राहुलच्या आरोपांना थप्पड

    14-Jan-2017   
Total Views |

गेल्या महिन्यात संसदेचे अधिवेशन चालू असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही राहुल गांधी यांची खिल्ली उडविण्याचा मोह आवरला नाही. सगळे संसद सदस्य भूकंप झाल्यास ढिगार्‍यातून कसे सुखरूप बाहेर पडावे, अशा चिंतेत होते. पण सुदैवाने भूकंप झाला नाही, असे वक्तव्य पवारांनी केलेले होते. त्याचे कारण सरळ होते. ‘आपल्याला संसदेत बोलू दिले, तर देशात भूकंप होईल,’ असा उद्गार कॉँग्रेसचे विद्यमान प्रमुख नेते राहुल गांधी यांनी काढले होते. आपल्यापाशी मोदींविरोधातला व्यक्तिगत भ्रष्टाचाराचा पुरावा असल्याचा दावाही त्यांनी केला होता. पण तो भूकंप करण्याचे टळल्यावर, त्यांनी त्याचा गौप्यस्ङ्गोट गुजरातच्या एका जाहीर सभेत केला होता. त्यामुळे त्यांच्यापाशी कुठलाही सज्जड पुरावा नसल्याचे स्पष्ट होऊन गेले. कारण जे कागद ङ्गडङ्गडवीत राहुल तिथे वा अन्य सभांमध्ये बोलत होते, ते प्रकरण कित्येक महिने आधीपासूनच देशाच्या सर्वोच्च न्यायालयात विचारार्थ सादर झालेले होते. तेवढेच नाही, तर त्या कागदपत्रांमध्ये असलेल्या नोंदी निरर्थक व बिनबुडाच्या असल्याचेही ताशेरे न्यायालयाने मारलेले होते. म्हणजेच, अशा निरर्थक गोष्टींच्या आहारी जाऊन राहुलनी काहूर माजवले होते आणि त्यासाठी अवघ्या कॉंग्रेस पक्षाला कामाला जुंपले होते. प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनीच ती कागदपत्रे न्यायालयात नेऊन त्यावर चौकशीची मागणी केलेली होती. पण कोणी तरी कुठल्याही कागदावर काहीही लिहितोे, याच्या आधारावर चौकशा करता येत नाहीत, असे म्हणून न्यायालयाने याचिकाकर्त्याचे कान उपटले होते, तर त्यापेक्षा काही विश्वासार्ह पुरावा असेल, तर घेऊन येण्यास बजावले होते. तसा पुरावा भूषण यांनी दिल्याचे सांगण्यात येत होते. आता बुधवारी त्याची अखेरची सुनावणी होऊन, न्यायालयाने ती याचिकाच ङ्गेटाळून लावली. म्हणजेच राहुल गांधी बेताल बोलत असल्याचाच निर्वाळा न्यायालयाने दिलेला आहे.

अर्थात तसा निर्वाळा न्यायालयाने देण्याची काहीही गरज नव्हती. कारण गेल्या तीन-चार वर्षांत देशातल्या जनतेनेच तसा निष्कर्ष काढलेला असून, राहुलना डोक्यावर घेऊन नाचणार्‍या कॉंग्रेस पक्षाला त्याची मोठी किंमत मागल्या लोकसभा मतदानात मोजावी लागलेली आहे. मात्र, कितीही किंमत मोजली, तरी कॉंग्रेसचे डोके ठिकाणावर येऊ शकेल, अशी स्थिती राहिलेली नाही. कारण आता न्यायालयानेे निवाडा दिल्यानंतरही कॉंग्रेसचे प्रवक्ते मोदींनी उत्तर द्यावे, असा आग्रह धरून बसलेले आहेत. यापेक्षा कॉंग्रेसची वेगळी कुठली दयनीय अवस्था असू शकते? ज्याला देशातील सर्वोच्च न्यायालयानेेच पुरावा म्हणून नाकारले आहे, त्याचा अट्टहास करून काय साध्य होऊ शकते? पण तीही गोष्ट बाजूला ठेवून कॉँग्रेसी हास्यास्पद मागणीला समजून घेण्याचा प्रयत्न करता येईल. या लोकांचा देशाच्या सर्वोच्च न्यायालयापेक्षा नरेंद्र मोदी यांच्या शब्दांवर अधिक विश्वास आहे काय? नसता तर त्यांनी अशी मागणी कशाला केली असती? गेले दोन महिने ही मागणी सतत होऊनही मोदींनी त्याकडे ढुंकूनही बघितलेले नाही. तेही योग्यच आहे. बालिश व ङ्गुलीश मागण्या नाकारण्यातही वेळ वाया घालवायचा नसतो. रस्त्यावर कोणीही काहीही बरळत असेल, तर त्याच्या प्रत्येक गोष्टीची कोणी दखल घेत नाही. राहुलची अवस्था सध्या तशी झाली आहे. म्हणूनच मोदींनी तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. पण रस्त्यातले टपोरी वा उनाड लोक ‘टाईमपास’ करायला अशा गोष्टीची दखल घेत असतात आणि त्यावरून मौज करीत असतात. त्याच पातळीवर आलेल्या माध्यमांनी राहुलच्या त्या बेताल आरोपांच्या चर्चा केल्यास नवल नव्हते. म्हणूनच त्यावरून उलटसुलट चर्चा होत राहिल्या. पण त्याच पोरकटपणात सहभागी झाल्याने आता बहुतांश विरोधी पक्षांचीही प्रतिष्ठा लयाला गेलेली आहे. मात्र, असा अनुभव मोदींच्या आयुष्यातला पहिलाच नाही.

