महाभारत. व्यासांच्या सर्वदर्शी, सर्वस्पर्शी प्रतिभेला पडलेले एक सर्वांगसुंदर स्वप्न. असं म्हटलं जातं की मानवी जगात ज्या ज्या भावनांचा कल्लोळ दिसतो त्या साऱ्या भावना महाभारतात एकवटलेल्या आहेत आणि महाभारतात जे नाही ते मानवी जीवनातही नाही. म्हणूनच हजारो वर्षे झाली तरी भारतात आजही महाभारत वाचलं जातं, नाचलं जातं, गायलं जातं आणि चित्रितही केलं जातं. अगदी आजही केवळ अभिजात साहित्यातच नव्हे, तर लोकसाहित्यात, संगीतात, नृत्यात, चित्र, शिल्प आदी कलांमधून महाभारताचे पडसाद उमटतच आहेत.
महाभारत ही केवळ भावा-भावांमधली युद्धकथा नाही. मानवी भाव-भावनांच्या विशाल पडद्यावर उमटलेले ते एक महाकाव्य आहे. म्हणूनच चक्रवर्ती राजगोपालाचारींपासून ते कवी मंगेश पाडगावकर आणि कन्नड साहित्यिक भैरप्पा ह्यांच्यासारख्या सगळ्याच प्रातिभ माणसांना महाभारताची ही सगळ्यांना माहित असलेलीच कथा आपल्या शब्दात लोकांना परत-परत सांगण्याचा मोह होतो. एखादी साहित्यकृती हजारो वर्षे टिकून राहणे आणि इतकंच नव्हे तर सर्वसामान्य जनतेला ती साहित्यकृती इतकी ओळखीची, आपलीशी वाटणे की ती साहित्यकृती, तिच्यातली माणसं, शब्द, भावना, प्रसंग हे त्यांच्या आयुष्याचाच भाग बनून राहणे हे उदंड यश व्यास आणि वाल्मिकीखेरीज कुणाही प्रतिभावंतांच्या वाट्याला निदान भारतात तरी आलेले नाही.
महाभारत आणि रामायण ही अशी महाकाव्ये आहेत की ज्यांनी शतकानुशतके भारतीय समाजमनावर गारुड केलंय. इथेही संस्कृत साहित्याच्या अभ्यासकांचं असं मत आहे की रामायण ही तशी सरळ, साधी, एका अंगाने जाणारी गोष्ट आहे. एक आदर्श नायक, त्याची आदर्श नायिका आणि आदर्श खलनायक ह्यांच्या संघर्षातून उभी राहिलेली ही कथा. रामायणामध्ये मानवी नात्यांची गुंतागुंत फारशी नाहीच. माणसाचे आदर्श आचरण कसे असावे हेच रामायण शिकवते. महाभारताचा पट मात्र त्यामानाने खूपच विशाल आहे. मनुष्यस्वभावातल्या गुंतागुंतीचा, केवळ सुष्ट प्रवृत्ती आणि दुष्ट प्रवृत्ती ह्या काळ्या-पांढऱ्या पलीकडे जाऊन मानवी मनात जे राखाडी रंगाचे कंगोरे असतात त्या रंगछटांचे महाभारतात फार यथार्थ वर्णन आहे.
ह्या अश्या अजरामर, कालातीत साहित्यकृतीचे रसग्रहण करण्यासाठी म्हणून पुण्यात भांडारकर प्राच्यविद्या संस्थेमध्ये गेल्या आठवड्यात तीन सलग व्याख्याने आयोजित केली गेली होती. लाभसेटवार फाउंडेशन, अमेरिका ह्या संस्थेतर्फे भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत ह्या वर्षीपासून लाभसेटवार व्याख्यानमाला सुरु झाली आहे. त्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प, तेही महाभारतावरचे ओवण्याचा मान डॉ. अरुणा ढेरे ह्यांना देण्यात आला. डॉ. अरुणा ढेरे ह्यांची वक्ता म्हणून केलेली निवड किती सार्थ होती ह्याचा प्रत्यय त्यांची व्याख्यानं ऐकलेल्या सगळ्यांनाच आला असेल. दांडगा व्यासंग, अत्यंत ओघवती वाणी, निनादणाऱ्या घंटानादासारखा सुरेख आवाज आणि अप्रतिम शब्दलालित्य ह्या सर्वांचा संगम म्हणजे अरुणाताईंची तिन्ही व्याख्यानं होती.
भारतीय संस्कृती, प्राचीन साहित्य, लोकपरंपरा इत्यादींचा गाढा व्यासंग असलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा.चिं. ढेरे यांच्या अरुणा ढेरे ह्या कन्या. पण मराठी साहित्य क्षेत्रात त्यांची स्वतंत्र ओळख आहे ती कवयित्री, कथाकार, ललित लेखिका, संशोधिका, समीक्षाकार इत्यादी विविध आयाम लिलया सांभाळणाऱ्या एक अत्यंत प्रतिभावान आणि व्यासंगी लेखिका म्हणून. आजवर अरुणाताईंच्या नावावर पंचावन्न पुस्तकांची यादी आहे. अश्या अरुणाताईंकडून महाभारताचे विविध पैलू उलगडताना पाहणं हा एक अत्यंत आनंदाचा अनुभव होता.
