एक साधक, झेन गुरूकडे ध्यान करायला शिकत होता. काही दिवस गुरूंबरोबर बसून शिकल्यावर, एक दिवस गुरूंनी त्याला सांगितले, ”आता तू एकांतात ध्यान करायला सुरवात कर.” तेंव्हा शिष्य म्हणाला, “मी उद्यापासूनच रोज दुपारी १२ वाजेपर्यंत एकांतात ध्यान करेन.” झेन गुरूने मान हलवून अनुमती दर्शवली.
शिष्य रोज सकाळची कामे आटोपून ध्यानाला बसत असे. आणि बाराचे टोले पडले की मगच खोलीतून बाहेर येत असे. दहा बारा दिवस शिष्याचा नियम निर्विघ्नपणे पार पडला. एक दिवस, अजून बारा वाजतच होते, की गुरूंनी दार ठोठावले! “अरे! दार उघड!” शिष्याने घड्याळाकडे पहिले. बाराला पाच मिनिटे होती. तो क्षणभर थांबला, इतक्यात गुरुंनी पुन्हा दार वाजवले. “लवकर दार उघड! मी आहे, तुझा गुरु आहे, दार उघड!”
शिष्याने उठून दार उघडले. दार उघडताच झेन गुरु त्याच्यावर बरसले, “का उघडलस दार? बारा वाजेपर्यंत एकांतात ध्यान करायचा नेम केला होतास ना? मग नेम का मोडलास? बाराच्या आधी का उठलास?”
आम्ही पण या शिष्यासारखे, तेच तेच संकल्प दर वर्षी करतो आणि जानेवारी संपायच्या आत मोडतो. तेच तेच नेम पुन्हा पुन्हा करतो, काही दिवस चालवतो आणि मग बंद पाडतो. आमचाच आमच्या निश्चयावर विश्वास नसतो!
गुरु-शिष्याची ही गोष्ट सामान्य झाली. आता एक असामान्य गोष्ट. ती अशी की - रामदास स्वामी शिवाजी महाराजांना ‘निश्चयाचा महामेरू’ म्हणतात! उन, पाऊस, वादळ, वाऱ्यात अचल उभा असणाऱ्या पर्वतराजा प्रमाणे, महाराजांचा निश्चय कोणत्याही मोहाला बळी पडला नाही. म्हणूनच, त्यांच्या ‘हिंदवी स्वराज्याच्या’ निश्चयावर कित्येकांनी प्राण ओवाळून टाकले!
ज्ञानेश्वर म्हणतात – एकच नियम करायचा, की केलेला नेम जीवा पलीकडे सांभाळायचा. प्राणांहून अधिक आपला नेम जपायचा.
आता नियमुची हा एकला | जीवे करावा आपुला |
जैसा कृतनिश्चयाचिया बोला | बाहेरा नोहे || ६.३८० ||