तामिळनाडूतील चेन्नईच्या मरिना बीचवर हजारो तामिळ तरुण रस्त्यावर उतरले आणि जलीकट्टूच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीच्या विरोधात आणि ही बंदी घातली जावी म्हणून न्यायालयात धाव घेणार्या मंडळींच्या विरोधात घोषणा देऊ लागले. ’’जलीकट्टूला दोन हजार वर्षांहून अधिक वर्षांची द्रविडी परंपरा आहे,’’ असे यांचे म्हणणे आहे. या द्रविडी परंपरेचाच एक भाग म्हणजे जलीकटू, असेही ही मंडळी मानतात. यावर्षी न्यायालयाने परखड भूमिका घेतल्याने संक्रांतीच्या मोसमात हा विषय रंगला आहे. मुळात न्यायालयाने या विषयात हस्तक्षेप का केला, हे समजून घेण्याची गरज आहे. जलीकटू या पारंपरिक सणात ’कंगायम’ जातीच्या बैलाला हाताळून त्याच्या शिंगावर लावलेली बक्षिसाची रक्कममिळविण्यासाठी ही स्पर्धा होते. २०१० पासून काही तामिळ व्यक्ती व संघटना न्यायालयात ’कंगायम’ या बैलांना क्रूरपणे वागविल्या जाण्याच्या विरोधात तक्रार करीत आहेत. मोकळ्या हौदात सोडण्यापूर्वी गच्च बांधून बैलाला चेतविण्यासाठी त्यांच्या शेपटांना चावे घेतले जातात, त्यांच्या डोळ्यांत बोटे घातली जातात किंवा त्यांच्या नाकपुड्यांत तिखट घालून त्यांना सोडले जाते. उधळलेल्या या बैलावर लोक तुटून पडतात किंवा त्यापासून बचाव करण्यासाठी पळ काढतात. हा बैल अधिकाधिक उधळावा म्हणून त्याच्या शेपट्या ओढल्या जातात व त्यांना अमानुषपणे वागविले जाते. जलीकटूच्या विरोधात न्यायालयाची दारे ठोठावणार्यांनी या सगळ्याची चित्रिकरणे व छायाचित्रे न्यायालयाला सादर केली आहेत. यातील बहुतांश छायाचित्रे आजही गुगल सर्चवर पाहायला मिळतात. जलीकट्टूमध्ये लोक जायबंदी होतातच, परंतु त्याचबरोबर हे बैलदेखील जायबंदी होतात. न्यायालयाने पशुहिंसा प्रतिबंधात्मक कायदा, १९६०च्या अतर्ंगत ही कारवाई केली आहे. थेट सर्वोच्च न्यायालयानेच ही कारवाई केल्याने केंद्र व राज्य सरकारला यात कोणताही हस्तक्षेप करता येत नाही. न्यायालयासमोर पुन्हा जाण्याची मागणीही जोर धरत आहे. पण ती खूप लांबची लढाई असेल. २०१० पासून हे प्रकरण न्यायालयासमोर सुरू आहे. या निमित्ताने चर्चेला आलेला विषय म्हणजे हिंदूंच्या सणांना विरोध करणार्या न्यायालयांचा निषेध करणारे संदेश. जलीकटू प्रकरण सुरू झाल्यानंतर असे संदेश मुक्त माध्यमांवर फिरू लागले. होळीच्या वेळी पाणी न उडविण्याची विनंती करणारे संदेश, दहीहंडीवर बंदी घालण्याची मागणी या आणि अशा