लाभसेटवार व्याख्यानमालेतलं पहिलं व्याख्यान होतं ते 'महाभारतातील दौपदी' ह्या विषयावरचं. पाच पांडवांची पत्नी द्रौपदी ही तसं पाहिलं तर महाभारताची नायिका. यज्ञातून बाहेर आलेली, यज्ञज्वालेसारखीच धगधगती स्त्री. स्वतःच्या शारीर सौंदर्याची जाणीव असलेली कामिनी, स्वतः राणी असूनही अज्ञातवासातल्या पांडवांच्या बरोबरीने विराटाघरी सुदेष्णेचे दासीपद स्वेच्छेने पत्करणारी पत्नी, भर कौरवसभेत होऊ नये ती विटंबना झाल्यामुळे अपमानाने पेटून उठलेली मानिनी आणि सरतेशेवटी युद्ध जिंकल्यावर देखील पोटच्या पाची पोरांचा बळी डोळ्यांदेखत जाताना बघणारी, सर्वस्व हरलेली शोकाकूल आई. अश्या अनेकविध रूपांमधून द्रौपदी आपल्याला व्यासांच्या महाभारतात भेटते. तिच्यामुळेच महाभारत घडलं असा आरोप तिच्यावर लावले जातात. पण स्त्री म्हणून ती कशी होती अश्या तिच्या मूळ रूपाचा वेध घ्यायचा प्रयत्न अरूणा ढेरेंनीं आपल्या पहिल्या व्याख्यानात केला.
दुर्गाबाई भागवतांनी आपल्या व्यासपर्व मधल्या द्रौपदीवरच्या लेखात तिला 'अतिशुद्ध वासनांची कमालीची उत्कटता आणि पाशवी चैतन्य असलेली कामिनी' असे म्हटले आहे. त्याच्या उल्लेख करून अरुणा ढेरे म्हणाल्या की द्रौपदी कामिनी होतीच, पण त्याचबरोबर ती स्वत्व न सोडणारी, तेजस्वी अशी दुर्मिळ स्त्री होती. तिच्या वाट्याला जे भोग आले ते द्रौपदीने सहन केले, बिनतक्रार स्वीकारले कधीच नाहीत. नाईलाजाने सहन कराव्या लागणाऱ्या प्रत्येक गोष्टींविरुद्ध तिने आवाज उठवला. अरुणाताईंच्या शब्दातच सांगायचं झालं तर म्हणूनच 'आयुष्यातल्या प्रत्येक निकराच्या प्रसंगात तिच्यातली आगही दिसते आणि जागही दिसते'.
कृष्णाचं आणि द्रौपदीचं नातं तर जगावेगळं. ज्या गोष्टी ती स्वतःच्या पाच पतींजवळही बोलू शकत नाही त्या कृष्णाला न बोलता समजतात. अरुणाताई म्हणतात की द्रौपदी सांवळी होती म्हणून तिचं कृष्णा हे नाव पडलं, पण ती कृष्णसखी होती हा ही एक पदर त्या नावामागे असला पाहिजे. मैत्रीच्या, भाऊ-बहिणीच्या नात्याच्या पलीकडलं पण शारीर प्रेमाच्या अलीकडलं हे स्त्री-पुरुषांमधलं निखळ सख्याचं तरल, कोंवळं नातं. अगदी आजही अश्या नात्याला नाव देताना, सहज स्वीकारताना समाज अडखळतो, पण केवळ व्यासांनीच नव्हे तर लोकप्रतिभेनेही जगाच्या कुठल्याही चौकटीत न बसणारे हे नाते कसं सहज स्वीकारलंय हे अरूणाताईंनी आपल्या व्याख्यानात सोदाहरण स्पष्ट केलं.
अरुणा ढेरेंच्या दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यानाचा विषय होता प्रख्यात कन्नड लेखक एस एल भैरप्पा ह्यांच्या पर्व कांदबरीवर. पर्वचं मर्म उलगडून दाखवणारं हे व्याख्यान अप्रतिम होतं. एखाद्या कलाकृतीचा आस्वाद चोहो बाजुंनी कसा घेता येऊ शकतो हे अरुणाताईंनी त्यांच्या ओघवत्या, लालित्यपूर्ण आणि तरीही अभ्यासू आणि व्यासंगी अशा शैलीत फार सुंदररित्या दाखवलं. अरुणाताईंचं भाषण म्हटलं तर पर्वची अभ्यासपूर्ण समीक्षा होती आणि म्हटलं तर आस्वाद घायला शिकवणं होतं.
