प्रातिनिधीक छायाचित्र
थंडीत स्वाभाविकत: घाम येणं बंद होतं (किंवा अल्पश: घाम क्वचित प्रसंगी येतो) हातपाय थंड पडतात. अंग शहारल्यागत होतं. अंगाला थंड हवेचा स्पर्श नकोसा होतो. काहीतरी आच्छादन घ्यावेसे वाटते. अंगावरील लव थंडीमध्ये संरक्षणाचे कार्य करते. हे केस त्वचेवर एक आवरण म्हणून राहते आणि शरीरातील ऊब शरीरातच ठेवण्यास मदत होते. जेवढी लव कमी तेवढी त्वचा चटकन कोरडी पडते.
मनुष्य त्वचेतील सर्वात बाहेरील स्तर हा ७०% पाण्याने बनलेला असतो. हा स्तर एकदम पातळ असतो आणि मुख्यत्वे करून मृत पेशींनी बनलेला आहे. त्यामुळे या त्वचेला सतत पोषित (Hydrated and Nourished ) ठेवणे गरजेचे आहे. बाहेरील वातावरण एकदम थंड असेल आणि अंघोळ एकदम कडकडीत पाण्याने केली, तर त्वचेवर दुष्परिणाम होतो. खूप गरम पाणी असल्यास (अंघोळीचे पाणी) अंगावरील स्निग्धांश निघून जातो आणि त्वचा कोरडी, रुक्ष आणि खरखरीत होते. अशी त्वचा लवकर सुरकुतते, काळवंडते आणि यावर कंडही खूप येते. अशाच पद्धतीचा उष्ण-शीत व्यत्यासात, एसी आणि बाहेरील वातावरणातही होते. (विशेषत: उन्हाळ्यात ) एकदम उन्हातून थंड वातावरणात गेल्याने, त्वचेवरील रोमरंध्रे आकुंचित होतात. असे वारंवार राहिल्याने बाहेरील स्तराला स्निग्धांश व जलीयांशाचे पोषण मिळत नाही आणि थंडीत सांगितल्याप्रमाणे उन्हाळ्यात ही त्वचा कोरडी होऊ लागते.
हातापायांची त्वचा जरा जाड पेशींची असते आणि त्यावर लव नसते म्हणून थंड जमिनीशी वारंवार संपर्क आल्याने पायांचे तळवे भेगाळतात. खूप पाण्यात काम असल्यास हाताचे तळवेही भेगाळतात. थंडीतील बाह्य वातावरण हे थंड, रुक्ष आणि कोरडं असतं. हेच गुण शरीरातही वाढतात आणि त्वचेशी प्रत्यक्ष संबंध (direct contact ) येत असल्याने, त्वचेवर हे परिणाम चटकन दिसून येतात. जेवढी त्वचा उघडी (Exposed) राहते, तेवढी त्वचा अधिक रुक्ष, कोरडी होते.
शरीराची त्वचा, चेहर्याच्या त्वचेपेक्षा दाट असते. चेहर्याची त्वचा अधिक नाजूक असते. म्हणून त्यावर परिणाम लगेच दिसून येतो. अशा थंडीत ऊब यावी म्हणून दुपारच्या उन्हात जर जाणे झाले, तर त्वचा अधिक काळवंडते. ओठांचीही त्वचा रुक्ष होते आणि क्वचित ते फुटतात.
थंडीत सर्वसामान्यत: खालील काळजी महत्त्वाची आहे.
- त्वचेतील स्निग्धांश आणि जलीयांश टिकवायचा (To maintain Hydration & moisturization.)
- त्वचेचा थंड वातावरणाशी प्रत्यक्ष संपर्क कमी होईल, याची दक्षता घ्यावी.
- त्वचेला पोषक आहार द्यायचा.
cold cream, moisturisers थंडीमध्ये सुती कपडे, पूर्ण अंगभर घालावेत इ. लावून लगेच उन्हात बाहेर पडू नये. वरील प्रसाधने तैलीय असल्याने, लगेच बाहेर पडल्यास या स्तरावर (layer वर) सूक्ष्मधुलीकण (dust particles) बसू शकतात. असे झाल्यास रोमरंध्रांमध्ये ते अडकून त्वचा काळवंडलेली दिसू लागते आणि खाजही येऊ शकते. यासाठी घ्यायची खबरदारी- जी काही प्रसाधने शरीराला लावायची आहेत, ती किमान ४०-४५ मि. आधी लावावीत. शरीरात मुरायला २०-२५ मिनिटे लागतात. थंडीमध्ये थोडा अधिक काळ लागतो. असे जर केले नाही तर त्वचेवर मातीचा एक थर जमा होतो आणि चेहर्यावर विशेषत: पुरळ उठतात. (पुरळावर मग वेगळी चिकित्सा सुरू होते!) पण, जोपर्यंत कारण निमित्त चालू राहते, पूरळ येणं थांबत नाही, तैलीय त्वचेवर पूरळ म्हणून रुक्ष करणारी चिकित्सा दिली जाते, जी त्वचेसाठी उपयुक्त नाही. म्हणून छोटीशी एक खबरदारी घेतल्याने पुढील सर्व त्रासांवर निर्बंध बसविता येतो.