कितीतरी सणांमधील अपप्रवृत्तींना विरोध करण्याच्या मागण्यांना ‘हिंदूविरोधी’ ठरवून त्याचा निषेध करण्यात आला. नव्वदीच्या दशकात ’इस्लामखतरेमे’च्या बांगा ठोकणार्यांच्या जवळ जाणारे हे संदेश होते. कोणत्याही समाजाच्या विचार करण्याच्या पद्धतीवर त्या समाजाचे भविष्य अवलंबून असते. जलीकटूमधील गोवंशाबाबतची अमानुषता ’याची देही याची डोळा’ पाहाता येते. दहीहंडीच्या पाचव्या- सहाव्या थरावरून पडून मरणार्या किंवा अपंगत्व आलेल्या तरुणांची संख्या लक्षणीय झाल्यावर न्यायालय सक्रिय झाले होते. महत्त्वाचे म्हणजे दहीहंडीवर बंदी कुणीही घातली नव्हती, तर त्यातल्या थरांच्या मर्यादेबाबतचा हा प्रश्न होता. जलीकटूच्या समर्थनार्थ जयललितांचा अण्णाद्रमुक आणि करुणानिधींचा द्रमुक असे दोन्ही पक्ष पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. द्रविडी अस्मितेचे राजकारण केंद्रस्थानी ठेवणार्या या मंडळींनी जलीकट्टूचा वापर आपल्या राजकीय अस्तित्वासाठी केला. भल्यामोठ्या बक्षिसांची रास रचणार्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने जसा दहीहंडीचा कैवार घेतला होता, तसाच काहीसा हा प्रकार. दुष्काळाच्या काळात कमी पाणी वापरून होळी खेळण्याची अपेक्षा हिंदूंकडून ठेवली तर त्यात वावगे ते काय? ज्यांची सांस्कृतिक मूल्ये समाजाच्या हितासाठीच्या बदलांना प्रतिसाद देऊ शकतात, त्याच समाजाकडून अशा अपेक्षा ठेवल्या जाऊ शकतात ना? भारतातील बर्याच मंदिरांनी बळीची प्रथा बंद केली आहे. अनेक मंदिरे टप्प्याटप्प्याने चुकीचे पायंडे सोडत आहेत. ही आनंदाची गोष्ट असायला हवी. कुणातरी ‘परदेशी संस्थे’चा हात असल्याच्या बागुलबुवाला घाबरून आपण हिंदू समाजातील चुकीच्या पद्धतीने चालणार्या गोष्टींकडे कानाडोळा करू शकत नाही. त्या सुधारल्या पाहिजे आणि त्यांचे वारंवार मूल्यमापनही झाले पाहिजे. हिंदू धर्मालाही अशा परखड चिकित्सेचे वावडे नाही. बदलत्या काळानुसार जी आधुनिक मूल्ये म्हणून पुढे येत आहेत ती वस्तुत: हिंदूंचीच आहेत. बैलपोळा हा आपलाच सण. देखणा जातीवंत नसेल, पण शेतावर राबणार्या बैलाचे पोळ्याच्या सणाला पोटभर कौतुक केले जातेच. पशुविषयी करूणा व सहअस्तित्वाचा भाव हे मूल्य हिंदूंचेच आहे. आपल्या मुलाच्या जागी बळी देण्यासाठी वर्षभर पाळल्या जाणार्या बोकडाची बैलपोेळ्याच्या बैलाशी जशी तुलना केली जाऊ शकत नाही, तसेच जलीकटूचेही समर्थन केले जाऊ शकत नाही.
