मोदी आणि खादी

    16-Jan-2017   
Total Views |

 

पु. ल. देशपांडे ह्यांच्या 'असा मी असामी' ह्या पुस्तकात एक वाक्य आहे की 'चाळ ही एक अशी गोष्ट आहे की जिथे क्षुल्लक गोष्टीची घटना होते'. त्याच धर्तीवर आपल्याला असे म्हणता येईल मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही अशी व्यक्ती आहे की त्यांच्याही संदर्भात प्रत्येक छोट्या छोटया गोष्टीची देखील घटना होते आणि प्रसारमाध्यमांमधून आणि सोशल मीडियावरून त्या घटनेचे तरंग दीर्घकाळ उमटत राहतात. स्वतः मोदी एखादी गोष्ट करून कधीच पुढे निघून गेलेले असतात पण त्यांचे विरोधक आणि समर्थक अश्या दोन्हीही राहुट्यांमधले लोक मात्र त्या घटनेचा अन्वयार्थ लावण्यात दीर्घकाळ गुरफटून रहातात.

सध्याचा ताजा, गरमागरम विषय म्हणजे खादी ग्रामोद्योग आयोगाकडून दरवर्षी विक्रीला येणाऱ्या कॅलेंडर आणि डायऱ्यांचा. २०१७ सालच्या खादी ग्रामोद्योग आयोगाच्या  कॅलेंडर आणि डायऱ्यांवर नरेंद्र मोदी मोठ्या चरख्यावर सूत काततानाचे छायाचित्र आहे. ह्या डायऱ्या बाजारात आल्या आणि लगोलग मीडियामध्ये एका मोठ्या वादाला  तोंड फुटले.

इतकी वर्षे खादी ग्रामोद्योग आयोगाकडून दरवर्षी कॅलेंडर व डायऱ्या छापल्या जातात हे कुणालाही ठाऊक नव्हते, पण मोदींचा फोटो कॅलेंडरवर आला आणि गहजब उडाला. 'मोदींनी गांधींना हायजॅक केले' असे अरण्यरुदन 'स्वच्छ भारत अभियान' सुरु केल्यापासून मीडियामधून होत होतेच, आता 'मोदींनी गांधींना हटवले' असा हाकारा सुरु झाला. इतकी वर्षे गांधी म्हणजेच खादी हे समीकरण भारतीय जनतेच्या डोक्यात पक्के झाले होते. चरख्यावर बसून सूत कातणाऱ्या गांधींचे कृष्णधवल छायाचित्र आपण सगळ्यांनीच कधी ना कधी बघितले असेल.  गांधीजी आयुष्यभर खादीच्या प्रचारासाठी लढले. चरख्यावर बसून सूत कातणारा मोदींचा फोटो खुद्द गांधीजींनी बघितला असता तर देशाचे पंतप्रधान अगदी २०१७ सालीही खादीचा प्रसार करतात हे पाहून त्यांना आनंदच झाला असता!

पण महात्मा गांधी म्हणजे जणू काँग्रेस पक्षाची खासगी मालमत्ताच आहेत अशा थाटात वावरणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या धुरिणांना आणि मीडियामधल्या त्यांच्या भाट-चारणांना मात्र खादी ग्रामोद्योग आयोगाच्या ह्या कृतीने अतोनात संताप आला. ह्या देशात चरख्यावर जणू केवळ आणि केवळ गांधीजींचाच स्वामित्वहक्क आहे आणि संघ परिवारातल्या मोदी यांनी चरखा चालवला तर चरखा आणि खादी दोन्हीही अपवित्र होतात असे मानणाऱ्या ह्या लोकांनी सध्या मीडियामध्ये नुसता हलकल्लोळ माजवलाय.