असे होऊ नये म्हणून अजून एक उत्तम उपाय आहे. तो म्हणजे अभ्यंग स्नान! अंघोळीपूर्वी संपूर्ण अंगाला (चेहर्यापासून पायापर्यंत तेल लावावे. हलके चोळावे. थोडा वेळ जिरू द्यावे आणि मग कोमट, थोडे हलके गरम चालेल पण कडकडीत पाणी अंघोळीला वापरू नये.) अंघोळी दरम्यान साबणाचा वापर टाळावा. याने शरीराला आवश्यक असलेल्या स्निग्धतेचाही नाश होतो. मेहनतीचे किंवा धूर धुळीतले काम असेल तरच सौम्य स्वरूपाचा साबण वापरा अन्यथा नाही. उटण्याने अंघोळ करावी. यात त्रिफळा कपूरकाचरी, संत्र्याचे साल, बेसन, गुलाब पाकळी मंजिष्ठा इ. औषधी द्रव्यांचे चूर्ण घेऊन ते मिश्रण कोमट दुधात/पाण्यात किंवा गुलाबपाण्यात मिसळावे आणि हे अंघोळीच्या वेळेस साबणाऐवजी वापरावे. याने त्वचेवरील केवळ अतिरिक्त स्नेह स्निग्धांश निघतो. त्वचेवरील मृत पेक्षी निघून रक्ताभिसण सुधारते. त्वचेचे टिकते आणि त्वचेवरही एक सुगंध दरवळतो. अंघोळीपूर्वी तेल लावताना तेल कोमट करून घ्यावे. खोबरेल तेल, तिळाचे तेल, ऑलिव्ह ऑईल, बदामतेल किंवा आणखी कुठलेही ते त्वचेला सूट होईल असे तेल लावावे, जिरवावे आणि मग अंघोळ करावी.
अंघोळीच्या पाण्यात २ चमचे गाईचे दूध घालावे. त्वचा खूप मऊ होते. क्लिओपात्रादेखील दुधानेच अंघोळ करायची. ओठांनाही अंघोळीनंतर गाईचे तूप किंवा खोबरेल तेल लावावे. ओठांना तुकतुकी येते आणि ओठ फुटलेले असल्यास लवकर भरून येतात. हातापायांच्या तळव्यांचीही विशेष काळजी घ्यायला हवी. आठवड्यातून एकदा तरी तळवे कोमट पाण्यात बुडवून ठेवावेत. या पाण्यात थोडे लिंबू पिळावे आणि किंचित मीठ घालावे. १० मिनिटे बुडवून ठेवल्यावर मऊ दातांच्या ब्रशने पाय घासावेत. तळव्यावर, पावलांवर घोट्याभोवती हलके घासावे. लिंबू आणि मिठामुळे पाय स्वच्छ आणि थोडा जास्त गोरा दिसतो. त्यावर साचलेली धूळ चटकन निघते. यानंतर पाय पुसून क्रीम, तेल किंवा तत्सम स्निग्धतायुक्त प्रसाधन लावावे आणि सुती मोजे घालावेत. पावले भेगाळत नाहीत आणि त्वचा काळवंडत नाही. थंडीमध्ये वारंवार पाण्यात पाय घालू नये, अन्यथा पाय फुटतात त्यातून रक्तस्त्रावही होऊ शकतो.
थंडीत जसे बाह्य उपचार गरजेचे आहेत तसेच काही आहारातीलही बदल अपेक्षित आहे. अंगात, शरीरात उष्मा निर्माण होणे महत्त्वाचे आहे. शरीराला स्निग्धांश अधिक लागतो. त्यामुळे जेवणातून तुपाचे प्रमाण वाढवावे. तेल बियाणांचा वापर वाढवावा. रोज दोन बदाम खावेत. तिळगूळ खावा. खूप थंड शिळे खाऊ नये. शरीरात वात वाढेल, असे काही खाऊ पिऊ नये. रोज दुध प्यावे. पंचामृत (दूध दही तूप साखर मध) खावे, व्यायाम करावा. या सगळ्याचा त्वचेवर खूप चांगला फायदा होतो. त्वचेची प्रतिकारशक्ती वाढते लवचिकता वाढते यामुळे त्वचा सुरकुतणे कमी होते आणि त्वचा निरोगी राहते आणि दिसतेही.
-वैद्य किर्ती देव