झैरा वसीमचा माफीनामा आणि पुरोगामी स्मशान शांतता 

    17-Jan-2017   
Total Views |

काल आमिर खान च्या दंगल सिनेमात काम केलेल्या एका १६ वर्षाच्या काश्मिरी मुस्लिम अभिनेत्रीच्या सोशल मीडिया वॉलवर इस्लामिक फुटीरतावाद्यांनी अक्षरशः बीभत्सतेचा नंगा नाच केला. तिला शिवीगाळ केली. तिच्यावर नाही नाही ते आरोप केले. शेवटी तिने फेसबुकवरून एक 'माफीनामा' लिहिला. त्या माफीनाम्याचे शब्द फार बोलके आहेत.  त्यात तिने म्हटलंय की 'हे माझा उघड कबुलीजबाब आणि माफीपत्र आहे. मी गेल्या काही दिवसात ज्या लोकांना भेटले त्यामुळे मी बऱ्याच लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांची माफी मागते. मी जे काम करते त्याबद्दल मला अजिबात अभिमान वाटत नाही, आणि मला सगळ्यांना, विशेषतः तरुणांना सांगावंसं वाटतं की त्यांनी कुणीही माझ्यासारखं व्हावं असं मला वाटत नाही. मी कुणाची रोल मॉडेल नाही. खरे रोल मॉडेल दुसरेच आहेत'. 

 

हा तथाकथित माफीनामा लिहिण्याचं कारण म्हणजे झैरा वासिम जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती ह्यांना भेटली. तिचे मेहबूबा मुफ्ती ह्यांच्याबरोबरचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर तिला काश्मीरमधल्या फुटीरतावादी लोकांकडून अत्यंत घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करण्यात आलं. फक्त १६ वर्षांच्या ह्या शाळकरी मुलीला वाचताही येणार नाही अश्या अश्लाघ्य भाषेत शिव्या देण्यात आल्या. कदाचित तिच्या घरच्यांना धमक्याही दिल्या गेल्या असण्याची शक्यता आहे. त्या शिव्या असह्य होऊन झैरा वसीमने माफीनामा लिहिला. तो माफीनामा नंतर तिने काढून टाकला. त्यानंतर तिने तो माफीनामा लिहिण्यासाठी आपल्यावर कुणाचंही दडपण नव्हतं अश्या अर्थाची एक पोस्ट लिहिली आणि नंतर ती ही काढून टाकली. कसल्या प्रचंड दबावाखाली ती मुलगी वावरतेय हे सगळ्यांना ह्या सगळ्या प्रकारामुळे निश्चितच कळेल. 

दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की एरवी कुठलीही फुटकळ घटना घडली की न मागता प्रतिक्रिया द्यायला पुढे धावणाऱ्या बॉलीवूडमधल्या बडया नावांपैकी एक अनुपम खेर आणि जावेद अख्तर वगळता कुणीही झैराच्या बाजूने ठामपणे उभे राहिलेले नाही.  जो आमिर खान स्वतःला 'विचार करणारा' अभिनेता वगैरे म्हणवून घेतो, तो ही आपल्याच सिनेमात आपल्या लेकीचे काम करणाऱ्या ह्या मुलीच्या बाजूने काहीही बोललेला नाही. सलमान खान, महेश भट, अनुराग कश्यप, प्रियांका चोप्रा वगैरे मंडळी देशात काही खुट्ट झाले की आपली मते कुणीही न विचारताही जाहीर करतात, पण ह्या केसमध्ये मात्र सगळेच तोंडात मिठाची गुळणी धरून आहेत. 

एकीकडे अमेरिकन अभिनेत्री मेरिल स्ट्रीपने दडपशाहीविरुद्ध आवाज उठवला, ती किती शूर आहे म्हणून तिचं कौतुक करणं आणि दुसरीकडे स्वतःच्याच देशातल्या एका १६ वर्षांच्या मुलीला इस्लामी फुटीरतावादी जाहीर धमक्या आणि शिव्या देताना मात्र शेपूट घालून गप्प राहणं हा दुटप्पीपणा केवळ बॉलीवूडच करू जाणे. ह्या १६ वर्षाच्या काश्मीरमधल्या मुसलमान मुलीच्या जागी एखादी हरियाणामधली हिंदू अभिनेत्री असती आणि तिने असा माफीनामा लिहून प्रसिद्ध केला असता तर मात्र ह्या लोकांनी कोण गहजब केला असता. पण इथे त्या अभिनेत्रीचा आवाज दडपणारे लोक काश्मीरमधले मुसलमान फुटीरतावादी आहेत त्यामुळे समस्त पुरोगाम्यांची विवेकबुद्धी सध्या बिनपगारी सुट्टीवर गेलेली दिसते. 


अर्थात हा दुटप्पीपणा दाखवण्यामध्ये केवळ बॉलीवुडवाले लोकच अग्रेसर आहेत असं नाही. नेहमीचे यशस्वी पुरोगामी विचारवंत आणि पत्रकार, स्वतःला स्त्रीवादी म्हणवून घेणाऱ्या काही महान व्यक्ती ह्या ही ह्या रेसमध्ये आहेत. सगळ्या जगाला नैतिकतेचे आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे धडे न मागता देणाऱ्या लोकांचा हा कळप झैरा वसीमच्या ह्या प्रकरणात मात्र कोमामध्ये गेलेला दिसतोय. काही दिवसांमागे हेच लोक 'भगवे ट्रोल भगवे ट्रोल' म्हणून सोशल मीडियावर शिमगा करत होते. अर्थात पुरोगामी रंगांधळेपण ही एक अनुवांशिक विकृती आहे, त्यामुळे त्यांना भगव्याशिवाय दुसरा रंग दिसत नाही. पण एका सोळा वर्षाच्या शाळकरी मुलीचा आवाज दडपला जातोय आणि तिच्या बाजूने बोलणारा एकही तथाकथित वजनदार 'पुरोगामी' आवाज देशात दिसत नाही ही खरी पुरोगामी चळवळीची भारतातली शोकांतिका आहे. 

-शेफाली वैद्य   

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121