काल परत एकदा एका वृत्तपत्रात ‘ब्रेकिंग न्यूज’ वाचली की काँग्रेसच्या सूत्रांनुसार लवकरच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर राहुल गांधी यांची नेमणूक करण्यात येईल. आता ही ‘ब्रेकिंग न्यूज’ काही भारतीय वाचकांना नवीन नाही. राहुल गांधी कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष होणार अश्या बातम्या गेली कित्येक वर्षे प्रसारमाध्यमांमधून दर सहा महिन्यांनी छापून येतच असतात आणि आता पन्नाशीकडे झुकलेल्या ह्या ‘युवा’ नेत्याच्या सळसळत्या, तारुण्यसुलभ वगैरे उत्साहाचे कौतुक पत्रकार मंडळी भरभरून करत असतात. मग राहुल गांधी एखादे भाषण-बिषण ठोकतात आणि त्या भाषणाचे मिडियामधून वारेमाप कौतुक होते. ‘राहुल गांधी आता राजकीय दृष्ट्या वयात आले’ अश्या गर्जना केल्या जातात. पण इतकी वर्षे झाली तरी हे बाळ काही जाणते होण्याचे नाव घेत नाही.
दिल्लीमध्ये काल काँग्रेस पक्षाने ‘जनवेदना संमेलन’ ह्या नावाखाली एक सभा घेतली. ह्या सभेत राहुल गांधींनी म्हणे जनतेला ‘डरो मत’ असा संदेश दिला. ह्या संमेलनाचा सगळा भर हा केवळ राहुल गांधी ह्यांची राजकीय कारकीर्द परत एकदा धक्का मारून सुरु करून देणे एवढाच असल्यामुळे, त्यांच्या भाषणाबद्दल सगळ्याच मिडियामधून भरभरून लिहून आले आहे. मोदी सरकारने सर्व लोकशाही संस्थांचा अनादर केला आहे. आमच्या सरकारने ७० वर्षे ह्या सर्व संस्था अत्यंत आदरपूर्वक जतन केल्या असा दावा राहुल गांधींनी आपल्या भाषणात केला. आपल्या आजीने जवळ जवळ दोन वर्षे ह्या देशात आणीबाणी आणली होती, तेव्हा मिडीयासकट सगळ्यांचेच स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले होते. लोकनियुक्त सरकारे पाडली गेली होती. सर्व कायदे धाब्यावर बसवून न्यायाधीशांच्या नियुक्त्या केल्या गेल्या होत्या. बावीस हजार लोकांना मिसा कायद्याखाली तुरुंगात टाकलं होतं ह्या सर्व गोष्टींचा राहुल गांधी ह्यांना सोयीस्करपणे विसर पडलेला दिसतो!
‘जगात सगळीकडे आपल्या पंतप्रधानांची खिल्ली उडवली जाते’ असे म्हणताना राहुल गांधी ह्यांच्या डोळ्यांपुढे कदाचित नवाज शरीफ ह्यांनी ‘देहाती औरत’ म्हणून हिणवलेले युपीएच्या काळातले पंतप्रधान मनमोहन सिंग असावेत. ह्याच राहुल गांधी ह्यांनी आपल्याच काँग्रेस सरकारने सिंग पंतप्रधान असताना काढलेला वटहुकूम भर पत्रकार परीषदेत जाहीर रित्या फाडून टाकून आपण सिंग ह्यांच्या निर्णयाचा किती आदर करतो ते सगळ्या जगाला दाखवून दिले होते. मागे वृत्तपत्रातून एक छायाचित्र छापून आले होते. राहुल गांधी आणि सोनिया गांधी होळीला लोकांना भेटत होते आणि मागे मनमोहन सिंग हातात मिठाईचा खोका घेऊन नोकरासारखे हात बांधून उभे होते. आपल्याच सरकारच्या माजी पंतप्रधानाला अशी वागणूक देणाऱ्या व्यक्तीने असे बोलावे हे खरोखरच हास्यास्पद आहे.
PM of India being ridiculed says @OfficeOfRG abt MMS. Is he talking abt this pic whr MMS is left holding mithai like loyal servant Ramukaka? pic.twitter.com/3CDd68nD5C
— Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) January 11, 2017
आपल्या भाषणात राहुल यांनी असेही सांगितले की काही मिडियामधल्या व्यक्तींनी म्हणे त्यांना भेटून ‘वातावरण बदलल्या’ची कबुली दिली. त्या पत्रकारांना म्हणे जे बोलायचं आहे ते त्यांना बोलता येत नाही कारण ‘हवा बदल गई है’. अश्या पत्रकारांना म्हणे नोकरी जाण्याची भीती वाटते. आता खरोखरच स्वतंत्र बाण्याचा, निर्भीडपणे लिहिणारा पत्रकार जर असेल तर तो ‘हवा बदल गई है’ ही कबुली राहुल गांधींपाशी का देईल? केवळ काँग्रेस पक्षाच्या रमण्यावर ज्यांची गुजराण व्हायची असेच पत्रकार अशी नेभळट कबुली द्यायला राहुल गांधींपाशी जातील हे स्पष्ट आहे.
खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ २०१९ मध्ये काँग्रेस सरकार परत सत्तेवर आल्यानंतरच येतील असे म्हणताना राहुल गांधीं काँग्रेसला परत सत्तेवर आणण्यासाठी त्यांच्याकडे कोणती रणनीती आहे तेव्हढे मात्र स्पष्ट केले नाही. पंतप्रधान मोदी ह्यांना पद्मासन घालता येत नाही असे म्हणणाऱ्या राहुल गांधी ह्यांचे स्वतःचे तोंड मात्र कायम पवनमुक्तासनात असते हेच सत्य त्यांच्या ह्या भाषणातून परत एकवार देशापुढे आले आहे.
BJP spokesmen are entirely correct in their claim that the more Rahul Gandhi speaks in public, the more he helps the BJP.
— Ramachandra Guha (@Ram_Guha) January 11, 2017
राहुल गांधी ह्यांच्या ह्या भाषणानंतर नेहरू घराण्याची कायम भलावणी करणाऱ्या रामचंद्र गुहांसारख्या माणसाला देखील निराशेने असे म्हणावेसे वाटले की ‘भाजपचे लोक म्हणतात ते खरेच आहे, जेव्हा जेव्हा राहुल गांधी तोंड उघडतात तेव्हा तेव्हा भाजपला त्याचा फायदाच होतो’!
-शेफाली वैद्य