क्लीन वर्सोवा : समुद्र सफाईतील सगळ्यात मोठे अभियान

    24-Jan-2017   
Total Views | 1



गेल्या काही काळापासून प्रदूषणात खूप वाढ झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे माणसाची बदलती जीवनशैली. मात्र जीवनशैली बदलाना देखील प्रकृतीची काळजी घ्यायला पाहीजे याची जाणीव मुंबईतील वर्सोवा येथे राहणाऱ्या अॅड. अफरोज शहा यांनी जनतेला करुन दिली. वर्सोवा येथील समुद्र तटावर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्लास्टिकच्या कचऱ्याच्या समस्येला दूर करण्यासाठी शाह यांनी स्वत: सफाई काम हाती घेतले आणि आज हे अभियान केवळ अभियान राहिले नसून एक आंदोलन झाले आहे. या अभियानाची नोंद जगातील सगळ्यात मोठ्या समुद्रतट सफाई अभियानात करण्यात आली आहे. या बाबत अॅड. अफरोज शहा यांनी मुंबई तरुण भारतशी खास संवाद साधला.


हे अभियान ऑक्टोबर २०१५ मध्ये सुरु करण्यात आले होते. तेव्हा पासून आतापर्यंत जवळ जवळ ४३०० टन कचरा आणि प्लास्टिक या समुद्र तटावरुन गोळा करण्यात आले आहे. केवळ एक वर्षातच या समुद्र तटावरचे दृश्य पूर्णपणे बदलले आहे. अशी माहिती शहा यांनी दिली.




या अभियानाची सुरुवात कशी झाली तसेच इतके मोठे कार्य करण्याची प्रेरणा कुठून मिळाली हे विचारले असता ते म्हणाले की,

मी जेव्हा माझ्या घरातील बाल्कनी मधून समुद्रतट बघायचो मला केवळ कचरा आणि प्लास्टिक दिसायचं, यामुळे मला फार त्रास व्हायचा, म्हणूनच यासाठी आपणच काहीतरी केलं पाहीजे या भावनेतून हे अभियान सुरु केले. त्यानंतर हळू हळू अनेक लोक या अभियानासोबत जोडले गेले. आज विविध संस्थांमधील कार्यकर्ते आणि बृहन्मुंबई कॉर्पोरेशन म्हणजेच बीएमसीचे कर्मचारी मिळून हे अभियान पुढे नेत आहे. असेही त्यांनी सांगितले.

वकिलीचा व्यवसाय सांभाळत हे भले मोठे कार्य करत असताना अनुभव कसा होता, हे सगळे एकत्र जमणे कसे शक्य झाले असे विचारले असता ते म्हणाले की,

कार्य मोठं असलं तरी ती करण्याची इच्छा महत्वाची असते. हे कार्य म्हणजे प्रेमात पडण्यासारखं किंवा लग्न करण्यासारखं आहे. वकिली सांभाळत देखील मी माझ्या घरच्यांसाठी माझ्या प्रिय व्यक्तिसाठी वेळ काढतोच की, हे ही तसंच आहे. प्रकृती वर असलेल्या प्रेमापोटी हे कार्य सोपं झालं. आपलं आयुष्य खूप सोपं असतं. मात्र आपणच सतत तक्रार करत असतो. आपण केलेल्या कचऱ्यासाठी आणखी कोणाला दोष देण्यापेक्षा स्वत: त्यासाठी कार्य करणं महत्वाचं आहे.

आजू बाजूच्या मच्छीमार वस्तीत जागरुकता अभियान राबवत असताना अनुभव कसा होता? त्यांची या अभियानाला काय प्रतिक्रिया मिळाली? विचारले असता ते म्हणाले की,

पहिल्यांदा त्यांनाही धक्का बसला. एकटा माणूस इतकं मोठं काम करायला निघालाय, का बरं? ते मला बरेचदा प्रश्न विचारायचे का करताय तुम्ही? हे तुमचं काम नाही. सरकार करेल स्वच्छता. मात्र हळू हळू त्यांना परिस्थिती समजावली तसेच आपल्याला काय करता येईल हे ही समजावण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळेच त्यांचं देखील खूप सहाय्य या कार्यासाठी मिळालं.

आज जेव्हा तुम्ही तुमच्या बाल्कनीतून त्याच समुद्रतटाचे दृश्य बघता तेव्हा कसं वाटतं? हे विचारल्यावर ते म्हणाले की,

आनंद होतो. नक्कीच आनंद होतो, मात्र समाधान मिळत नाही. कारण ही एक मोठी आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. आणि त्यासाठी न थांबता कार्य करणं आवश्यक आहे. असं असताना समाधान मानून कसे चालेल. त्यामुळे ते दृश्य मला आणखी कार्य करण्यासाठी प्रेरित करतं. 

"मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर लोग साथ आते गये और कारवां बनता गया" - मजरूह सुलतानपुरी

या शेर प्रमाणेच हळू हळू पाच बॅग पासून सुरु झालेले हे कार्य अतिशय मोठ्या प्रमाणात वाढले आहे. २५०० हून अधिक स्वयंसेवक या कार्यात जोडले गेले आहेत. सोशल मीडियावरुन या कार्याला भरगोस प्रतिसाद मिळाला आहे. आणि दिवसेंदिवस हे कार्य वाढत जात आहे.



आता पर्यंत सुमारे ४.५ दशकक्ष किलो कचरा गोळा केल्याने जागतिक पातळीवर अफरोज शहा यांना सन्मानित करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रातर्फे देखील त्यांना गेल्या वर्षी 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' या सन्मानाने गौरवण्यात आले आहे.

दरवेळी प्रशासन आणि सिस्टमला दोष न देता स्वच्छतेसाठी सामान्य माणसाने देखील कार्य करणे आवश्यक आहे, व तसे केल्यास समाजात आणि परिस्थितीत एक अमूलाग्र बदल घडू शकतो हे अफरोजने सिद्ध केले आहे.

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121