आकाशाशी जडले नाते - सूर्य ग्रहण

    18-Jan-2017   
Total Views | 1


“तिळगुळ घे आणि गोड बोल!”, दुर्गाबाईंनी सुमितच्या हातावर लाडू ठेवला.

“सुम्या, तुझ्या आजीला मी किलोभर तिळगुळाचे लाडू आणून दिलेत बरे! तेवढ्या तिळगुळावर ती माझ्याशी वर्षभर गोड बोलणार! मग मी वेताळ, असुर, सैतान कसलाही वेश घेतला तरी ती काही म्हणणार नाही! उलट, अशी नाटकं करून मी दमलो असेन, असे म्हणून मला चहा करून देणार!”, आबांनी आपले स्वप्न सांगितले!

“हुं! एका किलोत फार तर दोन महिने गोड बोलण्यात येईल! आणि इथे फक्त माणसांना चहा मिळतो!”, दुर्गाबाईंचे पुणेरी पाटी छाप उत्तर.

“बर बाई! आज काय मी वेश बदलत नाही, मग तरी देशील चहा?”, आबा म्हणाले.

“आजी मी पण घेईन चहा! आबा, आज तर खास दिवस आहे! सूर्याचा मकर राशीत प्रवेश. उत्तरायण! मग आज आपण सूर्याचे विशेष मंदिर पाहायला हवे.”, सुमितची मागणी.

“चल, आज आपण उत्तरायणाचेच मंदिर पाहू!

“कसं आहे सुमित, २१ / २२ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस. या दिवशी दक्षिणेकडे प्रवास करणारा सूर्य, आकाशात थबकतो. त्याच्या प्रवासाची दिशा बदलतो, आणि मग सर्वसाधारणपणे २४ / २५ डिसेंबरला त्याचा उत्तरेचा प्रवास सुरु होतो.”, आबा म्हणाले.

“पण आपण तर १४ / १५ जानेवारीला उत्तरायण साजरी करतो!”, सुमित म्हणाला.

“दीड – दोन हजार वर्षांपूर्वी, उत्तरायणाला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत असे. आता उत्तरायण झाल्यावर २० एक दिवसांनी सूर्य मकर राशीत जातो. पण पूर्वी सुरु झालेली मकर संक्रांतीला उत्तरायणाच्या उत्सवाची प्रथा मात्र तशीच राहिली. आता खरेतर आपल्या उत्सवाच्या तारखेत दुरुस्ती करायला हवी.

“असो. आज आपण सूर्य मंदिर पाहायला, ख्रिस्तपूर्व युरोप मध्ये जाऊ. तेंव्हा युरोप मध्ये Druid, Celtic, Norse, इत्यादी ‘Pagan’ लोक राहत होते. हे लोक अनेक देवी-देवतांची पूजा करत. त्या मध्ये सूर्य / मित्र / Sol हा महान देव. या थंड प्रदेशात, उत्तरायणाला सूर्याचे पुनश्च उत्तरेला येणे, हा मित्राचा पुनर्जन्मच होता! अर्थात मित्राचा जन्मदिवस! ही आनंददायी घटना ते मोठ्या हौसेने साजरी करत.

“उत्तरायणाच्या उत्सवाचे एक मंदिर आहे - इंग्लंडचे Stonehenge! ४ ते ५ हजार वर्षांपूर्वी हे मंदिर म्हण किंवा वेधशाळा म्हण बांधायला सुरवात झाली. इथे मोकळ्या मैदानात प्रचंड मोठ्या शिळा गोलाकारात उभ्या केल्या आहेत. उत्तरायणाच्या दिवशी, दोन ठराविक शिळामधून, सूर्याची पहिली किरणे गाभाऱ्यात पोचतात.

 “असे अनेक गोलाकार structures संपूर्ण युरोप मध्ये पाहायला मिळतात. हे अजून एक पहा, जर्मनी मधले जिओसेक सर्कल. बांबू मध्ये हे पुन्हा बांधण्यात आले आहे.“, आबांनी अजून एक henge दाखवले.

 “आबा, ही सगळी प्राचीन मंदिरे दिसत आहेत. पुढच्या काळात काय झाले?”, सुमितने विचारले.

