
कधी कधी ना काही जाहीराती अशा असतात ज्या फक्त आपली वस्तु विकली जावी यासाठी नाही बनविल्या जात, तर ती वस्तु विकत असताना एक सुंदर संदेश देखील लोकांना जावा यासाठी ही त्या जाहीरातींचा निर्माण केला जातो. असं म्हणतात ग्राहकांच्या मनापर्यंत तुम्ही पोचलात तर तुमची वस्तु ही विकली गेलीच समजा. मात्र ते करण्यासाठी खूप अभ्यास आणि संवेदना या दोन्ही गोष्टी लागतात. गेल्या काही काळात अशाच काही सुंदर संदेश देणाऱ्या, जनतेच्या मनाला भिडणाऱ्या आणि हळुच डोळ्यात पाणी आणणाऱ्या काही जाहीराती प्रसिद्ध झाल्या आहेत. बघूया या सुंदर जाहीराती....
१. डाबर वाटिका ब्रेव्ह अॅण्ड ब्यूटिफुल :
प्रत्येका मुलीसाठी, महिलेसाठी तिचे केस खूप महत्वाचे असतात. तिच्या सुंदरतेचे ते प्रतीक मानले जातात. मात्र एखाद्या आजारामुळे सगळे केस गेलेत तर? ती महिला सुंदर नाही? याच विषयावर डाबर वाटिकाने दोन वर्षांआधी प्रसिद्ध केलेली ही जाहीरात. काही लोकांना सुंदर दिसण्यासाठी केसांची आवश्यकता नसते असं सांगणारी ही जाहीरात आहे. खरं तर केसांसाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाची जाहीरात कशी असावी? केस कसे वाढतील हे सांगणारी हो ना? मात्र त्याच्या उलट संदेश देणारी ही जाहीरात असल्याने जास्त गाजली. सुंदर आणि मनाला भिडणारी अशी ही जाहीरात आहे.
२. खुद को कर बुलंद - बिरला सन लाईफ इन्श्युरंस : आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर प्रत्येक व्यक्ती स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आतोनात प्रयत्न करतच असतो, कदाचित त्यालाच आयुष्य असे म्हणतात, मात्र ऑटिझम सारखा आजार नशिबात असेल तर त्या व्यक्तीला आणि त्याच्या घरच्यांना अनेक दिव्य समस्यांना सामोरे जावे लागते. अशाच एका ऑटिस्टिक मुलाच्या वडीलांची कहाणी सांगणारी ही जाहीरात आहे. इन्श्युरंस कंपनीची जाहीरात असल्यामुळे स्वत:चं आयुष्य कसं प्लान करावं हे तर यात सांगितलंच आहे, मात्र ते सांगण्याची पद्धत मनाला भिडणारी आहे.
३. दोन चमचे वरण- फॉर्च्युन ऑयल :
असं म्हणतात आईच्या हाताची चव जगात कुठल्याही इतर पदार्थाला येणारच नाही. खरंही आहे हे. आणि आजारपणात जर आईच्या हातचं साजूक तूप घातलेलं वरण मिळालं तर आजार कुठल्याकुठे पळून जाईल. एका म्हाताऱ्या आईची आणि रुग्णालयात असलेल्या तिच्या जवान मुलाची कहाणी सांगणारी ही जाहीरात. जाहीरात तेलाची असली तरीही आपण कुठेतरी स्वत:ला या जाहीरातीशी रिलेट करु शकतो. डोळ्यात हळूच पाणी आणणारी आणि एक सुंदर संदेश देणारी ही जाहीरात आवर्जून बघावी.
४. इट ऑल स्टार्ट्स - नेसकॅफे :
जगात आपण कितीतरी दिव्यांग लोकांना भेटतो. मात्र स्वत:च्या शारीरिक अडथळ्यावर मात करुन त्याच अडथळ्याला आपली ताकत बनविणारे लोक कमीच असतात. अशाच एका बोलताना 'अडखळणाऱ्या' मुलाची ही कहाणी. जाहीरात कॉफीची असली तरीही जगण्याची प्रेरणा देणारी ही जाहीरात आहे. स्वत:च्या मर्यादांवर मात करत, त्या अडखळण्यालाच स्वत:ची ताकत बनवून 'स्टॅंड अप कॉमेडी' करणारा हा मुलगा आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवून जातो.
५. तू उडजा पर फैला के - एचडीएफसी लाईफ :
पुन्हा ही विम्याची जाहीरात असली तरीही यातील संदेश खूपच सुंदर आहे. 'अपने परिवार को अपने दम पे जीना सिखाओ' असा संदेश देणाऱ्या या जाहीरातीतील वडील आणि मुलीच्या नात्यातील सुंदरता आपल्या मनाला भावते. आपण आपल्या आई वडीलांवर नेहमीच अवलंबून असतो, मात्र शारीरिक व्यंग असल्यास हे अवलंबून राहणे जास्त असते. तरीही काहीही झाले तरी आपल्याला स्वत:च्या पायांवर अभे करणारे ही आपले आई वडीलच असतात. असाच संदेश देणारी ही जाहीरात आहे. जाहीरात आपल्याला थोडंसं भावूक नक्कीच करते. जगण्याची प्रेरणा देणारी ही जाहीरात खूपच सुंदर पद्धतीने प्रदर्शित करण्यात आली आहे.