धर्म आणि निवडणुका

    13-Jan-2017   
Total Views | 1
 
 
गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीमध्ये धार्मिक आधारावर प्रचार करणे बेकायदा ठरविले आहे. परंतु हे करताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मात्र संदिग्धता ठेवली आहे. या दोन्हीवर प्रसारमाध्यमांतून पुष्कळ चर्चा होऊन गेली आहे. परंतु, या दोन्ही संदर्भात काही मूलभूत दृष्टिकोनांवर विचार करणे आवश्यक आहे. यासाठी मानवी जीवनातील निर्णय कोणत्या आधारावर घ्यायचे या संबंधात धार्मिकता आणि इहवाद यांच्यात जो मूलभूत फरक आहे, तो लक्षात घेणे आवश्यक आहे. माणसामध्ये जेव्हा जाणीव उत्पन्न झाली, तेव्हापासून आपले या जगातील नेमके स्थान काय? यासंबंधी द्विधावस्था आहे. आपण या जगात जगत असलो, तरी या जगाच्या पलीकडे आणखी कोणते तरी जग आहे आणि ते खरे जग आहे, आपल्याभोवती दिसणारे जग हे आभासात्मक आहे, खरे नाही, असे त्याला वाटत आले आहे. स्वर्ग व नरक या स्वरूपामध्ये सेमेटिक धर्मांमध्ये किंवा ब्रह्म आणि माया या स्वरूपात हिंदू समाजात हीच कल्पना प्रचलित आहे. त्यामुळे आपले जीवन हे आपल्याभोवती दिसणार्‍या व्यक्त जगाच्या पलीकडे असलेल्या शक्ती नियंत्रित करीत असतात आणि त्यानुसार आपण आपले जीवन व्यतीत करणे हाच सुखाचा मार्ग आहे, असे धर्मश्रद्धा मानणार्‍यांचे प्रतिपादन असते. परंतु, जेव्हा इहवादाचा विकास होऊ लागला, त्यावेळी आपल्या भवितव्याचा निर्णय आपल्या बुद्धीने आणि या जगातील आपल्या हिताचा विचार करून घेतला पाहिजे, या विचारसरणीचा प्रभाव वाढू लागला. लोकशाहीची प्रक्रिया हीसुद्धा इहवादी विचारांचाच परिणाम आहे.
 