गुजरात दंगलीचे काहूर माजविण्यात आले आणि असाच खेळ १२ वर्षे चालला होता. ‘मुस्लिमांवर हल्ले करून हिंदूंना आपला राग व्यक्त करण्याची संधी द्यावी,’ असे वरिष्ठ पोलिसांच्या बैठकीत मोदींनी आदेश दिले असल्याची अङ्गवा, संजीव भट नावाच्या अधिकार्‍याने पसरवली. त्याची चौकशी व तपास करण्यात कित्येक वर्षे व न्यायालयाचे दिवस खर्ची पडलेले आहेत. देशातल्या तमाम माध्यमांनी, पुरोगामी पक्षांनी त्याचे सतत भांडवल केलेले होते आणि अनेक चौकशी आयोग व खास पथकांकरवी चौकशी झालेली होती. त्यातून काय निष्पन्न झाले? अखेरीस एक अशी वेळ आली की, त्यासंबंधीचे संजीव भट यांचे विधान सर्वोच्च न्यायालयानेच खोटे असल्याचा निर्वाळा दिला होता. कारण हा माणूस ज्या बैठकीत मोदींनी असे आदेश दिल्याचे सांगतो, त्या बैठकीला तोच हजर नसल्याचे साक्षीपुराव्यानिशी सिद्ध झालेले आहे; किंबहुना खोटेपणा खरा सिद्ध करण्यासाठी या भट नामक अधिकार्‍याने कसे खोटे पुरावे निर्माण केले, त्याचेही पोस्टमार्टेम न्यायालयाकडून झालेले आहे. ज्या ड्रायव्हरने आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्या बैठकीसाठी नेऊन सोडल्याचा दावा भटने केला, त्यावेळी व त्या दिवशी तो ड्रायव्हर अहमदाबादहून दूर मुंबईत असल्याचेही निष्पन्न झाले, तर अशा एका खोटारड्या इसमाने अङ्गवा पसरवली आणि त्याच्या आधारे नवनव्या कंड्या पिकवून मोदींना १२ वर्षे देशातल्या तमाम पुरोगाम्यांनी छळले आहे. संजीव भट आणि सहारा आदी कागदपत्रातल्या नोंदी, यात किंचित ङ्गरक नाही. मग त्याचा खुलासा मोदींनी कशाला करावा? किंबहुना असे पैसे त्या यादीतल्या नेत्यांनी घेतले असतील, तर शीला दीक्षित व अन्य कॉंग्रेस नेत्यांचे कबुलीजबाब घेऊनही राहुल आपल्या आरोपाला पुष्टी देऊ शकत होते. पण त्यासाठी अक्कल व बुद्धी दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. त्यांच्या दुष्काळात सध्या कॉंग्रेस होरपळते आहे.

साहजिकच अशा आरोप व गावगप्पांना उत्तरे देत बसायला देशाचा पंतप्रधान मोकळा नसतो. आपल्या प्रत्येक इच्छा व प्रश्नाला उत्तरे द्यावीत, ही राहुलची अपेक्षा चुकीची मानता येत नाही. त्याची अपेक्षा योग्य असली तरी वेळ व प्रसंग चुकीचा आहे. कारण तसा पोरखेळ संपुआ कॉँग्रेसचे सरकार असताना नित्यनेमाने चालत होता. राहुलनी काहीही पोरकटपणा करावा आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यालाही टाळ्या वाजवून पाठ थोपटावी, ही संपुआच्या कालखंडातील कार्यपद्धती होती. मात्र, आता देशात सत्तांतर झाले आहे, कॉंग्रेसने सत्ता गमावली आहे आणि राहुलच्या बाललीलांचे कौतुक करण्यासाठी भारतात सरकार नसते, हे लोकांनी आपल्या मतातून दाखवून दिल्याचा थांगपत्ता राहुलना अजून लागलेला नाही किंवा मनमोहन सिंग अणि नरेंद्र मोदी यातला ङ्गरक या जरठकुमाराला कळत नसावा; अन्यथा मनमोहन यांच्याकडे हट्ट करावा, तशी मोदींनी उत्तर द्यावे ही मागणी त्याने केलीच नसती. दया अन्य कॉंग्रेसजनांची येते. कारण या पोरकटपणाचे पक्षाकडूनही कौतुक चालू असून, प्रत्येक कॉंग्रेसवाला मोदी गप्प कशाला, असा प्रश्न विचारत असतात. ज्या प्रश्नाचे उत्तर देशातील सर्वोच्च न्यायालयानेच दिलेले आहे, त्याचा खुलासा नरेंद्र मोदी कशाला करतील? आणि राहुलचे लाड पुरवायला मोदींना भारतीय मतदाराने पंतप्रधान केलेले नाही. एक गोष्ट मात्र निश्चित! कॉँग्रेसजनांनी आपल्या शतायुषी पक्षाला मूठमाती देण्याची कामगिरी राहुलवर सोपविलेली आहे. त्यामुळे प्रत्येक कृतीतून व वक्तव्यातून अधिकाधिक मतदार गमाविण्याचे काम राहुल उत्तम पार पाडत असतात. मूळचे कॉंग्रेस नेते असलेल्या शरद पवारांनाही ज्या मूर्खाची खिल्ली उडविण्याचा मोह आवरला नाही. त्याच्या बाललीला त्या पक्षाला कुठे घेऊन जात असतील, त्याचीच ही साक्ष आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने आरोप फेटाळले आहेत. उद्या देश या पक्षाला पुरता फेटाळून लावणार असल्याची ही चाहुल आहे.

 

भाऊ तोरसेकर

भाऊ तोरसेकर

लेखक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121