 

खादी आणि ग्रामोद्योग आयोग ही एक सरकारी संस्था आहे, एखाद्या राजकीय पक्षाची खासगी मालमत्ता नाही आणि सरकारचे लोकनियुक्त नेते ह्या नात्याने मोदींचा फोटो कॅलेंडरवर वापरायचा खादी आणि ग्रामोद्योग आयोगाला पूर्ण हक्क आहे. फक्त गांधीजींचाच चरखा चालवतानाचा फोटो खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने कॅलेंडर आणि डायऱ्यांवर वापरला पाहिजे असा नियम कुठेही नाहीये. आजपर्यंत १९९६, २००२, २००५, २०११, २०१२, २०१३ आणि २०१६ ह्या वर्षी प्रकाशित झालेल्या कॅलेंडर आणि डायऱ्यांवर देखील गांधीजींचा फोटो नव्हता असे सरकारने स्पष्ट केलेले आहे. 

मोदींनी गेल्या दोन ऑक्टॉबरला 'मन की बात' मध्ये भारतीय जनतेला खादीचे कपडे विकत घेऊन वापरायचा आग्रह केला आणि खादी ग्रामोद्योग आयोगाच्या दुकानांमधून होणाऱ्या खादीच्या विक्रीत चक्क ३४ टक्क्यांनी वाढ झाली ही वस्तुस्थिती आहे. वर्षानुवर्षे नुकसान सोसून खादी ग्रामोद्योग आयोगाची दुकाने तोट्यात चालवली जात होती. सरकारसकट कुणालाच खादीची फिकीर नव्हती. मोदींच्या आवाहनामुळे खादी लोकप्रिय होऊन कपड्यांचा खप वाढला. ह्याबद्दल मात्र हे टीकाकार चकार शब्द काढत नाहीत. मुळात मुद्दा खादीचा किंवा गांधीजींचा, दोघांचाही नाहीये. नरेंद्र मोदींची सतत वाढती लोकप्रियता हे खरे ह्या लोकांना बोचणारे सत्य आहे. 

राहता राहिली चरखा चालवताना फोटो काढून घेण्याची बात. एक जुजबी गुगल सर्च केला तर अगदी राजीव गांधी आणि सोनिया गांधी ह्यांच्यासकट अमिताभ बच्चन सारख्या चित्रपट कलावंतांचे देखील चरखा चालवतानाचे फोटो दिसतील. पण त्या फोटोंवरून कुणी फार गहजब केल्याचे ऐकिवात नाही. म्हणजे चरखा गांधींखेरीज इतर  लोकांनी चालवायला विरोध नाही, पण मोदीं सारख्या 'वेगळ्या विचारसरणीच्या' लोकांनी मात्र त्याला हात लावायचा नाही, मग ते देशाचे पंतप्रधान का असेनात! ही ओंगळ राजकीय अस्पृश्यता सध्या गांधीजींच्या नावाचे खोटे उमाळे काढून पद्धतशीरपणे सगळीकडे पसरवली जाते आहे.  

 

ट्विटरवरून सरकार चालवणारे अखिल विश्वाचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल ह्यांनी खादी ग्रामोद्योग आयोगाचे हे कॅलेंडर प्रकाशित झाल्याबरोबर लगेचच 'गांधी बनायला जन्मभराची तपस्या लागते. चरखा चालवण्याची एक्टिंग केली म्हणून कुणी गांधी होत नाही', असे ट्विट केले होते. केजरीवाल ह्यांचा स्वतःचाच  चरखा चालवण्याची एक्टिंग करणारा फोटो बघितला की त्यांचे ट्विट त्यांच्या स्वतःच्या बाबतीत किती चपखलपणे लागू पडते ते दिसतेच आहे.


बाकी ह्या सगळ्या प्रकारामुळे एक बरे झाले. निदान ह्या निमित्ताने खादी ग्रामोद्योग आयोग ही संस्था दरवर्षी कॅलेंडर आणि डायऱ्या छापून विक्रीला काढते हे तरी सगळ्यांना कळले.

 

-शेफाली वैद्य 

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121