लोकशाहीमध्ये लोकांच्या सामूहिक इच्छाशक्तीने आपल्या भवितव्याचा निर्णय घेतलेला असतो. लोकशाहीची संकल्पना निवडणुकीने आपले राज्यकर्ते निवडण्यापुरतीच मर्यादित नसते. कोणताही सामाजिक वा व्यक्तिगत निर्णय घेत असताना तो समाजाच्या ऐहिक हित-अहिताच्या मुद्द्यांवरून घ्यायचा की पारलौकिक शक्तीवरील श्रद्धेतून घ्यायचा, हा या दोन्ही विचारांतील मूलभूत फरक आहे. मानवी जीवन अत्यंत गुंतागुंतीचे आहे. कोणत्याही एका विशिष्ट चौकटीमध्ये त्याला बसविता येणे अवघड आहे. त्याच्या निर्णयप्रक्रियेत त्याच्यावर अनेक शक्ती कामकरीत असतात. असे असले, तरी सामूहिक निर्णय घेत असताना त्याकरिता काही समान सूत्रांची आवश्यकता असते. मध्ययुगीन काळात धर्माची कल्पना ते सूत्र पुरवित असे, परंतु विज्ञानबुद्धीच्या प्रसाराबरोबर निसर्गातील अनेक गोष्टी ज्यावेळी मानवी बुद्धीच्या आवाक्यात येऊ लागल्या, तेव्हा आपण आपल्या बुद्धीच्या आधारे निर्णय घेऊ शकतो अशी त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया झाली. इस्लामिक देशांत अजूनही लोकशाही रुजत नाही, याचे कारण ’कुराण किंवा शरियत हा ईश्वराचा कायदा आहे आणि तो बदलण्याचे सामर्थ्य मानवी बुद्धीत नाही,’ अशी मुस्लीमधार्मिक नेत्यांची श्रद्धा आहे. या श्रद्धेला प्रतिकार करेल एवढी बौद्धिक क्षमता अजूनही मुस्लीमसमाजात निर्माण झालेली नाही. त्यामुळे हिंसाचार, यादवी युद्धे, जिहादी अतिरेकीपण, दहशतवाद यांतून इस्लामी जगताला आपली सुटका करून घेता आलेली नाही व या संघर्षात आज सारे जग ओढले गेले आहे. प्रारंभीच्या काळात उच्च-नीच जातिभेद, अस्पृश्यता, या गोष्टी हिंदू धर्माचे अंगभूत घटक आहेत, असे मानले जात होते. हे पाळले गेले नाहीत, तर आपल्यावर ईश्वराचा कोप होईल ही भीतीही त्यामागे होती. परंतु, जसजसे हिंदू समाजाचे बौद्धिक प्रबोधन होऊ लागले, तसतसा हिंदू समाज यातून बाहेर पडला आणि ’विवेकी मानवतावाद’ हा हिंदू समाजाच्या पुनर्निर्माणाच्या केंद्रस्थानी आला. आजच्या तरुणाला अगदी तीन-चार पिढ्यांपूर्वी अशी श्रद्धा बाळगून आपला समाज असे जीवन जगत होता, असे सांगितले तरी आश्चर्य वाटेल, एवढा बदल झाला आहे. तो पुरेसा नसला, तरी परंपरेऐवजी कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याएवढा प्रभावी बनला आहे.
 
