्तर प्रदेशची – खिचडी. इथे संक्रांतीला खाण्यापेक्षा गंगास्नानाला जास्त महत्व!
“राजस्थानची – तीळ-पट्टी, खीर, घेवर, पकोडी, आणि तिळाचे लाडू.
“मध्यप्रदेशची – गजक, तिळगुळाची पातळ चिक्की.
“बिहारचा – दही-चुडा म्हणजे दही पोहे, लाल भोपळ्याची गोड भाजी, तीळकुट, आणि तीलवा म्हणजे तीळ, गुळ, तांदूळ आणि पोहे घालुन केलेला तिळगुळ. तर रात्रीच्या जेवणात - खिचडी, चोखा म्हणजे खूप भाज्यांची भाजी, पापड, तूप आणि लोणचे.
“आसामचे – तीळ पीठा म्हणजे तांदळाच्या आंबवलेल्या पीठाचे लहानसे धिरडे करून त्यात तीळ-गुळ-नारळाचे सारण भरून केलेला रोल. आणि, कोट पीठा म्हणजे गुळ, केळे आणि सपिठी एकत्र मळून तुपात तळलेल्या वड्या. या शिवाय शुंग पीठा, घीला पीठा आणि पोडा पीठा.
“ओडिशाचा – मकर चौला म्हणजे तांदूळ, केळी, नारळ, गुळ आणि तीळ घालून केलेली गोड खीर. दुधाचा छेन्ना, आणि रसगुल्ला.
“बंगालचे – खेजुर गुड म्हणजे खजूर आणि गुळाचा लाडू. खिचुरी म्हणजे खिचडी. आणि गोकुल पीठे – एकदम लाजवाब डिश आहे! गुळ, खवा आणि नारळाचे सारण भरून, तुपात तळून, पाकात घोळलेला कणकेचा मोदक!
“गुजरातचे – उंधियो आणि तीळ, दाणे आणि गुळ घालून केलेली चिक्की.
“महाराष्ट्रात भोगिला – खिचडी, वांग्याची भाजी, आणि तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी. आणि संक्रांतीला – तिळगुळाचे लाडू किंवा वडी आणि गुळाची पोळी.
“कर्नाटकचे – एल्लू बेळ्ळा म्हणजे पांढरे तीळ, दाणे, खोबरे आणि गुळ याचा तिळगुळ. या भागात, संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी, गायी, बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढतात.
“आंध्रचा – अप्पलू आणि अरीसेळू. हा दुसरा प्रकार फार जिकरीचा आहे, आपल्या अनारस्यासारखा. दोन दिवस तांदूळ भिजवून वाळवून पीठ करायचं. गुळाच्या पाकात तीळ घालून मळायच. आणि त्याच्या पुऱ्या तळायच्या. आंध्र मध्ये सुद्धा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी, गोधनाची पूजा करतात. आणि तिसऱ्या दिवशी रेड्यांची झुंज, कोंबड्यांची झुंज लावतात.
“आणि सर्वात शेवटी तमिळ नाडूचे मुरुक्कू आणि पायसम. पहिल्या दिवशी - भोगी पंडीगईला जुन्या कपड्यांची होळी करतात. दुसऱ्या दिवशी पोंगलला नवीन पातेल्यात खीर करून सूर्याला नैवेद्य दाखवतात. तिसऱ्या दिवशी माट्टू पोंगल. या दिवशी, गुरांना सजवून त्यांची मिरवणूक काढतात. त्यांच्या अंगावर झूल घालतात. शिंगाना सोनेरी कवच घालतात. त्यांना गोडधोड करून खाऊ घालतात.”, दुर्गाबाईनी इत्थंभूत माहिती दिली.
“आजी, तू हे सगळे पदार्थ नुसतेच लिहिणार आहेस, की करणार पण आहेस?”, सुमितने विचारले.
“करणार! करणार! प्रत्येक पदार्थ करणार आणि तु पास केलास की मगच final!”, दुर्गाबाई म्हणाल्या.
“दुर्गाबाई, हा यज्ञ आवडला! आहुती माझ्या डोक्यात गेली नाही तरी पोटात जाणार!”, आबा खुशीत म्हणाले,
“काय आहे संक्रांतीचा उत्सव आहे सुगीचा, भरपूर भाज्यांचा भोग घेण्याचा. आनंद भोगण्याचा. सूर्याला भोग चढवण्याचा. सूर्य आणि अग्नी पूजेचा.
“लोकांना एकत्र आणणारा हा सण आहे. एकत्र जेवण करणे, एकमेकांकडे जाऊन तिळगुळ वाटणे, हळदी-कुंकू निमित्त एकमेकींकडे जाणे, मैत्रीच्या शपथा घेणे, एकत्र लोकनृत्य करणे आणि एकत्र खेळ खेळणे. या दिवशी आसामला बिहू, काश्मीरला छज्जा, पंजाबात भांगडा नृत्य रंगते. मध्य भारतात, गुजरात पासून आंध्र पर्यंत एकत्र येऊन पतंग उडवतात. तर दक्षिण भारतात प्राण्यांचे खेळ रंगतात - कुठे एडक्यांची झुंज, कुठे कोंबड्यांची झुंज तर कुठे जल्लीकटू.
“एकूण, हसत, नाचत, खेळत, शेकोटी पेटवून, गोड पदार्थ करून सूर्याचे उत्तरेला स्वागत होते!”, आबा म्हणाले.
- दिपाली पाटवदकर