“तिळगुळ घे, गोड बोल!”, बाबाने गिरीशच्या हातात तिळगुळाची वडी ठेवली.
“नुसते गोड नाही हं, खरे पण बोल.”, आईने नेहेमीप्रमाणे बाबाच्या सूचनेत भर टाकली.
तेंव्हा गिरीश नाटकी आवेशात म्हणाला, “सत्य कटू असते माते, हे आपण विसरलात का? आम्ही एकाचीच आज्ञा पालन करू शकतो!”
“आणि कधीकधी दोन्ही पैकी आम्हाला एक सुद्धा जमणार नाही!”, बाबा हसत म्हणाला.
“छे! छे! सत्य सुद्धा गोड बोलता आले पाहिजे. ती नाही का रे तुझी, Linda Goodman, राशीचे गुणावगुण सांगताना, अवगुण सुद्धा ती इतके गोड सांगते की वाचणाऱ्याला गुदगुल्या होतात. म्हणजे मुद्दा तर कळतो पण वाचणाऱ्याला बोचत नाही.
“आणि काही वरवर गोड बोलतात पण ते ऐकणाऱ्याच्या हिताचे असेलच असे नाही. शीतपेयांच्या जाहिरातीसारखे. शरीराला हानिकारक असले तरी, छानसं संगीत, गोडशी कविता, गोंडस चेहेरे, प्रसिद्ध व्यक्ती, सुंदर दिग्दर्शन, अप्रतिम दृष्य असं कित्ती गोSSSड वेष्टन घातले तरी आत विषच की!”, आई म्हणाली.
मीना आजी म्हणाली, “अगदी मनातले बोललीस बघ, प्रतिभा! सत्य आणि प्रिय भाषणा बद्दल, ज्ञानेश्वर विवरण करून सांगतात - कानाला गोड पण अर्थाने हृदयाला भोकं पडतील असे बोलणे गोड नाही. किंवा कानाला गोड पण दुसऱ्याचे अहित साधणारे शब्द देखील गोड नाहीत. त्यापेक्षा आईचे कटू शब्द चांगले, जे लेकराच्या हिताचे असतात.
“जशी कमळाची कळी तिच्या तीक्ष्णपणाने पाणी चिरून वर येते, पण अत्यंत मुलायम असते. किंवा चंद्रप्रकाशात परिसर दिसला तरी त्या शीतल प्रकाशाने डोळ्यांना थंड वाटते. तसे आपले बोलणे संदेहाचे निवारण करेल असे तीक्ष्ण असावे, पण ते खुपू नयेत. कानाला इतके गोड असावे, की ऐकणारा कौतुकाने ऐकेल.
“जो श्रवणी मधुर, परिणामी हितकारक, आणि सत्य बोलतो, तो दैवी गुणाने संपन्न आहे!”