जे उमेदवार धार्मिक भावनेला आवाहन करून सत्तेवर येतील, ते ज्या इहवादी विचारांच्या आधारावर भारतीय राज्यघटना उभी आहे, तिचे संरक्षण कसे करू शकतील? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु, त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे समाजाच्या मानसिकतेत क्रांतिकारक बदल होत नसतात. ते उत्क्रांत होत असतात. फक्त त्या उत्क्रांतीची दिशा कोणती आहे? हा प्रश्न असतो. मुस्लीमसमाजात निदान आज तरी मध्ययुगीन काळात जाऊ पाहणार्‍या प्रतिगामी शक्तींचा अधिक पगडा आहे, हे स्पष्ट दिसते. या उलट हिंदू समाजावर प्रबोधनात्मक शक्तींचा अधिक पगडा आहे हेही वेळोवेळी सिद्ध झाले आहे. मानवी संस्कृतीत निर्माण झालेला धार्मिक भावनांचा प्रभाव हा सांस्कृतिक परिवर्तनातील खूप महत्त्वाचा टप्पा आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर त्याचा प्रभाव पडलेला आहे. गीता, रामायण आणि महाभारत हे ग्रंथ धार्मिक मानायचे, सांस्कृतिक मानायचे की राष्ट्रीय मानायचे? निवडणूक प्रचारामध्ये धर्माचा वापर करायचा नाही असे ठरविले, तर प्रचारामधील रामायण-महाभारतातील दिलेल्या उदाहरणांचे काय करायचे? आणि अशी उदाहरणे जर दिली नाहीत, तर वक्त्याने आपल्या भाषणात काय मांडायचे? आज यादव कुटुंबीयांत जे युद्ध सुरू आहे, त्याला महाभारतातील कौरव-पांडवांच्या युद्धाची उपमा दिली, तर ती धार्मिक ठरेल की सेक्युलर? असे अनेक प्रश्न त्यातून निर्माण होतात. ज्या धर्मभावनेने पिढ्यान्‌पिढ्यांचे समाजमानस घडले आहे, ते मानस एखाद्या कायद्याने अथवा सर्वोच्च न्यायालयाच्या एखाद्या निर्णयाने बदलेल अशी अपेक्षा करणे हास्यास्पद आहे. मानवतावादी मूल्यांना कोणते धार्मिक पर्यावरण अधिक चांगले आहे आणि कोणते पर्यावरण विघातक आहे, याची जर चिकित्सा केली नाही, तर मध्ययुगीन काळात जाऊ पाहणार्‍या धार्मिक भावनांना राजकीय उत्तर देताच येणार नाही. एकेकाळी धार्मिक श्रद्धा ही जशी जीवनाचा सर्वंकष भाग होता, तसेच आज राजकारण हे जीवनाचा सर्वंकष भाग बनले आहे. पूर्वी व्यक्तिगत व सामाजिक मूल्ये, नैतिकता, परस्पर व्यवहार यांची निश्चिती धर्मश्रद्धेने होत असे. आज ती जागा घटनात्मक कायद्याने घेतली आहे. पूर्वी धर्मपीठे व्यक्तीच्या किंवा समाजाच्या वागणुकीसंबंधी निर्णय देत. आज तो देण्यासाठी कायद्याने प्रस्थापित झालेली न्यायालये आहेत. झालेले हे परिवर्तन ज्या धार्मिक संकल्पनांना मान्य आहे, त्या धार्मिक परंपरांचा प्रभाव समाजावर असण्यातच समाजाचे हित आहे. जर समाजाच्या सर्वच क्षेत्रांतून धार्मिक भावना काढून टाकायची ठरविली, तर ते जीवन निरस, मानवी प्रेरणेशी विसंगत आणि व्यावहारिकदृष्ट्या अशक्यप्राय होईल. व्यक्तीचे मन अत्यंत गुंतागुंतीचे असल्यामुळे त्याला एका विशिष्ट चौकटीत बांधून ठेवता येण्यासारखे नाही. त्यामुळे समाज कितीही इहवादी बनला, तरी त्याच्या समाजमनावर थोडा का होईना, धार्मिक प्रभाव असणारच. त्या धार्मिकतेची तत्त्वे कोणती असली पाहिजे, त्यासाठी कोणत्या तत्त्वांचा पुरस्कार केला पाहिजे हे आपण ठरवू शकतो. एकाच रक्ताच्या, वंशाच्या गटाचे असलेले भारत आणि पाकिस्तान १५ ऑगस्ट १९४७ रोजी वेगळे झाले. आज या दोन्ही देशांची स्थिती काय आहे, ते आपणासमोर आहे. या परिस्थितीतील फरकाचे एकमेव कारण म्हणजे, या दोन देशांवर असलेल्या दोन वेगळ्या धार्मिक संस्कृतींचा प्रभाव होय. आपल्या प्रत्यक्ष अनुभवात असलेल्या या गोष्टींचा विचारच न करण्याइतके आपल्यापाशी आंधळेपण आले आहे काय? त्यामुळे निवडणुकीत धार्मिक चर्चेला बंदी घालण्यापेक्षा कोणत्या धार्मिक प्रेरणा आपल्या देशातील कायदा, घटना, इहवाद टिकविण्यासाठी पोषक आहेत, याची चिकित्सा करणे आपल्या भवितव्याच्या दृष्टीने अधिक हितकारक नाही का?
-दिलीप करंबेळकर

दिलीप करंबेळकर

बीएससी, एम बी ए पर्यंत शिक्षण. मुंबई तरुण भारत, विवेक समूहाचे प्रबंध संपादक, मूळचे कोल्हापूरचे, आणीबाणीत तुरुंगवास, शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वर्षे गोव्यात रा. स्व. संघाचे पूर्णवेळ प्रचारक. महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश मंडळाचे विद्यमान अध्यक्ष. धोरण, मानवी संस्कृतीचा विकास, बौद्धिक जगत असे लिखाणाचे विषय. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121