शतकापूर्वी प्रकाशित झालेल्या, जुन्या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचा मागोवा घेताना गेल्या पाच वर्षात अनेक दुर्मिळ पुस्तकांचा खजिना हाती लागला. जगातील अनेक भाषातील किमान पाच लाख पुस्तके, मायक्रोसॉफ्ट कॉंर्पोरेशन आणि गुगल नेटवर्क यांच्या सौजन्याने आणि सहकार्याने, सॉफ्ट कॉपी मध्ये निर्माण केली गेली. दुर्दैवाने यातील बहुतांशी पुस्तके आज, भारतातल्या किंवा महाराष्ट्रातील ग्रंथसंग्रहालयात उपलब्ध नाहीत.
मूळ लेखक रेव्हरंड अल्फ्रेड मनवरिंग, प्रकाशन १८९९, क्लारेन्डन प्रेस, ऑक्सफर्ड
"Marathi Proverbs" अर्थात मराठी वाकप्रचार आणि बोली भाषेतील म्हणी, हे शतकापूर्वी, १८९९ मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक. रेव्हरंड आल्फ्रेड मनवरिंग हा ख्रिस्ती धर्मोपदेशक, त्याकाळी म्हणजे साधारण सन १८४० ते १८९० मध्ये महाराष्ट्रात ख्रिस्ती धर्मप्रसाराचे काम करीत होता. त्याच्या अनोख्या आणि दीर्घकालीन अभ्यासाचे फलित म्हणजे हे पुस्तक.
रेव्हरंड अल्फ्रेड मनवरिंग मराठी भाषा शिकलेच परंतु पुढे जाऊन त्यांनी मराठीतील अनेक बोली भाषांचासुद्धा सखोल अभ्यास केला. शतकापूर्वीच्या महाराष्ट्रातील बोलीभाषेतील अनेक वाकप्रचार आणि म्हणींचे संशोधन आणि संग्रह करून त्याचे उत्तम संपादन रेव्हरंड मनवरिंग यांनीच केले. मराठी लिपीत लिहिलेल्या म्हणी, त्याचे इंग्रजीत शब्दशः भाषांतर आणि त्याचा इंग्रजी भाषेतील दिलेला भावार्थ असे या पुस्तकाचे स्वरूप आहे .
मूळ लेखकाने या पुस्तकातील सर्व म्हणी-वाक्प्रचारांचे, त्यातील संदर्भानुसार वर्गीकरण केले आहे. शेतीविषयक, प्राणीविषयक, मानवी शरीर आणि त्याच्या अनेक अवयवाविषयक याबरोबरच नितीमत्ता, दैनंदिन आहार, आरोग्य, पैसा, व्यक्तींची नांवे, निसर्ग, परस्परातील नाते संबंध, धर्म, व्यापार आणि व्यवसाय अश्या अनेक विषयांचा संदर्भ असणाऱ्या साधारण दोन हजार म्हणी आणि वाक्प्रचार यात समाविष्ट केले आहेत. इंग्लंड मधून येउन मराठी भाषेचा परिचय आणि अभ्यास करून त्यावर प्रभुत्व मिळविणे आणि सर्वत्र प्रवास करून, स्थानिक लोकांशी संपर्क साधून अश्या म्हणी आणि वाक्प्रचार संग्रहित करणे, असे मोठे कष्टाचे आणि चिकाटीचे काम सातत्याने रेव्हरंड अल्फ्रेड मानवरिंग यांनी केले. असे हे अनोखे पुस्तक हाती आल्या नंतर, त्याचा परिचय मराठी भाषा प्रेमीना करून देणे आवश्यक वाटले.
काही शतकांपासून प्रचलित असलेल्या मराठी बोली भाषेतील या म्हणी आणि वाकप्रचारांचा अभ्यास विलक्षण आनंददाई आहे. मराठी बोली भाषेचा प्रदेशागणिक आणि दर पाच दशकांनंतर बदलणारा लहेजा आणि बाज, तत्कालीन समाज मनातील श्रद्धा आणि भक्ति भावना, व्यक्ती आणि कुटुंब यातील परस्पर रोटी-बेटी अथवा मंगलकार्य आणि दैनंदिन व्यवहार, रूढी आणि प्रथा यांचा कुटुंब संस्थेवरील प्रभाव, अंधश्रद्धा आणि लोकभ्रम याची तत्कालीन समाज लोकमानंसावर असलेली मजबूत पकड या सर्वाचा परिचय होत राहतो. या बरोबरच तत्कालीन समाजातील अश्या अनिष्ठ प्रथा आणि परंपरांचा, अंधश्रद्धांचा आणि लोकभ्रमाचा उपरोधिक उल्लेख फार रंजक असतो आणि एका साक्षर-सुसंस्कृत-सज्जन आणि नेमस्त अश्या समाजातील गटाची ओळख सुद्धा या म्हणी आणि वाकप्रचारांच्या अभ्यासातून होते.