जलीकटूवर बंदी घातल्याने एका भारतीय गोवंशाचा नाश होण्याचा जावईशोध कुणीतरी लावला आहे. कृषी अर्थव्यवस्थेत बैलाची जागा आधुनिक यंत्र घेत आहेत. दुधासाठी देशी जनावरावर अवलंबून राहाता येत नाही, ही आज दुग्धव्यवसायाची वस्तुस्थिती आहे. त्यासाठी गीर गाय त्यांच्याकडे नेणार्या ब्राझीलकडे आपल्याला आशाळभूतपणे पाहावे लागते. जलीकटूतील ‘कंगायम’ जातीच्या वळूला भरपूर किंमत असते हे बरोबर, पण ती किंमत या खेळासाठीच लावली जाते. त्यासाठी बैल पोसले जातात आणि विकले जातात. उमेदीची तीन-चार वर्षे झाली की पुढले आयुष्य हे ‘कंगायम’ जातीचे बैल कुठे असतात याबद्दल कुणी चर्चा करताना दिसत नाही. कारण त्याचे उत्तर थोडे अजून भयंकर आहे. आपले सण आणि ते साजरे करण्याच्या पद्धती यांच्याबाबत जर आपणच चिकित्सा केली नाही, तर ती कोण करणार? अनुसूचित जातीतल्या मंडळींनंी पौरोहित्य करावे यासाठी प्रशिक्षण देण्याचे उपक्रमनाशिकमध्ये केले जातात. हे केवळ हिंदू धर्मातच घडू शकते. जलीकटू झालाच पाहिजे, असे म्हणणे लोकशाहीत हक्काचे आहे, पण त्यात सुधारणा घडवून आणू, असे ठामपणे म्हणायला कुणीही तयार नाही. नाशिकमधील जे उदाहरण यापूर्वी दिले त्याच नाशिकमधील अजून एक उदाहरण देण्यासारखे आहे. गंगापूर रोडला शंकराचार्य न्यासाची इमारत आहे. शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या नावाने ही वास्तू उभी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशासाठी आंदोलन सुरू केले, त्यावेळी शंकराचार्य असलेल्या डॉ. कुर्तकोटींनी केवळ मंदिरप्रवेशालाच नव्हे, तर या चळवळीलाही सक्रिय पाठिंबा दिला. १९२० ते १९३५ या काळात शंकराचार्य डॉ. कुर्तकोटींनी शुद्धीकरण, अस्पृश्यता निवारण असे कितीतरी कार्यक्रमअव्याहतपणे राबविले. करवीर पिठाशी बंड करूनच ते नाशिकमध्ये येऊन स्थिरावले होते. या आगळ्यावेगळ्या शंकराचार्यांचे परखड विचार आजही सावरकरांच्या विचारांप्रमाणेच ढोंग्यांना न पेलणारे आहेत. न्यासातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘श्रीमहाभागवत शंकराचार्य कुर्तकोटी’ या पुस्तकातले त्यांचे विचार सुन्न करून विचार करायला लावणारे आहेत. हिंदू धर्मातील मागील दशक हे जातीपाती तोडण्याचे व त्यातून निर्माण झालेल्या असमानता नष्ट करण्याचे होेते. येणारे शतक हे हिंदू धर्मातील सांस्कृतिक प्रदूषणे दूर करण्याचे असले पाहिजे. भोंगे लावणार्यांशी डीजे-स्पीकरच्या भिंती उभारून स्पर्धा करणे, हा हिंदूंचा स्थायीभाव असू शकत नाही. हिंदू धर्म हा सर्व प्रकारचे प्रवाह कवेत घेऊन जाणारा धर्म. पण त्याचबरोबर त्यात चुकीचे पायंडेही रूढ होत जातात. हे चुकीचे पायंडे वेळीच मोडले नाहीत, तर होणारे नुकसान अपरिमित असेल. पुढच्या पिढीला अशा परंपरांविषयी आस्था राहणार नाही व आजच्या पिढीचा त्यावरचा विश्वास उडेल. हिंदू धर्मातील कुप्रथांवर बुद्धिप्रामाण्य मानणार्या हिंदूंनी वेळीच परखड शब्दांत टीका केली नाही, तर मूळ धर्मावरच विश्वास नसणार्यांची अंधश्रद्धा निर्मूलनाची पोपटपंची ऐकावी लागेल.
एम सी जे पर्यंत शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतचे संपादक. मूळ मुंबईकर आणि बालपणापासून रा. स्व. संघाशी संबंधित. सा. विवेक व तरुण भारत समूहात विपुल लिखाण. वन्यजीव बचावाच्या कामात सक्रिय. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य. राष्ट्रीय प्रश्न, राजकीय, सामाजिक व धोरणविषयक अभ्यास व लिखाण.