“पहिल्या शतकात, ख्रिश्चन धर्माची स्थापना झाली. चौथ्या शतकात, या नवीन धर्माला रोमन सम्राटाचा आश्रय मिळला आणि सुर्योपासनेला ग्रहण लागले.

“सर्व Pagan धर्म बेकायदेशीर ठरवण्यात आले. Pagan लोकांसमोर एकच पर्याय होता – धर्मांतर! या दरम्यान अनेक मित्र मंदिरांचे चर्च मध्ये रूपांतर केले गेले. खुद्द रोम मधील अनेक चर्च, मित्र मंदिरांवर उभ्या आहेत!

“ख्रिश्चन धर्म वाढला खरा, पण धर्मांतरित Pagans काही केल्या उत्तरायणाचा महोत्सव साजरा करायचे थांबेनात. तेंव्हा चर्चने जशी मित्र मंदिरे काबीज केली, तसे मित्राचा जन्मदिवस पण! मित्राचा जन्मदिवस हाच येशूचा जन्मदिवस असे घोषित केले. २५ डिसेंबरचा उत्तरायणाचा उत्सव सुरु राहिला, पण हळूहळू लोक हा दिवस सूर्याचा जन्मदिवस होता हे विसरून, येशूचा जन्मदिवस साजरा करू लागले.”, आबा म्हणाले.

“Oh, I see! युरोप मधले मुळचे धर्म लयास गेल्यावर सुर्योपासानेचा मागमूस देखील राहिला नसेल!”, सुमित.

“सूर्याचे तेज लपवणे सोपे आहे का? लवकरच ‘Free Masonary Fraternity’ उदयास आली. Masonary मध्ये मित्रोपासानेच्या अनेक खुणा दिसतात. त्यांच्या बांधकामात, शिल्पात मित्रपूजा दिसते. जसे Statue of Liberty, US Seal इत्यादी ठिकाणी ती दिसते. या संस्थेला चर्चने, राज्य व्यवस्थेने सतत विरोध केला, त्यांच्यावर बंदी आणली, बहिष्कार टाकला, ‘ते सैतानाची पूजा करतात’ असा त्यांच्यावर आरोप केला, मित्रोपासानेची चिन्हे Devil’s symbols ठरवले गेले. पण अनेक शतके Mason’s चे कार्य चालू राहिले.

“मागच्या शतका पासून, काही युरोपीय पुन्हा आपल्या मुळाकडे वळू लागली आहेत. Neo-Paganism, Neo-Druids अशा चळवळी चालू आहेत. एकीकडे कित्येक जण २५ डिसेंबर हा ‘मित्रा’ चा वाढदिवस म्हणून साजरा करतात. तर दुसरीकडे २५ डिसेंबर हा येशूचा वाढदिवस नाही हे पोपने मान्य केले.


“पण तरीही ग्रहण सुटले असे म्हणता येणार नाही. पूर्वीचे लोक म्हणत ‘दे दान, सुटे गिऱ्हान’, म्हणजे दान दिल्याशिवाय ग्रहण सुटत नाही. तसं आपण जगाला सूर्योपासनेचे ज्ञानदान केल्याशिवाय हे ग्रहण सुटणारे नाही.”, आबा म्हणाले.

“आबा, आता रथ सप्तमी पर्यंत मी सूर्यनमस्कार घालतोच, पण त्या बरोबरच अजून एकाला तरी सूर्यानमस्कर शिकवून मी थोडी जबाबदारी उचलीन.”, सुमित म्हणाला.  

 

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा
छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

"छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत आहेत. शिव चरित्राचा अभ्यास करून आपण त्यांच्या ऋणानुबंधाशी जोडले जातो. शिवचरित्र कायम संघर्षाची प्रेरणा देते. म्हणूनच त्यांस युगंधर, युगप्रवर्तक आणि युगपुरुष म्हणतात. एक व्यक्ती आणि राजा म्हणून शिवाजी महाराजांचे चारित्र्य अनुकरणीय आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. नागपुरातील मुंडले सभागृहात 'युगंधर शिवराय' हे पुस्तक नुकतेच सरसंघचालकांच्या शुभहस्ते प्रकाशित झाले. त्यावेळी ते बोलत होते. Yug..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121