काही शतकांपूर्वीच्या शेती व्यवसायाचे व्यवस्थापन कौशल्य, बदलत्या वार्षिक हवामानाचा अचूक अंदाज आणि त्यानुसार चातुर्याने केले जाणारे बदल, शेतकरी आणि मजूर, मालक आणि नोकर यांचे परस्पर नाते आणि त्यावर म्हणींच्या माध्यमातून केली जाणारी मार्मिक टिप्पणी, शेतीसाठी वापरली जाणारी आयुधे-अवजारे आणि त्यांचा, मानवी स्वभावधर्म आणि धारणांशी साधर्म्य किंवा भेद दाखवण्यासाठी केलेला वापर फार सूचक आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या मानसिकतेचा अंदाज, या व्यक्ती संदर्भात वापरलेल्या म्हणींच्यामुळे श्रोत्याला येत असावा.
गृहीणींचे कुटुंब प्रेम, घरच्या दैनंदिन व्यवहाराचे कौशल्य आणि व्यवस्थापन चातुर्य, कुटुंब आणि समाजाची खाद्य संस्कृती आणि गृहिणीचे रसना कौशल्य, पती-पत्नी मधील संवाद अश्या समाजाच्या अनेक पैलूंची ओळख आणि परिचय, या म्हणी आणि वाकप्रचारांच्या अभ्यासातून होतो. सण-उत्सव-व्रत-वैकल्ये यांचे व्यक्ति-कुटुंब आणि समाजजीवनातील महत्व आणि त्यातून दिसणारी दीर्घ संस्कृतीची परंपरा या म्हणींच्या चार-सहा शब्दांच्या भावार्थ आणि गूढार्थातून व्यक्त होत रहाते.
जंगली प्राणी-कीटक-पाळीव प्राणी यांची अंगभूत, नैसर्गिक वैशिष्टे यांचा मानवी भावना–धारणा-स्वभावधर्म आणि मानसिकतेशी जोडलेला सांधा आणि त्यातील साधर्म्य अथवा भेदाची तुलना, आपल्याला एका चतुर, विवेकी तरीही मिश्किल समाजाची ओळख सांगते. या म्हणींच्या माध्यमातून बोली भाषेतील आणि लिखित साहित्यातील चिन्ह संस्कृती आणि चिन्ह संकेतांचा (Symbol, Symbolism and Allegories) अद्भूत अनुभव घेता येतो.
प्रस्तावनेत रेव्हरंड मनवरिंग म्हणतात, माझा हा संशोधनाचा आणि पुस्तक लिहिण्याचा प्रपंच, काही विशेष हेतूने केला आहे. बोली भाषेत या म्हणींचा वापर करताना त्या त्या बोली भाषेचा गोडवा, असे वाकप्रचार वापरणाऱ्या समाजाचे चरित्र आणि परिचय असे काही हेतू मनामध्ये आहेत. नव्याने मिळणारे इंग्रजी भाषेचे शिक्षण, नव्याने वाचायला मिळणारे साहित्य आणि वेगाने बदलणारा समाज यामुळे आत्ताच्या पिढीला परिचित असणारे हे वाकप्रचार कालांतराने पुढच्या पिढीपर्यंत कदाचित पोहोचणार नाहीत याची जाणीव मला आहे .
अश्या संशोधनात मला मिळालेले सर्वच वाकप्रचार या पुस्तकात समाविष्ट आहेत असा माझा दावा नाही किंवा संशोधनात सर्वच वाकप्रचार सापडले आहेत असेही माझे म्हणणे नाही. समाजाच्या भावना लक्षात घेऊन काही मराठी भाषिक अथवा इंग्रजी भाषिक व्यक्ती किंवा ज्ञातींना अपमानकारक वाटणारे अनेक वाकप्रचार या संग्रहात जाणीवपूर्वक समाविष्ट केले नाहीत. इंग्रजी भाषेच्या वाचकांना कदाचित या पुस्तकातील वाकप्रचार संदर्भहीन वाटतील किंवा त्यांच्या समाजातील भाषा आणि चालीरीतींशी एखाद्या वाक्प्रचाराचा अर्थबोध होणार नाही. अश्या वाचकांची मी क्षमा मागतो.
लेखक प्रस्तावनेत पुढे म्हणतात… अनेक उपलब्ध पुस्तके, अनेक स्त्री आणि पुरुषांशी केलेला संवाद, भारतीय समाजातील प्रचलित ज्ञाती व्यवस्था या सर्व मार्गाने माझे संशोधन मी पूर्ण करू शकलो. या संशोधनात अनेक मराठी भाषिक भारतीय स्नेही - सुर्हुदांचे उत्तम सहकार्य मला प्राप्त झाले. त्या सर्वांचा मी ऋणी आहे.
कुठल्याही लिखित साहित्याचे जे महत्व आपण जाणतो तितकेच किंबहुना थोडेसे जास्त महत्व मराठी लोकसंस्कृतीत परंपरेने जपलेल्या, रेव्हरंड अल्फ्रेड मनवरींग यांनी दीडशे वर्षांपूर्वी संकलित केलेल्या या म्हणी आणि वाकप्रचारांच्या खजिन्याला निश्चितपणे द्यायला हवे.
उत्सुक आणि जाणकार मराठी वाचक या संकलनाचे निश्चित स्वागत करतील याची मला खात्री आहे.
लिहू आनंदे – वाचू आनंदे ... !!
-अरुण फडके