परदेशात आणि आपल्याकडेही आता, बऱ्याच ठिकाणी वाईन टेस्टिंगचे क्लासेस होतात. चांगली वारुणी ही चषकात कशी भरावी, तिचा वास कसा नाकात घोळवावा, नंतर तिचे दोन-तीनच थेंब जिभेवर घोळवून ती काहीशी कडवट तरीही सुखद चव रंध्रारंध्रात हळूहळू कशी भिनवावी ह्या सगळ्या गोष्टी ह्या वर्गांमधून शिकवल्या जातात. भैरप्पांची पर्व ही महाभारतावरची कादंबरीही तशीच आहे. चांगल्या वारुणीसारखी. सुरवातीला कडवट लागणारी. पहिल्यांदा वाचली तेव्हा अंगावर येणारी. वाईनसारखी तिची घुटक्या घुटक्यांनी, मेंदूत घोळवून, हळू-हळू चव घेता यायला हवी. तितकी आपल्या मनाची जिव्हा प्रगल्भ हवी. अरुणाताईंनी ती जिव्हा तयार करायचं काम केलं आणि तेसुद्धा अत्यंत काव्यमय रित्या.
कादंबरीतल्या छोटया छोट्या जागा. महाभारताच्या मुळच्या, अत्यंत सशक्त आणि रसरशीत रेखाचित्रात भैरप्पांसारख्या सिद्धहस्त लेखकाच्या प्रातिभ लेखणीने भरलेले सामाजिक, सांस्कृतिक रंग अरुणा ढेरेंनी फार हळुवारपणे दाखवले. भैरप्पा स्वतः तत्वज्ञानाचे विद्यार्थी आहेत, भारतभर फिरलेले एक सांस्कृतिक दृष्ट्या सजग प्रवासी आहेत. त्यांच्या लिखाणात पडणारी त्यांच्या जीवनविषयक चिंतनाची प्रतिबिंबे जो अरुण ढेरेंनी फार सुंदर उकलून दाखवली. मुळातल्या व्यासांच्या महाभारतातले सगळे दैवी चमत्कार बाजूला सारून भैरप्पांनी पर्व लिहिलं. पर्वमधल्या सगळ्या व्यक्तिरेखा पार्थिव आहेत. मानवी आहेत. संवेदनाशील वाचकाला जाणवतो, पण पुरता त्याच्या हाती गवसत नाही तो पर्वचा गाभा अरुणाताईंनी नेमका दाखवला. आता घरी जाऊन पर्व परत वाचायचं हा विचार त्या दिवशी व्याख्यानाला उपस्थित सगळ्यांच्याच मनात आला असेल ह्यात मला शंका नाही.
तिसरं आणि शेवटचं व्याख्यान होतं ते महाभारत आणि लोकभारत ह्या अरुणाताईंच्या हातखंडा विषयाचं. रामायणातल्या सीतेच्या वाट्याला आलेला लोकमानसाचा ओला कनवाळू कळवळा महाभारतातल्या द्रौपदीच्या वाट्याला का आला नाही हे स्पष्ट करताना अरुणाताई म्हणाल्या की सीता सहनशील आहे. सोशिक आहे. क्षमाशील आहे. द्रौपदी तशी नाही. तिच्यावर झालेल्या अन्यायाने दुखावलेली ती काळजात सदैव सूडाची धगधगती चूड घेऊनच वावरते.
अरुणा ढेरे पुढे म्हणाल्या की व्यासांच्या प्रतिभेचा अविष्कार भारतातल्या लोकमानसाने इतक्या सहजतेने आपलासा केला की लोकांना महाभारत ही आपलीच गोष्ट आहे असं वाटायला लागलं, त्यातूनच मग काळ, परिस्थिती, आसपासची समाजव्यवस्था हे कुठलेच संकेत लोकभारताला सीमित करू शकले नाहीत. म्हणून 'तेलाच्या गाण्यामध्ये' भानुमतीच्या राजवाड्यात शिंकाळं दिसतं, त्यावर उडी घेऊन तेल सांडणारी मांजरी दिसते आणि ते तेल पाताळात झिरपत जाऊन थेट शेषनागाच्या डोक्यावर पडू शकतं.
द्रौपदी आणि कृष्ण ह्यांच्यातलं सख्यत्व लोकपरंपरेने किती वेगवेगळ्या पदरांनी उलगडून दाखवलंय ते अरुणाताईंनी दाखवलं. अगदी 'दौपदीसी बंधू शोभे नारायण' इथपासूनच्या समाजमान्य असलेल्या भाऊ-बहिणीच्या नात्यापासून ते इंद्रप्रस्थाची यजमानीण असलेल्या, पंक्तीत वाढणाऱ्या द्रौपदीच्या चोळीची सुटणारी गाठ सावरायला तिला दोन ज्यादा हात देणारा द्रौपदीचा सखा श्रीकृष्ण इथपर्यंतचे ह्या अनाम नात्याचे वेगवेगळे पैलू लोकपरंपरेने किती सहजपणे स्वीकारले ते अरुणाताईंनी लोकपरंपरेतली गाणी आणि गोष्टी दाखवून स्पष्ट केलं.
दुर्गा भागवत आणि इरावती कर्वे ह्यांच्यासारख्या व्यासंगी विदुषींचा धगधगता तेजाळ वारसा पुढे नेणाऱ्या डॉ. अरुणा ढेरेंची ही महाभारतावरची तिन्ही व्याख्यानं म्हणजे साहित्यरसिकांसाठी एक पर्वणीच होती.
-शेफाली वैद्य